हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘रोड वॉशर’ प्रणालीचा उपयोग करणार !
पुणे शहरातील हवेची पातळी धोकादायक !
पुणे – फटाके, वाहनांचा धूर आणि बांधकाम यांमुळे शहरातील हवेची पातळी धोकादायक झाली आहे. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त, तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ३२ प्रभागांमध्ये १६ वायू प्रदूषण नियंत्रक पथकांची नेमणूक केली आहे. प्रदूषण नियंत्रक प्रावधानांचे पालन न केल्यास दंड आकारला जाईल, तसेच कामाची जागा टाळेबंद केली जाईल, अशा सूचना दिल्या आहेत. हवेच्या गुणवत्तेत ‘रोड वॉशर’ (रस्ते धुणे) प्रणाली असलेल्या वाहनांच्या माध्यमातून सुधारणा केली जाणार आहे.
शहरातील ढाबा, बेकरी, हॉटेल्स, खानावळी यांच्या मालकांनी स्वयंपाकघरात पर्यावरणपूरक पर्यायांचा उपयोग करावा. डिझेल जनरेटरचा वापर शक्य असल्यास टाळावा, असे सांगितले आहे. ‘सफर’ या संकेतस्थळाच्या नोंदीअन्वये भोसरी, वाकड, निगडी या भागांतील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे. मुख्य चौकातील हवेचे प्रदूषण न्यून करण्यासाठी ‘मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सेपरेशन’ प्रणाली ५ वाहनांवर बसवली आहे. त्या माध्यमातून हवेचे प्रदूषण न्यून करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकासर्व नागरिकांनी पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करणे, हे आपले दायित्व आहे, असे समजून कृती केल्यास प्रदूषण न्यून होण्यास साहाय्य होईल ! |