त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत प्रतिदिन पहाटे श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात काकडा प्रज्वलित करण्यास प्रारंभ !
(काकडा हे पूर्वी वापरली जाणारी मशालीसारखी वस्तू आहे. काठीला फडके गुंडाळून त्याला तेल, रॉकेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थात बुडवून आग लावण्यात येते.)
कोल्हापूर – श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिदिन पहाटे काकडा प्रज्वलीत करण्यास प्रारंभ करण्यात आला असून हा काकडा त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत प्रज्वलित केला जाणार आहे. मशालीच्या मंद उजेडात पहाटे २ वाजता मंदिराच्या शिखराच्या टोकावर काकडा प्रज्वलित केला जातो.
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे शिखर ४० फूट उंच असून एवढ्या उंच शिखरावर केवळ दगडी टप्प्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडे पाठ करून चढावे लागते. मुख्य शिखरावर पश्चिमेकडील बाजूला सर्वांत उंचावर कापूर प्रज्वलित केला जातो. त्यासाठी एका हातात पेटता काकडा आणि दुसर्या हाताने दगडी टप्प्याला धरत शिखरावर एका दमात पोचावे लागते. मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबर्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा उघडला जातो. सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा होतो. त्यानंतर देवीची पहाटे काकड आरती होते. या विधीसाठी मंदिर सध्या पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी उघडण्यात येऊन रात्री १० वाजता बंद करण्यात येत आहे.