साधकांनो, संतांच्‍या सत्‍संगाचे महत्त्व लक्षात घेऊन त्‍याला प्राधान्‍य देण्‍यामध्‍ये येणार्‍या अडथळ्‍यांवर मात करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘एकदा एका साधकाची एका संतांशी भेट झाली. त्‍या वेळी त्‍या संतांनी साधकाला विचारले, ‘‘तुम्‍ही एकटेच भेटायला आलात. तुम्‍ही तुमची पत्नी आणि अन्‍य कुटुंबीय यांना समवेत आणले नाही !’’ त्‍या वेळी संबंधित साधकाने सांगितले, ‘‘घरी कुत्र्याची दोन पिल्ले आहेत. त्‍यांना सांभाळायला कुणी नसल्‍यामुळे पत्नी आणि अन्‍य कुटुंबीय यांना भेटीसाठी आणले नाही.’’

यामध्‍ये ‘संतांच्‍या मार्गदर्शनामुळे साधनेतील अडचणी सुटतात आणि साधनेला गती येऊन जलद आध्‍यात्मिक उन्‍नती होते’, हा दृष्‍टीकोन लक्षात घेऊन साधकांनी संतांच्‍या साधनेविषयीच्‍या अमूल्‍य मार्गदर्शनाला प्राधान्‍य देण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. अशा प्रसंगी ‘साधकांनी तारतम्‍य ठेवून प्राण्‍यांना सांभाळण्‍यासाठी नातेवाईक, शेजारी अथवा अन्‍य यांचे साहाय्‍य घ्‍यावे किंवा ‘अन्‍य कोणती उपाययोजना काढू शकतो ?’, हे पहावे, तरीही अडचण असल्‍यास सर्व कुटुंबियांनी घरी थांबण्‍याऐवजी एकाने थांबून बाकी सदस्‍यांना मार्गदर्शनासाठी घेऊन येण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक नियोजन करू शकतात.

‘साधकांनो, ‘या आपत्‍काळात साधनेसाठी संतांचे अमूल्‍य मार्गदर्शन आपल्‍याला लाभत आहे’, याविषयी कृतज्ञताभाव ठेवून त्‍याचा लाभ करून घ्‍या !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२३)