अन्यांच्या जातीविषयी द्वेष निर्माण करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात चालू झाले ! – राज ठाकरे
मुंबई – जात अनेकांना प्रिय असते. स्वतःच्या जातीविषयी अभिमान असणे, हे महाराष्ट्रात होत होते; पण अन्यांच्या जातीविषयी द्वेष निर्माण करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात चालू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्डयात घालत आहोत, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर १६ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
‘मनोज जरांगे पाटील यांना भेटून ‘असे कोणतेही आरक्षण कधीही मिळणार नाही’, हे मी सांगितले होते. मुळात त्यांच्या मागे कोण आहे ? त्यांना कोण बोलायला सांगत आहेत ? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव का होत आहेत ? हे लवकरच पुढे येईल’, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले.
वायू आणि ध्वनी प्रदूषण यांविषयी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी खेद व्यक्त करत राज ठाकरे यांनी ‘फटाके कधी वाजवायचे ? सण कसे साजरे करायचे ? हेही न्यायालय ठरवणार का ?’, या शब्दांत अप्रसन्नता व्यक्त केली. दुकानांवर मराठी पाट्या लावणे अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी राज ठाकरे म्हणाले, ‘‘मराठी पाट्यांच्या विरोधात व्यापारी न्यायालयात कसे जातात ? असे असूनही सरकारमधून काही हालचाली होत नाहीत. त्यामुळे यासाठी कदाचित् आम्हालाच हात-पाय हलवावे लागतील.’’