दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुर्हाड दाखवून दहशत माजवणारा अटकेत !; मित्राला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करणार्याला अटक !…
कुर्हाड दाखवून दहशत माजवणारा अटकेत !
डोंबिवली – येथील विष्णुनगर परिसरात एक तरुण रात्री २ वाजता कुर्हाड घेऊन रस्त्यावर फिरत होता. पादचारी, रिक्शाचालक यांना कुर्हाडीचा धाक दाखवून त्याने रिक्शाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी नीलेश शिंगारे याला अटक केली आहे.
कायदा-सुव्यवस्था नष्ट झाल्याचे दर्शवणार्या घटना !
मित्राला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करणार्याला अटक !
डोंबिवली – टपरीवर चहा पिणार्या मित्राला ‘काळ्या’ अशी हाक मारल्यावर त्याने रागाच्या भरात मित्राला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्याच्याकडील रक्कम हिसकावून पसार झाला. अक्षय उपाख्य सोनू दाते असे दहशत माजवणार्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार रोहित भालेराव याला अटक केली आहे. सोनू हा सराईत गुन्हेगार असून त्याला दोन वर्षांसाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
तरुणाला मारहाण करणार्यांविरोधात गुन्हा नोंद !
मुंबई – रस्त्याने जाणार्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन ४ जणांनी पलायन केले. मुलुंड परिसरात ही घटना घडली. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शुभम परमार, जिग्नेश परमार, राहुल वाघेला आणि आकाश मोरे अशी चौघांची नावे आहेत. यापैकी तीन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
तरुणीचा विनयभंग करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
जळगाव – शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून पायी जाणार्या तरुणीचा विनयभंग करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित निखिल पाटील याने तिचा पाठलाग केला. तिच्याजवळ येऊन त्याने तरुणीचा हात पकडून विनयभंग केला.
अशांना कठोर शिक्षाच हवी !
बेशिस्त वागणार्या रिक्शाचालकाचा परवाना रहित !
मुंबई – महिला प्रवाशांसमवेत बेशिस्त वर्तणूक, भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे भाडे न आकारणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार करणार्या दिनेश फडके या रिक्शाचालकाचा पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतूक परवाना रहित केला आणि २२ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रिक्शाचालकांच्या मनमानीवर असेच नियंत्रण मिळवायला हवे !