हमास आणि इस्रायल यांच्यात कोणताही करार झालेला नाही ! – इस्रायलने केले स्पष्ट
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यात तडजोड होणार असून त्या संदर्भात चर्चा चालू आहे, अशा प्रकारचे वृत्त जागतिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘अशा प्रकारचा कोणताही करार झालेला नाही’, असे स्पष्ट केले आहे. तसेच इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी ‘आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही तडजोड किंवा करार झालेला नाही’, असे म्हटले आहे. याच वेळी त्यांनी असेही सांगितले की, असे काही झाले, तर तुम्हाला याविषयी नक्कीच माहिती देऊ. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलने यापूर्वीच अनेकदा स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इस्रायलच्या ओलिसांची हमासकडून सुटका केली जात नाही आणि हमासला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.
पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले, ‘आतापर्यंतच्या युद्धात आम्ही बरेच काही साध्य केले आहे. हमासच्या शेकडो आतंकवाद्यांना आम्ही ठार केले आहे. यात हमासच्या कमांडरांचाही समावेश आहे. तसेच हमासचे बोगदेही नष्ट केले आहेत आणि करत आहोत.’ नेतान्याहू यांनी अमेरिकेचे आभारही मानले आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेने आम्हाला महत्त्वाची शस्त्रे आणि संरक्षण साहित्य सतत पुरवल्याने आम्ही आभारी आहोत.
अल्-शिफा रुग्णालयातून रुग्णांना बाहेर काढणार ! – जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे की, येत्या ३ दिवसांत गाझामधील अल् शिफा रुग्णालयातून सर्व रुग्णांना आणि कर्मचार्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. येथे सध्या २५ कर्मचारी आणि २९१ रुग्ण आहेत. त्यांना नासेर आणि यूरोपियन रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. सध्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यात आणखी वाढ झाल्यावर या रुग्णालयांची स्थिती वाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मूळ नष्ट होईपर्यंत युद्ध थांबणार नाही ! – जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा स्थानिक वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. यात बायडेन यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत हमास तिच्या विनाशाच्या विचारसरणीवर कायम आहे, तोपर्यंत युद्धविरामामुळे शांतता येऊ शकत नाही. हमासचे आतंकवादी युद्धविरामाच्या वेळी रॉकेट, लढाऊ विमाने, दारूगोळा आदी शस्त्रांचा साठा करण्याचा प्रयत्न करतील. पुढे या शस्त्रसाठ्याद्वारे पुन्हा आक्रमण करून निरपराध्यांना ठार करतील. आमचा उद्देश केवळ युद्ध थांबवणे नाही, तर युद्ध कायमचे संपवणे आहे. आमचा प्रयत्न मूळ नष्ट करण्याचा आहे. गाझाला भक्कम केले पाहिजे ज्यामुळे मध्यपूर्वेत परत अशा घटना घडू नयेत. आम्ही शांततेसाठी गाझा आणि वेस्ट बँक येथे एकच शासन असावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. पॅलेस्टाईन प्राधिकरणांतर्गत हे साध्य होऊ शकते.