Kidnapping and sexual abuse of minors : सासष्टी (गोवा) तालुक्यात दीड मासांत अल्पवयीन मुलांचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार यांची ६ प्रकरणे नोंद
मडगाव, १५ नोव्हेंबर (वार्ता.) : सासष्टी तालुक्यात गेल्या दीड मासात अल्पवयीन मुलांचे अपहरण, त्यांना मारहाण आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची एकूण ६ प्रकरणे नोंद झाली आहेत. यांमधील २ प्रकरणांमध्ये शिक्षकांचा सहभाग आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये ओळखीच्या व्यक्तीचाच गुन्ह्यामध्ये सहभाग आहे. तालुक्यात अशी आणखी काही प्रकरणे घडलेली असली, तरी त्यांची वाच्यता आणि तक्रार झालेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दीड मासात अल्पवयीनांवरील अत्याचारासंबंधी पुढील प्रकरणे घडली आहेत. धर्मापूर येथे एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मडगाव येथील आलेक्स फर्नांडिस याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. सासष्टी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या प्रकरणी ३० वर्षीय संतोष सुतार याला कांदोळी येथून कह्यात घेण्यात आले. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी २१ वर्षीय विक्रम कुमार याला देहली येथून कह्यात घेण्यात आले. ५ वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला मायणा-कुडतरी पोलिसांनी कह्यात घेतले. ३ अल्पवयीन मुलींना मिळून एकूण ४ मुलींचे अपहरण केल्याच्या प्रकरणी ५ तरुणांना कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी नुवे येथील जंगलातून मुलीची सुटका करण्यात आली. फातर्पा येथे शिकणार्या एका विद्यार्थिनीवर शारीरिक शिक्षक रमेश गावकर याने अतीप्रसंग केला. गांधीजयंतीच्या दिवशी शिक्षकाने एका विद्यार्थ्याला ‘मॉप’ने मारहाण करून घायाळ केले. संबंधित शिक्षक प्रसाद पागी याला शाळेतून बडतर्फ करण्यात आले आहे.