…अशा विज्ञापनांवर बंदीच हवी !
सध्या ‘हॉटस्टार कंपनी’च्या ‘लाईव्ह स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म’वर विश्वचषक क्रिकेट सामने चालू आहेत. एकाच वेळी ३ ते ४ कोटी लोक हे सामने पहात असतात. सामन्याच्या दोन षटकांमधील वेळेत ‘लॉटे इंडिया’ आस्थापनाच्या ‘लॉटे चोको पाय’ या चॉकलेट बिस्किटांची २ विज्ञापने सातत्याने झळकत आहेत. ज्यामध्ये १२-१३ वर्षांचा एक मुलगा आणि तेवढ्याच वयाची मुलगी एकमेकांत संवाद करतांना दिसतात. एका विज्ञापनामध्ये मुलगी मुलाला ‘लॉटे चोको पाय’चे एक बिस्कीट देतांना म्हणते, ‘आय केअर फॉर यु लॉट.’ (मला तुझी पुष्कळ काळजी आहे.) तेवढ्यात बाजूने मुलाची आई जातांना दिसते; म्हणून ती मुलगी ‘लॉट’च्या जागी ‘लॉटे’ हा शब्द मोठ्याने उच्चारते. त्यावर मुलगाही तिच्या मनातील भावना ओळखून ‘आय ऑलरेडी फिलिंग लॉटे बेटर’ (मला आधीपासूनच पुष्कळ बरे वाटत आहे.) म्हणतो. दुसर्या विज्ञापनामध्ये मुलगा मुलीला नाव घेऊन म्हणतो ‘आय लाईक यु लॉट’(मला तू पुष्कळ आवडतेस) आणि पुन्हा ‘लॉट’चे ’लॉटे’ करतो. मुलगीही त्याच्या मनातील भावना ओळखून ‘थँक्स अ लॉटे’ (धन्यवाद) म्हणते. दोन्ही विज्ञापनांच्या नंतर दोघांच्या मध्ये बदामाच्या आकाराचे चिन्ह येते, ज्यामध्ये ‘लव्ह अँड लॉटे’ लिहिलेले असते. या विज्ञापनांमधील दोन्ही मुलांच्या चेहर्यावरील हावभाव हे नव्याने प्रेमात पडलेल्या मुलामुलींसारखे दाखवण्यात आले आहेत.
संस्कारक्षम वयात असे विज्ञापन कितपत योग्य ?
हे विज्ञापन गेली अनेक दिवस प्रतिदिन कोट्यवधी लोक पहात आहेत. ‘लॉटे चोको पाय’चे हे विज्ञापन १२-१३ वर्षांच्या मुलामुलींच्या तोंडी अशा प्रकारचे संवाद देऊन मुलांना शालेय वयात प्रेमाचे अंकुर फुलवण्यास खुलेआम प्रोत्साहन देत आहे. ज्या वयात मुलांनी शालेय अभ्यासात लक्ष केंद्रित करावे, खेळ आणि कलागुण यांमध्ये कौशल्य प्राप्त करावे, त्या वयात ‘लॉटे चोको पाय’ प्रेमाचे चाळे करण्याचे आवाहनाच जणू हे विज्ञापन करत आहे. लहान मुलांचे वय हे संस्कारक्षम असते. आपल्याच वयाच्या मुलामुलींना अशा प्रकारच्या विज्ञापनामध्ये असले प्रकार करतांना पाहून कुणी प्रत्यक्षातही तसे प्रयत्न करू शकतात. असे घडल्यास पालक आपल्या मुलांना कसे हाताळणार आहेत ? ‘शालेय वयातही प्रेम करता येते, प्रेमाची विचारणाही करता येते आणि समोरून सकारात्मक प्रतिसादही मिळू शकतो’, असा संदेशच हे विज्ञापन देत आहे.
मुलांवर नैतिकतेचे संस्कार होणे आवश्यक !
सध्याची देशाची स्थिती पहाता स्त्री अत्याचाराचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर आक्रमणे होत आहेत, लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत, कुमारी मातांचे प्रमाण वाढत आहे, प्रेमात अपयश आल्याने मुलामुलींकडून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. शालेय वयात मुलांच्या हाती आलेले ‘स्मार्टफोन’ आणि त्यावर इंटरनेटचा होणारा सुमार वापर यांमुळे मुलांना नैतिक-अनैतिक यांमधील भेद कळेनासा झाला आहे. शहरासारख्या ठिकाणी आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर राहिल्याने मुलांवर नैतिकतेचे हवे तसे संस्कार होतच नाहीत. शालेय अभ्यासक्रमात नीती आणि नैतिक मूल्ये विषय शिकवणे अनिवार्य केले असले, तरी अनेक शाळांमध्ये या विषयासाठी शिक्षकच नेमले नसल्याने मुलांवर शाळेमध्ये सुद्धा नैतिकतेचे संस्कार होत नाहीत. अशा परिस्थितीत स्वतःचे उत्पादन खपवण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये प्रेमाच्या (कि शारीरिक आकर्षणाच्या ?) भावना जागवणार्या विज्ञापनांवर तत्परतेने बंदी आणायला हवी !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (१६.११.२०२३)