जगाने भारताचे आभार मानले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी टीकाकारांना सुनावले
रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी करून युरोपीय देशांना विकल्याचे प्रकरण
लंडन (ब्रिटन) – रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती. अशा वेळी भारताने तेल आणि गॅस बाजारांना स्थिर करून महागाई वाढण्यापासून रोखण्यात साहाय्य केले. यासाठी जगाने भारतावर टीका करण्याऐवजी भारताचे आभार मानले पाहिजे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतावर टीका करणार्यांना सुनावले. ते येथे एका परिषदेत बोलत होते. युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि युरोपीय देश यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाकडून कुणीही तेल खरेदी करू शकत नाही. या स्थितीत भारताने हे निर्बंध झुगारून तेल खरेदी केले आणि युरोपीय देशांनाच विकले. यावरून भारतावर टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जयशंकर बोलत होते.