प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवा ! – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांचा आदेश
उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाईची चेतावणी !
पिंपरी (जिल्हा पुणे) – सद्यःस्थितीत शहरात अनेक मोठे बांधकाम प्रकल्प चालू आहेत. अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्याविषयी महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याला अनुसरून शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवावीत, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे, तसेच सर्व बांधकामे चालू असलेल्या ठिकाणी दिवसा आणि रात्रीची ध्वनी अन् धुळीची पातळी नियंत्रित ठेवावी, अन्यथा प्रतिचौरस मीटर १० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाईची चेतावणीही त्यांनी दिली आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महापालिकेस हवेची गुणवत्ता सुधारणे, संरक्षण, पुरवठा आणि पाण्याचे व्यवस्थापन अन् कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन उपाय यांसाठी निधी संमत केला आहे.
महापालिकेच्या ‘राष्ट्रीय शुद्ध हवा अभियानां’तर्गत शहर कृती आराखड्यास (सिटी अॅक्शन प्लॅन) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संमती प्राप्त झाली आहे. त्यानुसार शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची ‘रोड वॉशर सिस्टीम’ (रस्ते धुण्याची यंत्रणा) असलेल्या २ वाहनांद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील धुलीकणांचे प्रमाण अल्प होणार आहे. मुख्य चौकांचे हवा प्रदूषण अल्प करण्यासाठी ‘मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन’ प्रणाली (धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरायची यंत्रणा) ५ वाहनांवर बसवली असून ती यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांना वायूप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार उपाययोजना करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.