अन्न ग्रहण करतांना चमच्याचा वापर करण्याऐवजी ते हाताने ग्रहण करणे श्रेयस्कर ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

‘अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. आपण कोणते आणि कशा प्रकारे अन्न ग्रहण करतो ? याचा आपले शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर परिणाम होतो. हिंदु धर्मात अन्न ग्रहण करण्याला ‘यज्ञकर्म’ मानले आहे. यज्ञ करतांना ज्या प्रकारे हाताने आहुती दिली जाते, त्याच प्रकारे अन्न ग्रहण करतांना ते हाताने ग्रहण करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे; परंतु सध्याच्या काळात चमच्याने जेवण्याची मानसिकता सर्वत्र दिसून येते. हाताने अन्न ग्रहण करण्याचे सात्त्विकतेच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. आपण करत असलेल्या विविध कृतींचा आपल्या सूक्ष्म-ऊर्जेवर परिणाम होत असतो.

‘चमच्याने किंवा हाताने अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाचा उपयोग करण्यात आला.

१. चाचणीतील निरीक्षणे

या चाचणीत २ व्यक्तींना (तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ व्यक्ती आणि त्रास नसलेली १ व्यक्ती यांना) एकाच प्रकारचे अन्न पहिल्या दिवशी चमच्याने अन् दुसर्‍या दिवशी हाताने ग्रहण करण्यास सांगण्यात आले. दोन्ही दिवशी अन्न ग्रहण करण्यापूर्वी आणि अन्न ग्रहण केल्यानंतर २० मिनिटांनी दोघांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

टीप – सध्याचा काळ अतिशय रज-तमप्रधान असल्याने व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांच्यावर रज-तमात्मक (त्रासदायक) स्पंदनांचे आवरण येते. त्यामुळे चाचणीतील आध्यात्मिक त्रास नसलेल्या व्यक्तीमध्येही त्रासदायक स्पंदने आढळून आली. या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होण्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन स्वतःवरील आवरण अधून-मधून काढणे आवश्यक आहे. आवरण काढण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करू शकतो, उदा. विभूती लावणे, गोमूत्र शिंपडणे, स्तोत्र म्हणणे किंवा ऐकणे, नामजप करणे इत्यादी.

१ अ. चमच्याने अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढणे : वरील निरीक्षणांवरून लक्षात येते की, चमच्याने अन्न ग्रहण केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली. तसेच आध्यात्मिक त्रास नसणार्‍या व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

१ आ. हाताने अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे किंवा तिच्यात वाढ होणे : वरील निरीक्षणांवरून लक्षात येते की, हाताने अन्न ग्रहण केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली, तसेच तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् आध्यात्मिक त्रास नसणार्‍या व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. चाचणीचे निष्कर्ष

चमच्याने अन्न ग्रहण केल्याने दोन्ही व्यक्तींच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाले. याउलट त्यांनी हाताने अन्न ग्रहण केल्यावर त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाले. यातून चमच्याने अन्न ग्रहण करणे हानीकारक, तर हाताने अन्न ग्रहण करणे लाभदायक असल्याचे सिद्ध होते.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. हाताने (बोटांद्वारे) अन्न ग्रहण करण्याचे महत्त्व : ‘चमच्याने अन्न तोंडात घालतांना त्या चमच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते; पण बोटांनी अन्न ग्रहण करतांना बोटांमध्ये कार्यरत असणारी ईश्वरी शक्ती अन्नाद्वारे पोटात जाते. तळहातातून हाताच्या बोटांत नेहमी ईश्वरी शक्तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होत असते. हाताच्या बोटांद्वारे अन्न ग्रहण करतांना बोटांचा पुनःपुन्हा तोंडाला स्पर्श होतो. तेव्हा तोंडाला स्पर्श होणार्‍या बोटांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण तळहातातील ईश्वरी शक्तीमुळे नष्ट होते, तसेच जिवाला ईश्वरी शक्तीचा लाभ होतो आणि हाताची बोटेही ईश्वरी शक्तीने भारित होतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘भोजनाच्या वेळचे आणि नंतरचे आचार’)

३ आ. हाताने अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यामागील कारण : योगशास्त्रानुसार मानवाच्या हाताची ५ बोटे, म्हणजे अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी ही बोटे अनुक्रमे आकाश, वायु, तेज, आप आणि पृथ्वी या पंचतत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. हाताने अन्न ग्रहण करतांना आपण हाताची पाचही बोटे जुळवून अन्नाचा घास तोंडात घेतो, तेव्हा बोटांच्या माध्यमातून पंचतत्त्वांची शक्ती (चैतन्य) मिळते. चाचणीतील व्यक्तींना हाताने अन्न ग्रहण करतांना चैतन्य मिळाल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन सकारात्मक ऊर्जा वाढली.

३ इ. चमच्याने अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जा वाढण्यामागील कारण : हाताने अन्न ग्रहण केल्यानंतर मन तृप्त होऊन पोट भरल्यासारखे जाणवते. याउलट चमच्याने अन्न ग्रहण केल्याने मन तृप्त होत नाही. हाताने अन्न ग्रहण केल्यावर आध्यात्मिक लाभ होतात, तसे चमच्याने अन्न ग्रहण केल्यावर होत नाहीत. चाचणीतील दोन्ही व्यक्तींनी चमच्याने अन्न ग्रहण केल्यावर त्यांच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण वाढले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे आणि श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.१०.२०२३)

इ-मेल : mav.research2014@gmail.com

– सौ. मधुरा धनंजय कर्वे आणि श्री. गिरीश पंडित पाटील

वाचकांना आवाहन

अन्न ग्रहण करतांना चमच्याचा वापर करणे टाळून हाताने अन्न ग्रहण करा !

‘चमच्याने अन्न ग्रहण केल्याने व्यक्तीमधील त्रासदायक स्पंदनांमध्ये भरीव वाढ होते आणि सकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी होते. याचा नकारात्मक परिणाम कालांतराने व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. चाचणीतील दोन्ही व्यक्तींवर केवळ एकदाच चमच्याने अन्न ग्रहण केल्याने त्यांच्यावर किती नकारात्मक परिणाम झाला, हे आपण वाचले. जे लोक प्रतिदिन चमच्याने अन्न ग्रहण करतात, त्यांच्यावर किती नकारात्मक परिणाम होत असेल, याची कल्पनाच करवत नाही. अन्न ग्रहण करतांना चमच्याचा वापर करण्याऐवजी हाताने अन्न ग्रहण करणे श्रेयस्कर ! काही कारणाने आपत्कालीन परिस्थितीत चमच्याने अन्न ग्रहण करणे अपरिहार्य असेल, तेव्हा इष्टदेवतेला भावपूर्ण प्रार्थना करून नामजप करत अन्न ग्रहण करावे. एरव्ही हाताने अन्न ग्रहण करतांनाही प्रार्थना करून नामजप करत अन्न ग्रहण करावे, त्यामुळे होणारे आध्यात्मिक लाभ वृद्धींगत होतील.’

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.