पाठदुखी (Backache) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती
‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक १५) !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
२९ सप्टेंबर या दिवशीपासून या लेखमालेद्वारे आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत १० नोव्हेंबर या दिवशी आपण ‘अतिसार/जुलाब (Diarrhoea)’ या आजारावर घ्यावयाची काळजी आणि त्यावर घ्यावयाची औषधे’, यांविषयी माहिती वाचली. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारांच्या संदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे
पाठीमध्ये मंद ते तीव्र वेदना होणे याला ‘पाठदुखी’, असे म्हणतात. काही वेळा या वेदना पायाच्या दिशेने पसरतात. या वेदना पडल्यामुळे झालेली दुखापत, जड वजन उचलणे, वयोमानपरत्वे किंवा मणक्यातील चकतीची झालेली झीज, इत्यादी यांमुळे होऊ शकतात. पाठदुखी होत असतांना प्रदीर्घ काळ बसणे, जड वजन उचलणे टाळावे. योगासने, व्यायाम, शरिराची ढब (posture) योग्य करणे, मालिश करणे यांनीही लाभ होतो. पाठदुखी या लक्षणाच्या व्यतिरिक्त कोणती वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे असली की, ते औषध घ्यावे, हे औषधांच्या नावापुढे दिले आहे.
१. आर्निका मोन्टाना (Arnica Montana)
१ अ. आघातजन्य इजा (traumatic injuries) किंवा अति श्रमामुळेे पाठ दुखणे
१ आ. पाठीचा भाग दुखरा, लुळा, ठेच लागल्याप्रमाणे जाणवणे
१ इ. ज्या-ज्या जागेवर म्हणून झोपायला जावे ती-ती जागा अति कठीण भासणे
१ ई. प्रतिदिन वापरत असलेले मऊ अंथरूण; शरिराला स्पर्श होईल तेथे टणक लागल्याने कुठेही टेकवत नाही. कुठेतरी मऊ जागा/मऊपणा सापडेल, या शोधात अस्वस्थपणे सारखी जागा पालटत रहाणे
२. काली कार्बोनिकम् (Kali Carbonicum)
२ अ. पाठीमध्ये टोचल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे
२ आ. पाठ मोडल्यासारखे जाणवणे
२ इ. पाठीमध्ये अशक्तपणा जाणवणे
२ ई. पडून राहिल्याने किंवा विश्रांती घेतल्याने वेदना अधिक होणे
२ उ. चालल्याने किंवा हालचाल केल्याने बरे वाटणे
२ ऊ. गर्भार स्त्रियांमध्ये किंवा गर्भपात झाल्यानंतर पाठ दुखणे
३. र्हस टॉक्सिकोडेंड्रॉन (Rhus Toxicodendron)
३ अ. अवघड वजनदार वस्तू उचलल्याने उसण भरणे, पावसामध्ये भिजणे, दमट कपडे घालून किंवा दमट अंथरूणावर झोपणे, यांमुळे पाठ दुखणे
३ आ. पाठीत ताठरता, ठेच लागल्याप्रमाणे आणि दाह जाणवणे
३ इ. हालचाल केल्यानंतर वेदना न्यून होणे
४. ब्रायोनिया अल्बा (Bryonia Alba)
४ अ. पाठीमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे
४ आ. हालचाल केल्याने वेदना वाढणे
४ इ. दाब दिल्याने आणि पूर्ण विश्रांती घेतल्यानंतर वेदना न्यून होणे
५. बर्बेरिस् व्हल्गॅरिस् (Berberis Vulgaris)
५ अ. लघवी किंवा गुदाशय यांसंबंधी तक्रारीसह पाठदुखी असल्यास उपयुक्त
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील. |