हिंदुहृदयसम्राट !
आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ११ वी पुण्यतिथी !
विनम्र अभिवादन !
मुंबईमध्ये मराठी माणसांवर परप्रांतियांमुळे होणार्या अन्यायातून शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि पुढे त्यांनी हिंदुत्वाचे सूत्र हाती घेतले अन् ते देशपातळीवर पोचवले ! त्यापूर्वी ‘हिंदुत्व’ हा शब्द राजकारणात उच्चारावा, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर कुणाही राजकारण्याला वाटत नव्हते. शिवसेनाप्रमुखांनी हे चित्र पालटले. निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रसार केल्यामुळे ६ वर्षे मतदान करण्यास बंदी घालण्यात आलेले शिवसेनाप्रमुख एकमेव नेते होते ! अयोध्येतील बाबरीचा ढाचा पाडला गेला. याचे दायित्वही तितक्याच समर्थपणे शिवसेनाप्रमुखांनी घेतल्यावर ते हिंदु जनांच्या हृदयाचे सम्राट बनले ! ‘असे धाडस त्या काळात अन्य कोणत्याही राजकारण्यांकडून झाले नाही’, हा इतिहास आहे.
राजकारणासाठी हिंदुत्वाचे सूत्र घेऊन राजकीय लाभानंतर हिंदूंना वार्यावर सोडण्याचा कृतघ्नपणा शिवसेनाप्रमुखांनी कधीही केला नाही ! शिवसैनिकाची व्याख्या करतांना शिवसेनाप्रमुखांनी ‘शिवसैनिकाला धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे प्राणत्याग करता आला पाहिजे’, असे म्हटले होते. बाबरीचा ढाचा पाडल्यानंतर मुंबईत झालेल्या दंगलीच्या वेळी शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून हिंदूंचे रक्षण केले. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यावर अल्पसंख्यांकांसाठीचे खातेच शिवसेनाप्रमुखांनी रहित केले. असे धाडस त्यापूर्वी आणि त्यानंतरही कोणत्याही सत्ताधारी पक्षाने केलेले नाही, हे विशेष ! आज या खात्याच्या नावाखाली मुसलमानांवर सोयी-सवलतींचा वर्षाव केला जातो, तर हिंदूंना ठेंगा मिळतो. काश्मीरमधून हिंदूंना मुसलमानांनी हाकलल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता असतांना शिवसेनाप्रमुखांनी या हिंदूंसाठी काही टक्के जागा विद्यापिठांमध्ये आरक्षित करण्याचा कायदा केला. हा लाभ आजही या हिंदूंना मिळत आहे. ‘काश्मिरी हिंदूंसाठी प्रत्यक्ष कृती करणारे शिवसेनाप्रमुख एकमेव नेते आहेत’, असे स्वतः काश्मिरी हिंदू सांगतात. यातून शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व कसे होते ?, हे लक्षात येते. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याची धमकी जिहादी आतंकवाद्यांनी दिल्यावर ‘मुंबईतून एकही हज यात्रेकरू हजला जाऊ दिला जाणार नाही’, अशी चेतावणी दिल्यानंतर अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडली. जिहाद्यांना अशा प्रकारची चेतावणी देण्याचे धाडस त्यांच्यानंतर एकाही हिंदु नेत्यामध्ये दिसून आलेले नाही. १९८० च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान्यांची वळवळ चालू झाल्यावर आणि त्यांना मुंबईतील शीख टॅक्सीचालक आर्थिक साहाय्य करत असल्याचे कळल्यावर त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे शिवसेनाप्रमुख हे एकमेव नेते होते. जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारताच्या कह्यात येईल आणि भारत आतंकवादापासून मुक्त होईल, तेव्हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर हिंदुत्वाच्या अंगाराची प्रखरता हिंदूंमध्ये निर्माण करणार्या हिंदुहृदयसम्राटाला अभिवादन !
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.