जीवनाचे मूल्य जाणा !
जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या ताणामुळे गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवस तो अभ्यासाच्या तणावात होता. ‘मी मरायला जात आहे; कारण मला अभ्यासाचा ताण झेपत नाही. आता माझी चिडचिड होणार नाही…’, अशा आशयाची ‘सुसाईड नोट’ (आत्महत्येच्या कारणाचे पत्र) लिहून त्या मुलाने घरात आत्महत्या केली. सध्याच्या काळात अशा प्रकारच्या घटना सर्वत्र नेहमी घडतांना दिसतात. परीक्षेत अल्प गुण मिळाले किंवा परीक्षेच्या आधीच अभ्यासाचा ताण आल्याने विद्यार्थी आत्महत्या करतात; कारण त्यांना ‘लोक काय म्हणतील ?’, ‘घरच्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही तर… ?’ यांसारख्या विचारांवर मात करता येत नाही. ‘आपण कष्ट केले, भगवंताला शरण गेलो, तर आपल्याला यश मिळू शकते’, असा सकारात्मक विचार ते करू शकत नाहीत.
सध्या विद्यार्थी परीक्षेच्या ताणाला सामोरे जाऊ शकत नाहीत. असे का होते ? सध्या मुलांना प्रत्येक गोष्ट सहज मिळते. त्यांच्यात संघर्ष करून काही मिळवण्याची शक्तीच निर्माण होत नाही. सर्वकाही सहज मिळत गेल्याने मुलांना ‘संघर्ष काय असतो ?’, हेच ठाऊक नसते. काही वेळा अशी मुले मनाने दुबळी बनतात. त्यांच्यात सहनशीलता निर्माण होत नाही. अशी मुले जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरी जाऊ शकत नाहीत. त्यांचे मनोबल अल्प असते. सध्या स्पर्धा परीक्षांमुळे ‘चांगले गुण मिळावेत’, हेच बर्याच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे ध्येय असते. हे ध्येय असणे चुकीचे नाही; परंतु त्यामुळे काहींवर अभ्यासाचा दबाव येतो. त्यातून त्यांना मार्ग कसा काढायचा, हे ठाऊक नसते. ‘कष्ट करून यश मिळवायचे’ ही शिकवण मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी पालकांनी त्यांच्यावर ‘कष्ट करून मिळवण्या’चे संस्कार करायला हवेत. त्यांच्यावर मेहनत करण्याचे, तसेच समाधानी रहाण्याचे संस्कार करायला हवेत. ‘चांगले गुण, चांगली नोकरी, चांगला पैसा’, हे जीवनाचे ध्येय आहे’, असे पालकच मुलांवर बिंबवतात. आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे मनोबल उपासनेने मिळते. पालकांनी मुलांचे जीवन घडण्यासाठी त्यांच्यावर साधनेचे संस्कार केले, तर त्यांच्यात समाधान, संयम, जिद्द, चिकाटी, कष्ट करणे आदी गुण निर्माण होऊन ते जीवनात यशस्वी होतील आणि आत्महत्येसारख्या पापापासून मुक्त राहून देवाने दिलेला सुंदर मनुष्यजन्म सार्थकी लावतील, यात शंका नाही !
– कु. पल्लवी हेम्बाडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.