तापामध्ये दही का खाऊ नये ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५१
‘चूल पेटवायची असल्यास आपण थेट लाकडाच्या मोठ्या ओंडक्याला काडी लावत नाही; कारण तसे केल्यास अग्नी पेटणार नाही. त्याप्रमाणे तापामध्ये शरिरातील पचनशक्ती मंद असतांना पाव, बिस्कीट, पोळी, दही, डोसा यांसारखे पचायला जड पदार्थ खाऊन शरिराला काहीच लाभ होत नाही. उलट हे पदार्थ न पचल्याने अपायच जास्त होतो. ‘दह्यामध्ये प्रथिने जास्त असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्यक असते’, या अर्धसत्य ज्ञानामुळे कोरोनाच्या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्ती मंदावून फुप्फुसांमध्ये पाणी होऊन रुग्ण अत्यवस्थ झाल्याची अनेक उदाहरणे वैद्यांच्या लक्षात आली. अशा रुग्णांचे दही बंद करून त्यांचा आहार अग्नी (पचनशक्ती) वाढवण्यास पूरक असा केल्यावर रुग्ण लवकर बरे होऊ लागले. थोडक्यात एखादा पदार्थ कितीही पौष्टिक असला, तरी शरिरातील अग्नीने तो पचवला, तरच पौष्टिक ठरतो. दही पौष्टिक असले, तरी ते तापामध्ये खाऊ नये; कारण तापामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan