पुणे येथे ‘झिका’चा पहिला रुग्ण !
पुणे – शहरात झिका रोगाचा यंदा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये सापडला असून आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू केल्या आहेत. झिकाचा संसर्ग झालेली ६४ वर्षांची महिला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. त्याला ही महिला उपस्थित होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला पुण्यातील खासगी रुणालयात नेण्यात आले. तिच्या तपासणीत शेवटी ‘झिका’चे निदान झाले.
या कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिकनगर येरवडा येथे रुग्णाची प्रत्यक्ष भेट घेतली. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या कर्मचार्यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.