सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर यांचा स्वतःच्या साधनाप्रवासाविषयी असलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा अनन्य कृतज्ञताभाव !
‘माझा साधनाप्रवास लिहितांना माझी झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे. माझ्या साधनाप्रवासाची लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झाल्यावर साधकांनी व्यक्त केलेल्या अभिप्रायांमुळे मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञता वाटली.
१. साधनाप्रवास लिहितांना झालेली विचारप्रक्रिया
१ अ. व्यवहारातील प्रवास आणि साधकाचा साधनाप्रवास यांतील साम्य अन् भेद : ‘कुठलाही प्रवास करायचा म्हटल्यावर आपल्या मनात त्याविषयीची उत्सुकता, कुतुहल आणि आशा-आकांक्षा आपोआप निर्माण होतात. आपण त्या द़ृष्टीने त्याचे नियोजन करतो. नियोजन करतांना स्वतःची आवड-नावड, सहप्रवाशांची काळजी, स्वतःचे अन् सहकुटुंबियांचे गुण-दोष विचारात घेतो; मात्र साधनाप्रवासामध्ये स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही सूत्रांचा समावेश असतो. त्यामुळे अध्यात्मातील साधनाप्रवासात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक द़ृष्टीने चिंतन करावे लागते.
१ आ. आध्यात्मिक साधना प्रवासाविषयी केवळ या जन्मापुरते अल्पसे चिंतन होणे : मनुष्य जन्माचे ध्येय प्रारब्ध संपवून मोक्षप्राप्ती करणे, म्हणजे साधकाचा साधनाप्रवास हा त्याचा मोक्ष गाठेपर्यंतचा प्रवास आहे. ‘जिवाचा हा साधनाप्रवास केवळ या जन्माचा नसून मागील अनेक जन्म आणि पुढील अनेक जन्मांचा आहे’, असे मला वाटते. मला मागील जन्मांचे काही आठवत नाही आणि पुढील जन्मांचे काहीही ठाऊक नाही. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जे सुचवतील, तसे मी या जन्मातील अल्पशा साधनाप्रवासाचे चिंतन करण्याचे ठरवले.
१ इ. साधना करणे खडतर असल्यामुळे साधना करणारा माणूस शूर असणे : माझ्या साधनाप्रवासात जीवनातील प्रसंग लिहायचे म्हटले, तर बहुतेक प्रसंग हे अत्यंत खडतर आणि दुःखदायी होते.
संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘भक्ति तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥’ (तुकाराम गाथा, अभंग १५३६)
भक्तीमार्गानुसार साधना करणे, हे सूळावरील पोळी मिळवण्याएवढे कठीण आहे. त्यामुळे या मार्गाची निवड करणारा मनुष्य हा विरळाच अन् शूर असतो. यानुसार साधनेची वाटचाल ही सूळावरील पोळी मिळवण्याएवढी कठीण आहे; कारण ‘स्वतःचे स्वभावदोष, अहं, विकार आणि वासना यांमुळे आपण साधनेच्या वाटेवरून खाली घसरून आपला कधी कडेलोट होईल’, हे सांगता येत नाही. त्यामुळे संत तुकाराम महाराज अभंगाच्या पुढील ओळी सांगतात,
१ इ १. स्वतःचे स्वभावदोष, अहं, विकार आणि वासना यांमुळे साधनाप्रवास खडतर असणे
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥ १ ॥
जिवाहि आगोज पडती आघात । येऊनिया नित्य नित्य वारू ॥ २ ॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे । अवघियांचे काळे केले तोंड ॥ ३ ॥’ – तुकाराम गाथा, अभंग ४०९१
अर्थ : रात्रंदिवस आम्ही युद्धासारख्या प्रसंगाचा सामना करत आहोत. हा संघर्ष बाहेरील जगासमवेत आणि आतील मनाशीसुद्धा चालू आहे. जिवावर जे आघात होत आहेत, त्यांचे हे ईश्वरा, ‘तूच येऊन पुन्हा पुन्हा निवारण करतो आहेस.’ तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुझ्या एका नामस्मरणाच्या बळाने या सर्व वाईट गोष्टींचे तोंड आम्ही काळे करून टाकले आहे.’ (सर्व वाईट गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवले आहे.)
वरीलप्रमाणेच माझाही साधनाप्रवास असाच आहे. देवाने मलाही सर्व संकटांतून वाचवले आहे. ‘मनातील संघर्षातून बाहेर कसे पडायचे’, हे मला शिकवले. ‘माझा साधनाप्रवासही अवघड असल्याने कसा लिहू शकणार ?’, असे आरंभी मला वाटले.
१ ई. आरंभी अत्यंत कठीण वाटणारी साधना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुलभ होणे : संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्यानुसार ‘साधना भयंकर कठीण आहे, ते आपले काम नाही’, असे आरंभी, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांची भेट होण्यापूर्वी मला वाटत होते. त्यानंतर ‘साधना सोपी असली, तरी तिच्याविषयी लिखाण करणे अवघड असेल’, असे मला वाटत होते. त्यामुळे साधनाप्रवास लिहितांना माझ्या मनाचा गोंधळ होत होता. माझ्या साधनाप्रवासात मी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अधिक माहिती लिहित होतो. ‘गुरुदेवच विचार देत आहेत आणि तेच माझ्याकडून सुलभतेने लिहून घेत आहेत’, हे त्यांच्याच कृपेने माझ्या लक्षात आले.
२. शारीरिक त्रास असतांनाही गुरुकृपेमुळे साधनाप्रवासाचे लिखाण सहजपणे करता येणे
एप्रिल २०२० मध्ये माझ्या पाठीचे दुखणे चालू झाले. त्यामुळे मला थोडा वेळही बसता किंवा चालता येत नव्हते. तेव्हा मला पुष्कळ वेळ मिळाला. गुरुकृपेमुळे माझ्या साधनाप्रवासाचे लिखाण पलंगावर पडून भ्रमणभाषवर ‘व्हॉईस टायपिंग’ (भ्रमणभाषवर बोलून टंकलेखन करण्याची प्रणाली) करून केले. ४ मासांनंतर मला आसंदीवर थोडा वेळ बसता येऊ लागल्यावर मी ते टंकलेखन सुधारून त्याचे प्राथमिक संकलन केले. गुरुदेवांनी माझ्याकडून माझा साधनाप्रवास सहजपणे लिहून घेतला.
३. लेखमाला प्रकाशित झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संकलन करणारे साधक यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
३ अ. साधनाप्रवास भाग १ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वचन दिल्यामुळे सर्व लेखमाला चैतन्य आणि आनंद देणारी होणे : १४.७.२०२३ या दिवशी ‘चंद्रयान – ३’ चे पृथ्वीवरून चंद्राकडे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्याचे सर्व यश ‘इस्रो’ या आस्थापनातील शास्त्रज्ञांचे होते. तसेच माझ्या जिवाला मोक्षाच्या कक्षेत घेऊन जाणारे परात्पर गुरु डॉ.आठवले आहेत. या दिवशीच माझ्या साधना प्रवासाचा पहिला भाग प्रकाशित झाला. त्या लेखाच्या शेजारी परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेली चौकट प्रकाशित झाली. त्यांच्या नेत्र कटाक्षाने लिखाणातील अक्षरे जिवंत होऊन आनंदाने नाचू लागली आणि लेखातील शब्दांमधील नकारात्मकता जाऊन त्यात सकारात्मक अन् चैतन्यमयी ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे ‘लिखाण मौल्यवान झाले’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञताभाव सतत जागृत होत असे.
३ आ. संकलन करणार्या साधकांप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘आपण शिंप्याकडे केवळ कापड देतो. शिंपी त्या कापडातून सुंदर सदरा शिवून देतो. त्याचप्रमाणे मी कच्चे लिखाण संकलकांकडे दिल्यावर त्यांनी साधना प्रवासाची सुंदर लेखमाला गुंफली. त्यामध्ये या लेखमालेचे अंतिम संकलन करणार्या सौ. सुजाता मधुसूदन कुलकर्णी, (फोंडा, गोवा) यांनी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे याविषयी अभिप्रायही लिहिला. त्या वेळी संकलन करणार्या साधकांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील साधनाप्रवासाचे लिखाण वाचून साधक आणि वाचक यांच्याकडून आलेले काही प्रातिनिधिक अभिप्राय
अ. ‘आध्यात्मिक साधनेद्वारे आपण संतपदाला पोचला आहात. आपण बालपणापासूनच सत्प्रवृत्त असून धन्य आहात. आपल्या सत्संगाचा तळागाळातील समाजापर्यंत लाभ पोचवावा. ‘आपला मला काही काळ सहवास लाभला’, याचा आनंद आहे. आदरपूर्वक शुभेच्छा !’
– नारायण म.शिंदे ( साहित्यिक) (नातेवाईक आणि लहानपणीचे मित्र)(३१.८.२०२३)
आ. ‘तुमचा साधनाप्रवास वाचून त्यातून तुमचा भगवंताप्रती अनन्य शरणागत भाव, आज्ञापालन, गुरुनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि गुरुभक्ती शिकायला मिळते. ‘आमच्यातही तुमच्याप्रमाणे ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ निर्माण होऊ दे. आमचेही जीवन साधनामय प्रयत्नांनी व्यापक होऊ दे’, अशी तुमच्या आणि गुरुदेवांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आणि पुष्कळ कृतज्ञता !’
– कु. किरण व्हटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (३१.८.२०२३)
इ. ‘पू. काका, लेखमाला अतिशय छान आहे. त्यातही एम्.एफ्. हुसेन यांनी काढलेल्या चित्रांच्या संदर्भातील मोहिमांविषयीच्या घडामोडींचा लेख वाचून आनंद मिळाला आणि भावाश्रू आले. त्याचप्रमाणे ‘सर्वांना मोहिमेच्या दृष्टीने सेवा करतांना देवाशी अनुसंधान कसे ठेवायचे ?’, हेही शिकायला मिळाले. माझ्या मनात आज विचार आला, ‘पू. काका, ‘तुमची ही लेखमाला, तसेच आजपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले तुमचे लेख आणि कविता यांतून तुमचे आत्मचरित्र होईल अन् तो सर्वांसाठी स्फूर्तीदायी ग्रंथ असेल. आपण ही अप्रतिम लेखमाला ओघवत्या भाषेत आणि समाजातील प्रत्येकाला सहजतेने कळेल’, अशा प्रकारे लिहिली आहे. ‘कृतज्ञताभाव कसा हवा ?’, हे मला शिकायला मिळाले. ही लेखमाला माझ्या कुटुंबियांनाही आवडली.
– श्री. गिरिधर वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१४.८.२०२३)
ई. ‘पू. काका, ‘आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक विनम्र वंदन ! आदर्श शिष्य, गुरूंप्रती समर्पणभाव, गुर्वाज्ञापालन, आदर्श साधनाप्रवास कसा असावा ?’, याचा उत्तम पाठ आपल्या या लेखमालेतून शिकायला मिळाला. श्री गुरुचरणी आणि आपल्याप्रती कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. उषा पुराणिक, तळेगाव, पुणे (३१.८.२०२३)
उ. ‘पू. काका, आपल्या साधनाप्रवासाची आदर्श लेखमाला वाचून आनंद झाला. त्यातून आम्हा साधकांना पुष्कळ शिकायला मिळाले. त्यासाठी श्री गुरुचरणी आणि आपल्या चरणी कृतज्ञता !’
– अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७१ वर्षे)
ऊ. ‘तुमच्या साधना प्रवासाचे १५ लेख वाचले. ‘ते किती वाचू आणि किती लक्षात ठेवू’, असे मला वाटते. आता माझ्या लक्षात रहात नाही. तुमची मला पुष्कळ आठवण येते. तुमचे हे १५ लेख आहेत. ते एकत्रित करून प्रिंट काढून मला पाठवाल का ?, जेणेकरून ते नेहमीसाठी माझ्याजवळ रहातील आणि मला अधूनमधून वाचता येतील. तुम्ही ते पाठवलेत, तर बरे होईल. मला पुष्कळ आनंद होईल.’
– श्री. देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८१ वर्षे)
ए. पू. काका, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील आपले लेख वाचले. ‘नियोजन कसे करावे ? भाव ठेवून कृती केल्याने कसे चैतन्य ग्रहण होते ?’, ‘नामजपासाठी वेळ कसा काढायचा ?’, हे माझ्या लक्षात आले.
– सौ. विद्यागौरी गुजर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५७ वर्षे), नवी मुंबई (१०.८.२०२३)
ऐ. ‘नामजपासाठी वेळ कसा काढायचा ?’, याविषयीचा तुम्ही लिहिलेला शोधनिबंध हवा आहे. तुमचे लेख वाचतांना पुष्कळ चांगले वाटून मला आनंद मिळत होता.’
– श्री. अनिल पाटील, नाशिक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७७ वर्षे)
५. वाचक आणि साधक यांच्या अभिप्रायांतून शिकणे अन् कृतज्ञता व्यक्त होणे
अभिप्राय मिळाल्यावर ‘वाचक आणि साधक यांनी एखादा साधनाप्रवास कसा वाचला पाहिजे ? तो कसा अभ्यासला पाहिजे ? आणि त्याचा उपयोग स्वतःच्या साधना प्रवासात कसा केला पाहिजे ?’, याविषयी मला शिकायला मिळाले. साधकांकडून अभिप्राय मिळाल्यावर मला माझे कौतुक न वाटता परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञताभाव जागृत होत असे; कारण परात्पर गुरु डॉक्टर मला सुचवत होते. माझ्याकडून साधना करून घेत होते. माझ्या बोटाला धरून साधनेचा प्रवास सुखकर करत होते. ते साधक आणि वाचक यांना शिकवून आनंदही देत होते. तेच कर्ता करविता आहेत. ‘त्यांनी मला केवळ माध्यम बनवले आणि माध्यमाचेही कल्याण केले’, असा विचार आल्यावर मला पुढील काही ओळी स्फुरल्या.
५ अ. शरणागत होऊन कृतज्ञताभावात राहूया गुरुचरणी ।
परम पूज्यांचा (टीप १) वास असे माझ्या हृदयी ।
साधनाप्रवास सुकर केला गुरुदेवांनी (टीप २) ॥ १ ॥
परम पूज्यांनी दिले मला लिखाणाचे विचार ।
साधनाप्रवास लिहून घेतला सत्वर ॥ २ ॥
चैतन्य अन् आनंदाची उधळण केली परम पूज्यांनी ।
शरणागत होऊन कृतज्ञताभावात राहूया गुरुचरणी ॥ ३ ॥
टीप :१ आणि टीप :२ – परात्पर गुरु डॉ. आठवले
६. प्रार्थना
‘साधनाप्रवास म्हणजे एक प्रकारचे जीवनचरित्र असते. संतांच्या जीवनचरित्राच्या वाचनाने वाचकाचे चरित्र घडते. त्याला ‘संतांचे जीवनचरित्र म्हणतात’, असे वचन आहे. यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधनाप्रवासाचे लिखाण वाचून साधकांना साधना करण्यास प्रेरणा मिळून साधनेविषयी शिकायला मिळो’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी नतमस्तक होऊन साश्रू नयनांनी भावपूर्ण प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.१०.२०२३)