वणी (जिल्हा यवतमाळ) येथील श्री. लहू खामणकर यांना आयुर्वेदाविषयी आलेल्या अनुभूती
१. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !’ या सदरात सांगितल्याप्रमाणे चहा पिणे बंद केल्यावर आम्लपित्ताचा त्रास पूर्णतः नाहीसा होऊन अनेक शारीरिक व्याधीही न्यून होणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !’ या सदरात ‘चहा पिणे आरोग्यास घातक आहे’, असे सांगितले होते. त्यानुसार मी चहा पिणे बंद करण्याचा निश्चय केला. त्या वेळी आरंभी ‘माझा चहा सुटेल का ?’, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला; कारण यापूर्वी २ वेळा मी चहा बंद केला होता आणि नंतर मी परत चहा पिऊ लागलो होतो. ‘आता परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून सांगत आहेत, तर चहा पूर्णतःच बंद करावा’, असा माझ्या मनाचा निश्चय झाला आणि माझे चहा पिणे बंद झाले. १ – २ मास झाल्यानंतर माझा आम्लपित्ताचा त्रास पूर्णतः बंद झाला. आम्लपित्ताच्या त्रासामुळे मी प्रतिदिन १३ ते १५ रुपयांची गोळी घेत असे. आता चहा बंद करून एक वर्ष झाले आहे. त्यामुळे माझ्या अनेक शारीरिक व्याधीही न्यून झाल्या आहेत. आम्ही दोघांनीही (मी आणि माझी पत्नी) चहा पिणे बंद केले आणि दोघांचाही आम्लपित्ताचा त्रास पूर्णतः बंद झाला.
२. पायाच्या बोटांचा अस्थिभंग झाल्यावर केवळ आयुर्वेदाच्या उपचारांनी बरे वाटणे
माझ्या हाताचा अस्थिभंग (फ्रॅक्चर) होऊन हाताला दीड मास ‘प्लास्टर’ घातले होते, तरीही अस्थिभंग झालेला हात अजूनही दुखतो. नंतर माझ्या पायाला सुखासन (सोफा) आणि पलंग यांची ठेच (ठोकर) लागून पायाच्या बोटांचा दोन वेळा अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला. या वेळी दोन्ही बोटांना ‘प्लास्टर’मध्ये न ठेवता केवळ आयुर्वेदिक उपचार केले. त्यामध्ये हाडसांधीचा चोथा कोमट करून बांधणे, तेलाने मर्दन करणे आणि आंबे हळद उगाळून कोमट करून लेप लावणे या उपायांनी दोन्ही वेळा १५ दिवसांत पायाची बोटे पूर्णतः बरी झाली. विशेष म्हणजे या काळात कोणताही व्यायामप्रकार बंद न ठेवता, उपचार आणि व्यायाम दोन्ही चालू ठेवता आले. हे केवळ परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेमुळेच शक्य झाले. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. लहू खामणकर (वय ६७ वर्षे), वणी, जिल्हा यवतमाळ. (१२.९.२०२३)