हिंदूंच्‍या संघटनासाठी साधना आवश्‍यक ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

‘भीमाशंकर पाटीदार सनातन समाजा’च्‍या वतीने आंबेगाव (पुणे) येथे कार्यक्रम !

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांचा सत्‍कार करतांना सौ. गंगाबेन पटेल, त्‍यांच्‍या बाजूला पाटीदार समाजाचे प्रमुख श्री. चंदूलाल पटेल आणि मागे युवा प्रमुख विनोद भाई पटेल

आंबेगाव (जिल्‍हा पुणे), १७ नोव्‍हेंबर (वार्ता.) – सद्य:स्‍थितीत महिलांवर होणार्‍या अत्‍याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लव्‍ह जिहाद ही हिंदु स्‍त्रियांच्‍या समोरील सर्वांत गंभीर समस्‍या आहे; परंतु हिंदूंना लहानपणापासून घरातून धर्मशिक्षण न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये धर्माभिमान नाही. त्‍यामुळेच ते जिहाद्यांच्‍या षड्‍यंत्राला बळी पडत आहेत. त्‍यासाठी प्रत्‍येक पालकाने स्‍वत:च्‍या मुलांना हिंदु धर्मानुसार आचरण करायला शिकवणे आणि त्‍यांच्‍यात धर्माभिमान जागृत करणे आवश्‍यक आहे.  सध्‍याच्‍या काळात हिंदूंच्‍या संघटनासाठी धर्मचरणासमवेत साधना करणे अपरिहार्य आहे, असे तेजस्‍वी मार्गदर्शन सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले. येथील भीमाशंकर रोड, मु.पो. घोडेगाव, तालुका आंबेगाव येथे ‘भीमाशंकर पाटीदार सनातन समाज’च्‍या वतीने १५ नोव्‍हेंबर या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात साधना आणि धर्माचरण यांचे महत्त्व याविषयीच्‍या मार्गदर्शनात त्‍या बोलत होत्‍या.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये पुढे म्‍हणाल्‍या की, लव्‍ह जिहाद, लँड जिहाद यांप्रमाणे आज ‘हलाल जिहाद’ ही भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला समांतर अशी इस्‍लामी अर्थव्‍यवस्‍था निर्माण झाली आहे. धर्मशिक्षण नसल्‍यामुळे हिंदूंची स्‍थिती दयनीय झाली आहे. समाजाची नैतिकता अधोगतीला गेल्‍याने लोकांमधील आसुरीवृत्ती वाढू लागली आहे. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्‍या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनीष चाळके, श्री. महेश पाठक हेही उपस्‍थित होते. श्री. महेश पाठक यांनी उपस्‍थित जिज्ञासूंना व्‍यासपिठावरील सर्वांची ओळख करून दिली. श्री. मनीष चाळके यांनी ‘स्‍वसंरक्षणाची आवश्‍यकता’ याविषयी अवगत केले आणि याविषयी प्रात्‍यक्षिके करून दाखवली. शाळेतील विद्यार्थ्‍यांना प्रोत्‍साहन मिळावे म्‍हणून सरस्‍वती सन्‍मान कार्यक्रमाच्‍या अंतर्गत विद्यार्थ्‍यांना पारितोषिक वितरण करण्‍यात आले. या वेळेस जुन्‍नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्‍यांतील ४०० हून अधिक जिज्ञासूंनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

डावीकडून श्री. मनीष चाळके, श्री. दिलीप शेट्ये, श्री. महेश पाठक, सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक

समाजात वाढत चाललेली अनैतिकता, बोकाळलेला भ्रष्‍टाचार यांचे मूळ अधर्माचरणात आहे ! – पू. (सौ.) मनीषा पाठक

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबा नातवंडांवर चांगले संस्‍कार करायचे, त्‍यांना धर्माचरण करायला शिकवायचे. आज समाजातील वाढत चाललेली अनैतिकता, बोकाळलेला भ्रष्‍टाचार, बलात्‍कार यांसारख्‍या गुन्‍ह्यांचे मूळ अधर्माचरणातच आहे. भावी पिढीने मूल्‍यशिक्षणातील तत्त्वे कृतीत आणण्‍यासाठी त्‍यांना धर्मशिक्षण आणि साधना सांगणे अत्‍यावश्‍यक आहे. आदर्श राष्‍ट्र आणि समाज घडवण्‍यासाठी भगवंताच्‍या कृपेची आवश्‍यकता आहे. यासाठी आपण साधनेच्‍या स्‍तरावर प्रयत्न करायला हवेत, तसेच साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्‍या साधनेतील सातत्‍य टिकवून ठेवायला हवे. साधनेमुळे धर्मप्रेम, राष्‍ट्रप्रेम निर्माण होते, असे मत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी व्‍यक्‍त केले.

वैशिष्‍ट्यपूर्ण

१. भाऊबिजेच्‍या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन केलेले असूनही समाजातील जिज्ञासूंनी या कार्यक्रमाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला.

२. या कार्यक्रमाला तरुणवर्गाची विशेष उपस्‍थिती होती.

३. कार्यक्रम अतिशय शांततेत आणि शिस्‍तीत पार पडला.

४. भारतीय संस्‍कृतीनुसार सात्त्विक पोशाख घालून महिला या कार्यक्रमाला आल्‍या होत्‍या.

५. पटेल समाजातील जिज्ञासूंनी सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे उभे राहून स्‍वागत केले.

६. पटेल, गुजराती समाजांमध्‍ये वृद्धाश्रम नसतात. या समाजातील तरुण मुले पुष्‍कळ संस्‍कारी असतात, हे त्‍यांच्‍या समाजाचे वैशिष्‍ट्य पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सांगितले.

क्षणचित्रे

१. अनेकांनी हा विषय ऐकल्‍यानंतर ‘आमच्‍या भागामध्‍ये तुम्‍ही स्‍वसंरक्षणवर्ग चालू करा तसेच हे सर्व विषय अत्‍यंत महत्त्वाचे आहेत’, अशा प्रतिक्रिया दिल्‍या.

२. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी सर्वश्री चंदुलाल पटेल, शंकर लाल पटेल, डायाभाई पटेल, हंसराज भाई पटेल, विनोद भाई पटेल आणि उपस्‍थित सर्व बंधूभगिनींनी योगदान दिले.