ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी प्रवास करतांना साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !
‘पुढे येणार्या आपत्काळात प्रवासासाठी सर्वांची सोय कशी करावी ?’, हे या लेखातून कळेल; म्हणून सर्वांनी या लेखाचा अभ्यास करावा आणि त्याविषयी अभ्यासवर्ग घ्यावेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
(भाग ५)
१. कु. सृष्टी सूर्यवंशी, वर्तकनगर, ठाणे.
अ. ‘बसचा प्रवास १० घंट्यांचा होता, तरीही साधक प्रवासाच्या आरंभापासून शेवटपर्यंत आनंदी आणि उत्साही होते.
आ. ‘ब्रह्मोत्सवानिमित्त साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असलेली स्मृतीचिन्हे (बॅच) मिळणार आहेत’, असे उत्तरदायी साधकांनी सांगितले. त्या वेळी सर्व जण भावस्थिती अनुभवत होते.
इ. बसमध्ये समोर लावलेल्या हनुमंताच्या चित्रात त्याचे अस्तित्व जाणवत होते. ‘हनुमंत सतत आमच्या समवेत आहे’, असे आम्हाला वाटत होेते.’
२. सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५१ वर्षे), नौपाडा, ठाणे.
२ अ. ‘प्रवासाच्या कालावधीत मला पुष्कळ आनंद जाणवत होता. माझ्याकडून श्रीविष्णुस्मरण अखंड होत होते.
२ आ. ‘हा भूलोकातील प्रवास नसून विष्णुलोकातील एका पोकळीमध्ये तो चालू आहे’, असे मला जाणवत होते.
२ इ. माझे शरीर आणि मन यांवरचे जडत्व नष्ट होऊन मला हलकेपणा जाणवत होता. ‘मी हवेत तरंगत आहे’, असे मला वाटत होते.
२ ई. १६ – १७ घंटे प्रवास करूनही माझे शरीर आणि मन प्रफुल्लित होते.
२ उ. ‘बसचालकाच्या बाजूला असलेली भिंगरी, म्हणजे सुदर्शनचक्रच असून ते प्रवास करणार्या साधकांच्या मार्गातील अडथळे दूर करत आहे’, असे जाणवणे : आम्ही ज्या बसमध्ये बसलो होतो, त्या बसमध्ये बसचालकाच्या बाजूला एक भिंगरी ठेवली होती. ‘ती भिंगरी, म्हणजे सुदर्शनचक्रच आहे’, असे मला वाटत होते. तिच्याकडे बघून माझी भावजागृती होत होती. ‘जणूकाही श्रीकृष्णाने सर्व साधकांच्या रक्षणासाठी सुदर्शनचक्र पाठवले आहे. हे सुदर्शनचक्र ब्रह्मोत्सवासाठी प्रवास करणार्या साधकांच्या मार्गातील अडथळे आणि त्यांच्या भोवतालचे आवरण दूर करून श्रीविष्णूचा नामजप वातावरणात प्रक्षेपित करत आहे’, असे जाणवून मला कृतज्ञता वाटत होती. मी बसमधील सगळ्या साधकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनीही तसा भाव ठेवला आणि सुदर्शनचक्राला प्रार्थना केली.
२ ऊ. भक्तीगीतांमधील भाव अनुभवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यातून आनंद मिळणे : प्रवासात आम्हाला सांगितल्याप्रमाणे ‘भक्तीगीत ऐकणे, त्यातील भाव अनुभवणे, भावजागृतीचा प्रयोग घेणे, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे’, असे अखंड चालू होते. सर्व जण भक्तीमय गीते ऐकत असतांना त्या गीतांमधील भाव अनुभवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सर्वांना एक वेगळाच आनंद जाणवत होता.
२ ए. ‘आपण स्वतः गुरुदेवांच्या हातातील बाजूबंद आहोत’, असा भाव ठेवल्यावर आलेल्या अनुभूती !
२ ए १. ‘गुरुदेवांनी आपल्याला आपल्या गुण-दोषांसह स्वीकारले आहे’, असे वाटून आनंद होणे : बसमध्ये आम्ही सर्व एक ‘भावखेळ’ खेळलो. ‘एका साधकाने दुसर्या साधकाला गुरुदेवांच्या व्यासपिठावरील अथवा त्यांच्या देहावरील एक अलंकार किंवा वस्तू सांगणे आणि दुसर्या साधकाने ‘ती आपण स्वतः आहोत’, असा भाव ठेवणे’, अशा प्रकारचा तो खेळ होता. हा ‘भावखेळ’ खेळतांना सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती आल्या. मला ‘मी गुरुदेवांच्या हातातील बाजूबंद आहे’, असा भाव ठेवायला सांगितला होता. तसा भाव ठेवल्यावर ‘गुरुदेवांनी मला धारण केले आहे, म्हणजे माझ्यातील गुण-दोषांसह मला स्वीकारले आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद होत होता.
२ ए २. ‘ईश्वराशी समीपता कशी असते ?’, हे अनुभवता येऊन भावजागृती होणे : मी ‘गुरुदेवांच्या हातातील बाजूबंद आहे’, असा भाव ठेवल्यामुळे मला ‘ईश्वराशी समीपता कशी असते ?’, हे काही क्षण अनुभवता आले. त्या वेळी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया । …’, या ओळी आठवून माझी भावजागृती होत होती.
२ ए ३. ‘तुमच्या चरणी एकरूप करून घ्या’, ही बाजूबंदाची प्रार्थना ऐकून गुरुदेवांनी ‘तथास्तु’, असे म्हटल्याचे जाणवणे : ‘बाजूबंद गुरुदेवांची सेवा अतिशय नम्रतेने करत आहे. तो गुरुदेवांना ‘तुमच्या चरणी एकरूप करून घ्या’, अशी प्रार्थना करत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी गुरुदेवांनी बाजूबंदाकडे हसून पाहिले आणि ते ‘तथास्तु’, असे म्हणाले. ‘हे सर्व माझ्या आत कुठेतरी चालू आहे आणि गुरुदेव माझ्या जवळच आहेत’, असे मला सातत्याने जाणवत होते. त्यांचे मधुर हास्य पुनःपुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होते.
२ ऐ. सद्गुरु अनुताई (सद्गुरु अनुराधा वाडेकर) आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांनी साधनेविषयी सांगितलेल्या सूत्रांचे संपूर्ण प्रवासात मला पुनःपुन्हा स्मरण होत होते.
२ ओ. ‘प्रत्येक साधक म्हणजे एक फूल आहे आणि संत त्या साधकाला गुरुचरणी अर्पण करत आहेत’, असा भाव ठेवल्याने मला एक वेगळाच आनंद जाणवला.
२ औ. ‘हा सोहळा माझ्या हृदयमंदिरात चालू आहे’, असे वाटून माझे मन पुनःपुन्हा भरून येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. मला भावजागृतीचे नवीन प्रयोग आपोआप सुचत होते.
२ अं. कोल्हापूर येथे वाहन पोचल्यावर साधकांनी श्री महालक्ष्मीदेवीला भावपूर्ण प्रार्थना करणे आणि त्या वेळी त्यांची भावजागृती होणे : बस कोल्हापूर शहरात पोचल्याचे समजल्यावर अकस्मात् आतून मला ‘आता आपण करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना करूया’, असे लक्षात आले. त्या वेळी मी सर्वांना तसे सांगितले आणि आम्ही सर्वांनी आर्तभावाने प्रार्थना केली, ‘हे महालक्ष्मीदेवी, आम्हाला तुझ्याच कृपेने श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींचे प्रत्यक्ष दर्शन होणार आहे. हे माते, आमच्याकडून श्रीविष्णूचे स्मरण अखंड होऊ दे. आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलींची सेवा करून घे.’ प्रार्थना करत असतांना साधकांची भावजागृती होत होती. त्यानंतर आम्ही महालक्ष्मीमातेचा जयघोष केला आणि ‘सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।’ हा श्लोक एकत्रितपणे म्हटला. त्या वेळी आम्ही सर्वांनी ‘श्री महालक्ष्मीमातेच्या देवळात उभे राहून ही प्रार्थना करत आहोत’, असा भाव ठेवला होता.
२ क. सोहळ्याच्या दिवशी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेले स्मृतीचिन्ह (बॅच) लावतांना ठेवलेला भाव ! : त्यानंतर सोहळ्याच्या दिवशी आम्हाला बसमध्येच परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेली स्मृतीचिन्हे (बॅच) देण्यात आली. त्या वेळी त्यांच्याकडे बघून सगळ्यांची भावजागृती झाली. ‘हे स्मृतीचिन्ह (बॅच) आपल्याकडे कायमस्वरूपी रहाणार आहे’, असे उत्तरदायी साधकांनी सांगितल्यावर सगळ्यांनी त्याला भावपूर्ण नमस्कार केला. ‘ज्याप्रमाणे आपण श्रीकृष्णाला कुठलीही वस्तू अर्पण करतांना तिच्यावर तुळशीपत्र ठेवतो, त्याचप्रमाणे हे स्मृतीचिन्ह, म्हणजे तुळशीपत्र आहे आणि ते मी देहावर ठेवणार आहे, म्हणजेच हा देह, मन अन् बुद्धी आता गुरुदेवांच्या चरणी अर्पण झाले आहे, म्हणजे आता हे सर्व गुरुदेवांचे झाले आहे’, असा भाव ठेवल्याने सर्वांनाच आनंद झाला. सर्वांनी भावपूर्णरित्या ‘बॅच’ लावला.’
३. सौ. छाया प्रदीप अहिरे, कोलशेत, ठाणे.
३ अ. सामूहिक नामजप करतांना तो सहजतेने आणि एका लयीत होणे : ‘आम्ही सकाळी बसमध्ये बसलो, तेव्हा माझे मन शांत होते. प्रार्थना आणि जयघोष करून आमचा बसप्रवास चालू झाला. आम्ही सर्व साधक सामूहिकरित्या नामजप करू लागलो. त्या वेळी माझा नामजप सहजतेने आणि एका लयीत होत होता. माझ्याकडून असा जप घरी कधीही होत नाही.
३ आ. माझ्या आयुष्यात मी प्रथमच असा आध्यात्मिक प्रवास अनुभवला. आताही या प्रवासाची आठवण झाली, तरी माझे मन उल्हसित आणि आनंदी होते.’
४. सौ. स्नेहल विलास गुरव, परळ, मुंबई.
अ. ‘सर्व साधकांना ‘कार्यक्रमस्थळी वेळेत पोचायचे आहे आणि गुरुमाऊलींचे दर्शन घ्यायचे आहे’, हा एकच ध्यास लागला होता.
आ. बस कार्यक्रमस्थळी पोचल्यावर एका साधकाने ‘ज्या क्षणाची वाट पहात होतो, तो क्षण आलेला आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्या वेळी सर्व साधकांची पुष्कळ भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले.’ (क्रमशः पुढच्या रविवारी)
संग्राहक : कु. वैभवी सुनील भोवर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), सौ. ऋचा किरण सुळे आणि सौ. मानसी जोशी, मुंबई. (११.६.२०२३)
लेखाचा भाग ६ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/740843.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |