Artificial Rain Mumbai : मुंबईत कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी लवकरच निविदा काढणार ! – डॉ. सुधाकर शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची माहिती
मुंबई – वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर देहलीप्रमाणे मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. ‘येत्या १५ ते २० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊन १५ डिसेंबरनंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. दुबईत वारंवार कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो. आमचे तंत्रज्ञ तेथील तज्ञांच्या संपर्कात आहेत’, असेही शिंदे या वेळी म्हणाले.
एकदा कृत्रिम पाऊस पाडल्यानंतर १५ दिवस प्रदूषणापासून सुटका मिळू शकते. प्रदूषणासाठी पाऊस पाडण्याचा एका वेळचा खर्च ४० ते ५० लाख रुपये इतका आहे, तसेच या प्रक्रियेत पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्के इतकीच आहे. वातावरण, वेळ, प्रयोगाच्या ठिकाणाचे वातावरण आणि ढगांची उपस्थिती यांवरच कृत्रिम पावसाचा प्रयोग अवलंबून आहे, असे सांगितले जाते.