कुडाळ येथील सौ. मंजुषा मनोज खाडये यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या काळात अनुभवलेली भावावस्था !
१. ब्रह्मोत्सवापूर्वी
अ. ‘गोव्याला ब्रह्मोत्सवासाठी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवासाठी) जायचे आहे’, असा मला निरोप मिळाला. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होईल’, असे वाटून मला आनंद झाला. त्यामुळे माझे मन ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी आतुर होऊ लागले.
आ. ‘१०.५.२०२३ या दिवशी काही साधक रात्री घरी रहायला येणार आहेत’, असे मला कळले. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेवच घरी येणार आहेत’, असा माझ्या मनात भाव निर्माण झाला आणि माझ्याकडून तशी सिद्धता चालू झाली.
इ. साधक घरी येतील, त्या निमित्ताने मी सिद्धता करत होते. तेव्हा मला अजिबात थकवा जाणवत नव्हता. उलट मला पुष्कळ उत्साह जाणवत होता.
ई. साधक मध्यरात्री उशिरा घरी आले आणि आम्हाला पहाटे लवकर उठून गोव्याला जायचे होते. त्या वेळी माझी झोप न्यून झाली होती, तरी मला सिद्धता करतांना उत्साह वाटत होता आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण जाणवत होते.
२. कार्यक्रमासाठी गोव्याला जातांना साधकांच्या गोव्याला जाणार्या गाड्या दिसल्यावर ‘आपले सनातनचे मोठे कुटुंब आहे’, असे जाणवणे
आम्ही घरून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी निघालो. तेव्हा वाटेत आम्हाला ठिकठिकाणी साधकांच्या गाड्या दिसत होत्या. त्या वेळी मला त्या साधकांकडे पाहून त्यांच्याविषयी आपुलकी वाटत होती. ‘हे सर्व साधक आपले आहेत आणि आपले सनातनचे मोठे कुटुंब आहे’, असे मला वाटत होते. ‘वाटेत थांबून त्या सर्वांची ओळख करून घ्यावी आणि त्यांच्याशी बोलावे’, असेही मला वाटत होते. तेव्हा आम्हाला वेळेची मर्यादा होती; म्हणून मी त्या मोहाला आवर घातला आणि आम्ही गोव्याच्या दिशेने निघालो.
३. कार्यक्रम स्थळी पोचल्यावर
अ. आम्ही कार्यक्रम स्थळी पोचलो. तेव्हा तेथील भव्यता, स्वागत कक्षावरील नियोजन आणि प्रत्येकाला दिलेले उत्सवचिन्ह (बिल्ले) पाहून माझा भाव जागृत झाला.
(उत्सवचिन्ह – ब्रह्मोत्सवाची आठवण रहावी; म्हणून साधकांना दिलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असलेले गोल चिन्ह)
आ. मी कार्यक्रम स्थळी पोचले आणि ‘आतील बैठक व्यवस्था पाहून’, माझे मन भारावून गेले. ‘कधी एकदा गुरुदेवांचे दर्शन होते’, असे मला झाले आणि मी त्यांची आतुरतेने वाट पाहू लागले.
इ. मला कार्यक्रम स्थळी इतर जिल्ह्यांतील ओळखीचे साधक दिसले. मला त्या सर्व साधकांना भेटल्यावर पुष्कळ आनंद झाला.
ई. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींचे रथातून आगमन झाले आणि त्यांना पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू वाहू लागले.
उ. गुरुदेवांच्या रथाच्या पुढे नृत्य करणारे साधक-साधिका आणि रथ ओढणार्या साधकांना पाहून, ‘मी स्वतःही त्या ठिकाणी आहे’, असे मला वाटत होते.
ऊ. ज्या वेळी मी नृत्य पहात होते, गायन आणि वादन ऐकत होते, त्या वेळी मी वेगळीच भावस्थिती अनुभवत होते. वादन चालू असतांना मला सर्वत्र पिवळा सोनेरी प्रकाश दिसत होता.
ए. पू. खेमकाकाका आणि इतर साधक त्यांचे अनुभव सांगत होते. त्या वेळी ते ‘माझ्याच मनातील विचार मांडत आहेत’, असे मला वाटले आणि त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती होत होती.
ऐ. प.पू. गुरुदेव रथातून खाली उतरले आणि त्यांनी हात जोडून सर्व साधकांवर दृष्टी फिरवली. तो क्षण मी पाहिला. माझ्यासाठी तो कृतज्ञतेचा परमोच्च क्षण होता. त्या वेळी मला मनापासून वाटत होते, ‘आपण ‘जय गुरुदेव’, असे म्हणावे’ आणि एका लांब बसलेल्या साधकाने प.पू. गुरुदेवांचा जयघोष केला.
ओ. त्या वेळी ‘त्या साधकाने सर्व उपस्थित साधकांच्या मनातील भाव ओळखून ‘जय गुरुदेव’, असा जयघोष केला आणि त्याला दहा सहस्र साधकांनी प्रतिसाद दिला’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर झालेले कृतज्ञता गीत ‘सर्वांचा भाव जागृत करणारे होते’, असे मला वाटले.
औ. मी रथाचे दर्शन घेतले. तेव्हा ‘तो सोन्याचा आहे’, असे मला वाटले, तसेच ज्या ठिकाणी प.पू. गुरुदेवांनी चरण ठेवले होते, त्या ठिकाणची माती मस्तकी लावावी; म्हणून मी ती समवेत घेतली.
अं. सर्वांना भेटून झाल्यावर आमचा परतीचा प्रवास चालू झाला. तेव्हाही आणि दुसर्या दिवशीही माझ्या डोळ्यांसमोर ब्रह्मोत्सवाचीच दृश्ये दिसत होती. त्या वेळी माझ्याकडून सतत गुरुदेवांचे स्मरण होत होते आणि माझी भावजागृती होत होती.’
– सौ. मंजुषा मनोज खाडये, कुडाळ, सिंधुदुर्ग. (१८.५.२०२३)