हिंदूंनो, कालनेमीरूपी मायावी जन्महिंदूपासून सावध रहा !
‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने नेहमी आकांडतांडव करणार्या तथाकथित जन्महिंदूंना हिंदूंचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मात्र कधी मान्य होत नाही. हिंदूंनी निर्माण केलेली एखादी साहित्यकृती, चित्रपट, हिंदूंचे एखादे भाषण किंवा वक्तव्य असो किंवा त्यांनी एखादे गायलेले गाणे असो, त्यातून त्यांच्यावरील अन्यायाचे परखडपणे वास्तव चित्रण झालेले असेल, तर या जन्महिंदूंना ते पचवणे फार कठीण जाते. वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेला विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट हे याचे एक उदाहरण आहे.
५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातून काश्मीरमधील हिंदूंचे विदारक वास्तव समोर आले, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर धर्मांधांच्या सुरात सूर मिसळवणारे जन्महिंदू आणि लोकप्रतिनिधींची चित्रपटावरील दायित्वशून्य विधाने’, यांविषयीची सूत्रे वाचली. या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
१. ५६ रामसेवकांच्या नृशंस मृत्यूचे भीषण वास्तव दुर्लक्षिणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी !
वर्ष २००२ मधील दंगलीत हिंदूंनी आक्रमक भूमिका घेतली होती; कारण धर्मांध मुसलमानांनी अयोध्येवरून परत येणारे रामभक्त रेल्वेच्या ज्या बोगीत बसले होते, त्या बोगीला गोध्रा येथील रेल्वेस्थानकावर आग लावली होती. आग लावण्यापूर्वी बोगीची सर्व दारे बाहेरून पक्की बंद करण्यात आली होती. ‘कुणी बाहेर पडू नये’ म्हणून बोगीवर सारखे गोटे मारणे चालू होते. या घटनेत बोगीतील ५६ रामसेवकांचा जळून कोळसा झाला होता. या अमानुष घटनेवरची गुजरातची दंगल, ही एक प्रतिक्रिया होती; पण जन्महिंदूंकडून मूळ क्रियेकडे सोयीस्कर आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मूळ क्रियेऐवजी प्रतिक्रियेलाच लक्ष्य केले जाते. ५६ रामसेवकांना त्यांचा कोणताही गुन्हा नसतांना जिवंत जाळले जाते, तरीही याच्या वेदना जन्महिंदूंच्या मनाला कधी स्पर्शून जात नाहीत कि त्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे २ थेंब उभे रहात नाहीत ? ‘मिटकरींसारखे अनेक जन्महिंदू ५६ रामसेवकांच्या नृशंस मृत्यूचे भीषण वास्तव कसे काय दुर्लक्षित करतात ?’, याचे वैषम्य वाटल्याविना रहात नाही.
२. गुजरात दंगलच का ? हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रत्येक दंगलीवर चित्रपट बनवावा !
अमोल मिटकरी म्हणतात, त्याप्रमाणे ‘द गुजरात फाइल्स’ हा गुजरातमधील दंगलीवर आधारीत चित्रपट कुणी तरी अवश्य बनवावा; पण या दंगलीचा उद्भव ‘५६ रामसेवकांना जिवंत जाळल्यामुळे झाला’, हे वास्तवही दाखवावे. माझे तर म्हणणे आहे की, केवळ गुजरात दंगलीवरच चित्रपट का बनवावा ? तर यासमवेत वर्ष १९२१ मध्ये दक्षिणेतील मलबार जिल्ह्यात खिलाफत आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंचा जो भीषण नरसंहार झाला, तसेच हिंदु स्त्रियांची जी विटंबना झाली त्यावर; वर्ष १९४६ मध्ये बंगालमधील चितगाव जिल्ह्यातील नौखाली येथे मुसलमानांकडून सहस्रो हिंदूंची झालेली कत्तल, सहस्रो हिंदु स्त्रियांवरचे बलात्कार आणि हिंदूंच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची झालेली लूट त्यावर; वर्ष १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीत २१ लाख हिंदूंची झालेली कत्तल, लक्षावधी हिंदु स्त्रियांवर झालेले बलात्कार त्यावर; वर्ष १९४८ मध्ये म. गांधींची हत्या झाल्यावर सहस्रो ब्राह्मणांच्या झालेल्या हत्या, त्यांच्या संपत्तीची केलेली जाळपोळ आणि त्यांच्या झालेल्या विस्थापनावर; वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर ३ सहस्र शिखांच्या झालेल्या शिरकाणावर; वर्ष फेब्रुवारी २०२० मध्ये ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला विरोध करण्याच्या नावाखाली देहलीमध्ये सहस्रो हिंदूंच्या जीवित आणि वित्त यांच्या झालेल्या हानीवर, अशा विविध विषयांवरही चित्रपट बनवले गेले पाहिजेत ! अशा चित्रपटांद्वारे आपल्या मातृभूमीतच हिंदूंचा कसा अतोनात छळ झाला आणि आजही तो छळ कसा होत आहे, याचे भीषण वास्तव जगासमोर आले पाहिजे ! वर नमूद केलेल्या विषयांवर चित्रपट बनवून ते प्रदर्शित केले, तर मला निश्चिती आहे, त्या चित्रपटांना जन्महिंदूंच अधिक विरोध करतील; कारण एका मुसलमानावर जरी तथाकथित अत्याचार झाला, तरीही चहुबाजूंनी आरडाओरड करायची; पण ‘सहस्रो हिंदूंवर प्रत्यक्षात अत्याचार झाले, तरी तोंडात मूग गिळून स्वस्थ बसायचे’, ही येथील ‘सेक्युलर’ (निधर्मी) म्हणवून घेणार्या जन्महिंदूंची जुनीच सवय आहे. आजपर्यंत केरळ आणि बंगाल येथे धर्मांध अन् साम्यवादी यांच्याकडून सहस्रो हिंदूंच्या हत्या झाल्या; पण या जन्महिंदूंच्या मुखातून निषेधाचा एक शब्दही बाहेर पडला नाही. ख्रिस्त्यांनी गोव्यामध्येही लक्षावधी हिंदूंचा नरसंहार केला होता. चर्चने धर्माच्या नावावर २५० वर्षे ‘इन्क्विझिशन’ (धर्मसमीक्षण)च्या नावाखाली हिंदूंचा क्रूर पद्धतीने वंशसंहार केला होता. खरे तर या विषयावर ही ‘द गोवा फाइल्स’ या चित्रपटाची निर्मिती झाली पाहिजे !
३. या प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देणार का ?
‘द काश्मीर फाइल्स’विषयी बोलतांना राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘‘सामाजिक ऐक्य धोक्यात येईल, असे वक्तव्य करू नये आणि अशी भूमिका सत्ताधार्यांनी घेऊ नये. या चित्रपटामुळे अन्य धर्मियांच्या माणसांविषयी संताप येऊ शकतो. या चित्रपटाद्वारे चुकीच्या प्रचार तंत्राचा वापर करून समाजात विषारी वातावरण सिद्ध केले जात आहे.’’ शरद पवारांच्या या वक्तव्याचा विचार केला, तर प्रश्न निर्माण होतात की, या चित्रपटामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत असेल, तर काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये हिंदूंचा जो नरसंहार झाला त्यामुळे काय सामाजिक ऐक्य निर्माण झाले होते का ? प्रत्यक्षात काश्मीरमध्ये काय घडले, हे दाखवल्यामुळे विषारी वातावरण सिद्ध होत असेल, तर हिंदूंनी त्यांच्यावरील भीषण अत्याचाराची वाच्यताही करू नये का ? ‘अत्याचार करणारे निर्दाेषी आणि अत्याचाराला वाचा फोडणारे मात्र गुन्हेगार ?’, हे कोणते ‘सेक्युलर समीकरण’ आहे ? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांवरून लोकप्रियता संपादन करणारे अन् त्या लोकप्रियतेच्या कमाईवर राष्ट्रवादी काँग्रेसची खासदारकी पदरात पाडून घेणारे डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, ‘‘चित्रपटातील कोणतीही कलाकृती हा एक विचार मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्या चित्रपटातील दुसर्या बाजूचा विचारही मांडला जाणे आवश्यक असते. ‘द काश्मीर फाइल्स’विषयी एक विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जाते आहे कि काय ? अशी शंका उपस्थित होत आहे.’’ प्रश्न असा उपस्थित होतो की, या चित्रपटात कुणाचा विचार दाबून समाजाची दिशाभूल केली जात आहे ? काश्मीरमध्ये हिंदु समाजाने बाँबस्फोट केले, मुसलमान समाजावर अत्याचार केले; म्हणून मुसलमानांनी त्यांच्या क्रूर कत्तली आणि त्यांच्या स्त्रियांवर अमानुष बलात्कार केले, अशी काही वास्तविकता आहे का ? काश्मीरमध्ये निरुपद्रवी हिंदूंचा जो मुसलमानांकडून भीषण संहार झाला, तो त्यांच्या जिहादी मानसिकतेतूनच झाला, हे वास्तव आहे. येथे मुसलमान समाजाची बाजू दाबली जाण्याचा प्रश्नच कुठे आणि कसा निर्माण होतो ?
४. छत्रपतींच्या महाराष्ट्राने चित्रपट करमुक्त न करणे दुर्दैवी !
अनेक राज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त केला. स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे सत्तेत असतांना महाराष्ट्रात या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली, तेव्हा त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. हिंदू आणि हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या प्राणांचे बलीदान दिले, त्या महाराष्ट्राने हिंदूंची व्यथा जगासमोर मांडणार्या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी नाकारावी, हे केवढे दुर्दैवी आहे ?
५. मौलवींना कोट्यवधींची खिरापत वाटणारा; पण हिंदूंच्या वेदनेची थट्टा करणारा ‘आम आदमी पक्ष’ !
‘देहली राज्यानेही हा चित्रपट करमुक्त करावा’, अशी मागणी करण्यात आली होती. त्या वेळी देहलीचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत या मागणीवर प्रतिक्रिया दिली, ती मोठी संतापजनक होती. ते म्हणाले, ‘‘हा चित्रपट भाजपसाठी महत्त्वाचा असेल माझ्यासाठी नाही. हा चित्रपट करमुक्त करणार्यांनी या चित्रपटाचा निर्माता विवेक अग्निहोत्रीला सांगावे की, त्याने हा चित्रपट ‘यू ट्यूब’वर प्रसारित करावा, म्हणजे सर्व जण हा चित्रपट फुकट पहातील.’’ विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी हसून दाद दिली. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या घोर अन्यायांवर दुःख व्यक्त करणे तर दूरच; पण त्यांची थट्टा उडवणार्या या जन्महिंदू केजरीवाल यांनी देहलीतील मौलवींना (इस्लामचे धार्मिक नेते) मात्र आतापर्यंत ३१ कोटी रुपयांची खिरापत वाटली. हिंदूंच्या वेदनेची थट्टा उडवून हिंदूंच्याच करातून शासनाच्या तिजोरीत जमा झालेल्या पैशांची खैरात मुसलमानांवर करण्यात त्यांना ना जनाची लाज वाटली ना मनाची !
६. हिंदूंनी अरविंद केजरीवाल यांचे खरे स्वरूप ओळखणे आवश्यक !
नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात हेच केजरीवाल प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांना म्हणाले होते, ‘‘मी एकतर पंजाबचा मुख्यमंत्री होईन किंवा स्वतंत्र खलिस्तान देशाचा पंतप्रधान होईन.’’ यावरून निवडणुकीच्या काळात मंदिरात जाऊन ‘हनुमान चालिसा’ म्हणणार्या केजरीवाल यांच्या पोटात किती जहाल विष भरलेले आहे, याची प्रचीती येते ! अगोदरच ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंजाबवर असूनही या माणसाने फुकट वीज आणि पाणी, प्रत्येक महिलेला १ सहस्र रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन अशा घोषणांच्या भूलभुलैयात पंजाबी जनतेला फसवून निवडणूक जिंकली असली, तरी ही फुकटेपणाची सवय देश अन् लोकशाही यांना मारक ठरणारी आहे. केजरीवाल यांच्याकडे पाहिले की, मला रामायणातील कालनेमी या रावणाच्या मायावी राक्षस मामाचीच आठवण येते. मेघनाथासमवेत झालेल्या युद्धात मूर्च्छित झालेल्या लक्ष्मणासाठी संजीवनी औषध आणण्यासाठी निघालेल्या हनुमानाला मोहित करण्याची कामगिरी रावणाने या कालनेमीवर सोपवली होती. हनुमंताने कालनेमीचे कपट ओळखून त्याचा वध केला होता. सध्या जागृत होऊ पहाणार्या हिंदु समाजाला फुकटेपणाच्या सवयी लावून परत मूर्च्छित करू पहाणारे केजरीवालसारखे अनेक कालनेमी या देशात कार्यरत झाले आहेत. हिंदूंनी अशा कालनेमीरूपी मायावी जन्महिंदूपासून सावध राहिले पाहिजे.
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.
(क्रमश:)