पिंपरी (पुणे) येथील पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे तक्रार !
पर्यावरणप्रेमींनी पत्राद्वारे केली फौजदारी कारवाईची मागणी !
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या पात्रांमध्ये रसायनयुक्त पाणी, मैलायुक्त सांडपाणी सोडले जात असल्याने नद्यांमध्ये सातत्याने फेस येत आहे. याला उत्तरदायी असणार्या महापालिकेच्या पर्यावरण विभागावर आरोप करत फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पर्यावरणप्रेमींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात का येत नाही ? – संपादक)
पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या पाण्यावर फेस, तसेच तवंग येतो. यंदाच्या पावसाळ्यात नद्या ५ वेळा फेसाळल्या होत्या. थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले की, या नद्यांच्या प्रदूषणाला महापालिकेतील पर्यावरण विभागाचे उत्तरदायी आहे. वर्षानुवर्षे नदी प्रदूषणाविषयी आम्ही प्रशासनास जागे करत आहोत; परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.