सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण चालू
मालवण : सिंधुदुर्गातील पारंपरिक मासेमार गेली अनेक वर्षे मत्स्य विभागाच्या कार्यालयाकडे अनधिकृतपणे मासेमारी करणार्या यांत्रिक (पर्ससीन) नौकांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करत आहेत; परंतु अशा नौकांवर कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे पारंपरिक मासेमारांना मासे मिळत नाहीत. पारंपरिक मासेमारांच्या मागण्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे आता यांत्रिक (पर्ससीन) नौकाधारक किनार्याजवळ येऊन मासेमारी करतात. यामुळे आता पारंपरिक मासेमार आणि ‘पर्ससीन’ नौकाधारक यांच्यामध्ये समुद्रातच वाद होत आहेत.
नुकत्याच झालेल्या एका घटनेत पारंपरिक मासेमारांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मत्स्य विभागाच्या अधिकार्यांच्या कामचुकारपणामुळेच हे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे अवैधरित्या मासेमारी करणार्या यांत्रिक नौकांवर (पर्ससीन नौका) कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी पारंपरिक मासेमारांनी मत्स्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.