संयुक्त राष्ट्रेच गाझातील परिस्थितीला उत्तरदायी ! – इस्रायल
संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही शक्तीने गाझाचे नियंत्रण घेतल्यास विरोध करण्याचीही चेतावणी !
तेल अविव (इस्रायल) – हमासचा नायनाट केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय शक्तीने गाझाचे नियंत्रण घेतल्यास त्याला इस्रायल विरोध करेल. ‘सध्याच्या गाझातील परिस्थितीला संयुक्त राष्ट्रेच उत्तरदायी आहेत’, असे आम्ही मानतो, असे गंभीर आरोप इस्रायलने केले आहेत. इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत गिलाद एर्डन यांनी इस्रायलमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वरील भूमिका मांडली.
एर्डन पुढे म्हणाले की…
१. संयुक्त राष्ट्रांनीच हमासला इस्रायल आणि जगाच्या विरोधात गाझाचा उपयोग ‘युद्ध यंत्र’ म्हणून करण्यास मोकळीक दिली.
२. युद्ध जिंकल्यावर संयुक्त राष्ट्रांसमवेतच्या संबंधांवर इस्रायलने गंभीरपणे विचार केला पाहिजे.
३. संयुक्त राष्ट्रांतील जे लोक त्यांच्या पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्या अधिकार्यांचा ‘व्हिसा’ नाकारला पाहिजे. ते हमासने केलेली निराधार वक्तव्ये प्रसारित करत आहेत. त्यांच्यामुळेच गेल्या १६ वर्षांपासून हमास संयुक्त राष्ट्रांच्या उपस्थितीत अनेक भयंकर गोष्टी करत आहेत.
गाझाच्या भविष्याविषयी अरब देशांशी चर्चा करू !
हमासला नष्ट केल्यानंतर आम्ही गाझाच्या भविष्याच्या संदर्भात अरब देशांशी चर्चा करू. मुळात अरब देशांसाठीही आम्ही हमासची घाण स्वच्छ करण्याचे काम करत आहोत. मला निश्चिती आहे की, हमास जसा आमचा शत्रू आहे, तसाच तो अनेक अरब देशांचीही शत्रू आहे, असे वक्तव्यही गिलाद एर्डन यांनी केले.
संपादकीय भूमिकातत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत उपस्थित झाला आणि ते भिजत घोंगडे झाले. हे ठाऊक असल्यानेच कदाचित् इस्रायल संयुक्त राष्ट्रांना ठणकावत आहे ! यावरून आता भारतानेही संयुक्त राष्ट्रांना न जुमानता संपूर्ण काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैनिकी कारवाई हाती घ्यावी ! |