पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक, तसेच क्रीडा साहित्‍याचा अभाव !

  • १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक असणे हे शिक्षण विभागाला लज्‍जास्‍पद !

  • शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुणे जिल्‍ह्यात अशा प्रकारे शाळांचे व्‍यवस्‍थापन होणे संतापजनक आहे !

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – महापालिकेच्‍या १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक आहेत. २२ शाळांना मैदान नाही, तर १७ शाळांची मैदाने छोटी असून ती अपुरी पडत आहेत. अनेक शाळांमध्‍ये क्रीडा साहित्‍यही उपलब्‍ध नाही. महापालिकेच्‍या शाळांमधील मैदानावर खो-खो खांब, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्‍हॉलीबॉल आदी खेळांसाठी सुविधा आणि साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी होत आहे. महापालिकेच्‍या शाळेतील क्रीडा शिक्षकांना इतर कामे दिली जातात. क्रीडा शिक्षक सेवानिवृत्त झाल्‍यानंतर रिक्‍त शिक्षकांची पदे भरली नाहीत.

उपायुक्‍त मिनीनाथ दंडवते म्‍हणाले की, विभागाकडील १५ क्रीडा शिक्षक वर्ष २०१० पासून निवडणुकीविषयक कामे करत आहेत. त्‍यांची मूळ पदावर नेमणूक करण्‍यासाठी २ मासांपूर्वी मागणी केली होती; मात्र निवडणूक विभागाने त्‍यांना कामातून मुक्‍त केले नाही. या शिक्षकांऐवजी पर्यायी शिक्षक मिळावेत, अशीही मागणी होत आहे. त्‍या शाळांना ४९ प्रकारचे क्रीडा साहित्‍य उपलब्‍ध करून देऊ शकतो. (निवडणूक विभागाने शिक्षकांना निवडणुकीविषयक कामांसाठी घेणे गंभीर आहे. अशा प्रकारे शिक्षकांकडून कामे करून घेऊन विद्यार्थ्‍यांच्‍या होणार्‍या हानीचे दायित्‍व कुणाचे ? यावर लवकर उपाययोजना काढायला हवी ! – संपादक)