महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसप्रवासात आलेला एक त्रासदायक अनुभव

मी २६ ऑक्टोबर २०२२ या दिवशी वाकड (पुणे) ते डोंबिवली आणि त्याच दिवशी डोंबिवली ते वाकड (पुणे) असा महाराष्ट्र राज्य परिवहनच्या (‘एस्.टी.’च्या) बसने प्रवास केला. तेव्हा या प्रवासाचा मला आलेला कटू अनुभव देत आहे.

मी वर नमूद केलेल्या दिवसाचे पुण्याहून जातांना आणि परतीचे आरक्षण केले होते. पुण्याहून जातांना आरक्षण केले, त्या गाडीची वेळ होती सकाळी ७.१० वाजता (वाकड स्थानक येथून म्हणजे वाकड येथील थांब्यावरून); परंतु त्या ठिकाणी सकाळी ७.१५ वाजता जी गाडी आली, ती त्या आधीच्या वेळेची असल्याचे चालकाने सांगितले. त्या वेळी त्यांना मी विचारले की, या वेळेची गाडी का आली नाही ? त्यांनी सांगितले की, गाडी विलंबाने येईल; पण सांगता येत नाही. तुम्हाला या गाडीतून येता येईल. गाडीत जिथे जागा आहे, तिथे बसून घ्या. त्यानुसार मी त्या गाडीतून प्रवास केला. ‘गाडीचा प्रकार आणि थांबे यांनुसार गाडी पनवेल येथे जाणार नाही’, असे वाटत होते; तरीपण ती गाडी पनवेल बसस्थानकामध्ये गेली. ‘ऑनलाईन’ दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली बसस्थानकही दाखवत नव्हते; परंतु ती गाडी डोंबिवली बसस्थानक येथे गेली. बस प्रशासनाने डोंबिवलीसाठी जो थांबा दिला आहे, तो पुष्कळ लांब आहे. ‘यामध्ये प्रवाशांची सोय विचारात घेतलेली दिसली नाही. (‘ऑनलाईन’ तिकीट आरक्षण करतांना काही बस थांबे दाखवत नाहीत; मात्र प्रत्यक्षात त्या थांब्यावर बस थांबते, असे या वेळच्या प्रवासात लक्षात आले. डोंबिवलीसाठी जो थांबा ऑनलाईन दाखवत होते, ते ठिकाण जाण्यास पुष्कळ लांब होते. डोंबिवली बस थांबा जवळचा थांबा आहे. तो ऑनलाईन दाखवत नव्हते.) त्यामुळे बसमधून प्रवास करण्यास कुणी सिद्ध होत नाहीत’, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. ‘बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय’ हे ‘एस्.टी.’चे ब्रीदवाक्य असून तसे होतांना दिसले नाही.

परतीच्या प्रवासातील शिवशाही बसचा विदारक अनुभव

श्री. सुनील ओजाळे

याच दिवशी सायंकाळी पुणे येथे परत येतांना मी डोंबिवली येथील थांब्यापासून तिकीट काढले असूनही सकाळचा अनुभव असल्याने मी गाडीच्या प्रारंभीच्या ठिकाणी (कल्याण येथे) गेलो. नियंत्रण कक्षात मी याविषयी निश्चिती केली नव्हती. प्रत्यक्षात गाडीची वेळ दुपारी ५.१५ अशी होती; परंतु तिकिटावर मात्र प्रारंभीचे स्थानक आणि मला बस पकडण्याचे स्थानक यांची एकच वेळ दाखवली होती. ही वेळ कल्याण आणि डोंबिवली येथून एकच वेळ दाखवली होती. त्यामुळे मला थोडा संभ्रम वाटला. वाहतूक नियंत्रक कक्षाशी याविषयी संपर्क साधला आणि ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, तिकिटावर वेळ आहे, तर ती धरून चला. या दोन्ही वेळांमध्ये २० मिनिटांची तफावत होती. यानंतर मात्र गाडी वेळेत सुटली नाहीच. दुपारी ५ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी गाडी सायंकाळी ६.३० वाजता सुटली. या संदर्भात वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क केला आणि विचारले. त्या वेळी त्यांनी सांगितले की, जी गाडी पुण्याहून येईल तीच सुटेल. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने तिथे असणार्‍या वाहतूक नियंत्रक यांना विचारले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘५ मिनिटांत गाडी सुटेल.’’ मग त्यांना ‘गाडी विलंबाने का सुटत आहे ?’, हे विचारले. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘गाडीचा चालक अनुपस्थित असल्याने सोडण्यास विलंब झाला. या ‘शिवशाही’ बसगाड्या कंत्राटी पद्धतीने चालवल्या जातात. त्यामुळे जर चालक अनुपस्थित राहिल्यास पुन्हा आम्हालाच व्यवस्था करून गाडी सोडावी लागते. त्यामुळे विलंब होतो. यासाठी २ कंत्राटदार होते; त्यापैकी एकाचे कंत्राट रहित केले आहे. आता एकच कंत्राटदार आहे.’’ तोपर्यंत दुपारचे ५.१५ आणि ५.४५ या २ गाड्यांचे प्रवासी तिथे जमले होते. ५ मिनिटांनी बस आली. त्या वेळी वाहतूक नियंत्रकांनी सांगितले की, दोन्ही वेळेच्या गाडीचे प्रवासी या गाडीतून पाठवणार आहे. त्यानुसार त्यांनी प्रवाशांना बसमध्ये बसवले. गाडीला कल्याण ते डोंबिवली या प्रवासासाठी १५ मिनिटे लागतात. त्यासाठी १ घंटा लागला. याला कारणही झाले ते, म्हणजे गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी पुन्हा गाडी एका खासगी पेट्रोलपंपावर नेण्यात आली, तसेच खराब रस्ते आणि रस्त्यावरील गर्दी यांमुळे झालेली वाहतूक कोंडी. या सर्व प्रकारानंतर वाकड येथे बस रात्री ११ वाजता पोचली.

प्रसंगातून लक्षात आलेली सूत्रे

१. प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया गेला. या गाडीतून साधारण ३० प्रवासी होते, त्यांचा एवढा वेळ वाया गेला.

२. ‘शिवशाही’ बससेवा ही कंत्राटी पद्धतीने चालू आहे आणि कंत्राटदाराला महामंडळाकडून प्रति प्रवासानुसार (ट्रीप) मोबदला दिला जातो.

३. प्रवासी संख्येवर मोबदला नसल्याने महामंडळाचा तोटा होतो. परिणामी जनतेला याचा भुर्दंड बसतो.

४. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या बसमधून प्रवास करतांना त्यांची अधिक गैरसोय होऊ शकते.

५. ऑनलाईन तिकीट यंत्रणा सक्षम नसल्याने वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. उदा. कोणत्याही मधल्या प्रवासाचे तिकीट मिळू शकत नाही; पण अशी सुविधा आगाऊ तिकीट आरक्षण न करता जर प्रवास केला, तर उपलब्ध आहे, म्हणजे अप्रत्यक्ष ‘ऑनलाईन बुकिंग’च्या माध्यमातून जनतेची फसवणूक तर होत नाही ना ? असा प्रश्न पडतो. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

– श्री. सुनील ओजाळे, चिंचवडगाव, जिल्हा पुणे.

कल्याण ते पनवेल ‘शिवशाही’ बसप्रवासातील त्रासदायक अनुभव

श्री. यज्ञेश सावंत

मी जानेवारी २०२३ मध्ये कल्याण बसस्थानक येथून ‘शिवशाही’ बसने सहकुटुंब पनवेल येथे प्रवास केला. कल्याण ते स्वारगेट (पुणे) अशी बस होती. ‘पनवेल बसस्थानक येथे बस जाणार का ?’, असे बसवाहकास मी विचारल्यावर त्याने ‘पनवेलला बस जाणार नाही. कळंबोली येथेच उतरावे लागेल’, असे सांगितले. त्यानुसार तिकीट काढून बसमध्ये बसलो. बस कळंबोली जवळ आल्यावर ती पनवेलच्या दिशेने पुढे जाऊ लागली. तेव्हा बसवाहकाच्या माहितीनुसार बस कळंबोलीहून पुण्याला जाणार असल्याने मी सहप्रवाशांना ‘बस पनवेल येथे जाणार आहे का ?’, असे विचारले. तेव्हा कुणालाही काही लक्षात येत नव्हते. तेव्हा बसचालकाने ‘कळंबोलीचे तिकीट काढलेल्यांनी तेथेच उतरावे’, असे सांगितले. तेव्हा मी पुढे जाऊन त्यांना ‘बस पनवेल येथे जाणार का ? असे तुम्हाला आधी विचारले होते. तुम्ही जाणार नाही, असे सांगितले. आम्हाला तेथेच जायचे आहे’, असे सांगितले. तेव्हा बसचालक काही ऐकायलाच सिद्ध नव्हता. ‘तुम्ही येथेच उतरा. अन्यथा बस पुढे जाणार नाही’, अशी धमकीच दिली. मी त्याला ‘माझ्यासमवेत वयस्कर व्यक्ती आहेत, कळंबोली ते पनवेल अंतर ६ किलोमीटर आहे, तर एवढा लांबचा प्रवास पुन्हा आम्हाला वाहनाची शोधाशोध करावी लागेल’, असे समजावत होतो. तेव्हा त्यांनी ‘पुढच्या प्रवासाचे तिकीट काढा’, असे सांगितले. ‘तिकीट काढू शकतो, काही अडचण नाही; मात्र अडवणूक कशाला करता ?’, असे सांगितले. त्यांच्याकडून तिकीट काढून नंतर बस पनवेल बसस्थानकात आल्यावर मी उतरून थेट वाहतूक नियंत्रण कक्षात गेलो. त्यांना ‘शिवशाही’ बसचालकाच्या वर्तनाविषयी सांगितले; चालकाला त्याचे नाव विचारण्यास आणि त्याचे आणि बसचे छायाचित्र काढण्यास मी पुन्हा गेल्यावर अन्य सहप्रवाशीही चालकावर चिडलेले दिसले. ‘कल्याण ते पनवेल हे अंतर पार करण्यास चालकाने पावणेचार घंटे लावले. (एरव्ही सव्वा २ घंटे लागतात.) ‘आता पुण्यात आम्ही पोचणार केव्हा ?’, असे बोलत प्रवाशांनी चालकाला धारेवर धरले होते. बस वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांना चालकाचे नाव सांगितल्यावर त्यांनी ‘तुम्हाला मध्येच उतरण्यास सांगायला नको पाहिजे होते. तुम्ही उतरला नाही, हे बरे केले. आम्ही त्यांना समज देऊ’, असे सांगितले. तेव्हा तेथून मी निघालो.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

साधक, वाचक, हितचिंतक, अर्पणदाते, राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना आवाहन

बस प्रवास, वाहक आणि चालक यांच्याविषयी लेखात दिल्याप्रमाणे कुणाला काही चांगले आणि कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

स्वतःचे अनुभव कळवण्यासाठी आणि ‘सुराज्य अभियान’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सुराज्य अभियान

टपालाचा पत्ता – श्री. अभिषेक मुरकटे, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संपर्क : ९८६७५५८३८४

संगणकीय पत्ता : socialchange.n@gmail.com