Burglary and bike theft : गोव्यात ६ घरफोड्या अन् दुचाकी चोरीच्या प्रकरणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडू आणि त्याचा साथीदार कह्यात

  • चोरलेला ऐवज पोलिसांकडून जप्त

  • गेल्या ६ मासांत उत्तर गोव्यात झालेल्या घरफोड्यांच्या मुख्य प्रकरणांमध्ये दोघांचा सहभाग

गोव्याचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सुलेमान शेख आणि त्याचा साथीदार शब्बीरसाहेब शब्दावली यांना पोलिसांनी घेतले कह्यात

पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) : नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘स्नूकर’ खेळात गोव्याचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आणि त्याचा साथीदार यांना ६ घरफोड्या अन् दुचाकी चोरी या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. सुलेमान शेख (वय ३० वर्षे) असे या संशयिताचे नाव असून तो ‘स्नूकर’ आणि ‘पूल’ खेळाडू आहे. सुलेमान शेख हा मूळचा नवेवाडे, वास्को येथील असून तो सासष्टी तालुक्यात नुवे येथे रहात होता. शब्बीरसाहेब शब्दावली (वय ३० वर्षे) असे दुसर्‍या संशयिताचे नाव असून तो ‘सेकंड हँड’ चारचाकी वाहनविक्रीचा व्यवसाय करत होता. शब्दावली हा मूळचा गडक, कर्नाटक येथील असून तो सध्या अंबाजी, फातोर्डा येथे वास्तव्यास आहे.

पोलिसांनी संशयितांकडून अनुमाने ८ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे १६२ ग्रॅम चोरलेले सोने, विविध ‘गोल्ड फायनान्स फर्म’मध्ये तारण ठेवलेले अनुमाने ६ लाख रुपये किमतीचे सोने, तसेच दोन चोरलेल्या दुचाकी कह्यात घेतल्या आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कॅसिनो जुगाराचा छंद आणि ऐशोआरामाचे जीवन जगण्याची सवय, यांमुळे संशयित वारंवार गुन्हे करत होते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयितांचा गेल्या ६ मासांत उत्तर गोव्यात झालेल्या अनेक घरफोड्यांच्या प्रकरणांमध्ये सहभाग होता. दोन्ही संशयितांचा पर्वरी येथील  घरफोडीची २ प्रकरणे, तसेच म्हापसा आणि म्हार्दाेळ येथील  घरफोडीचे प्रत्येकी १ प्रकरण, तसेच पर्वरी आणि मडगाव येथे प्रत्येकी १ दुचाकी वाहन चोरी, या प्रकरणांमध्ये सहभाग होता. पोलिसांनी अनुमाने ५० ठिकाणांवरील ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून दोन्ही संशयितांना कह्यात घेतले आहे. फातोर्डा पोलिसांनी संशयित शब्दावली याच्याकडून सोने वितळवण्यासाठी वापरण्यात येणारे महागडे साहित्य, हिरा ओळखण्यासाठी वापरण्यात येणारे अनुमाने १ लाख रुपये किमतीचे यंत्र कह्यात घेतले आहे. या दोघांचा अन्य कोणत्या चोर्‍यांमध्ये सहभाग होता का ?, याचा पोलीस शोध घेत आहेत.