महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रथमच गोवा येथे पार पडलेल्या ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या शिबिरात उपस्थितांनी व्यक्त केलेले मनोगत !
गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात ८ आणि ९.१०.२०२३ या २ दिवशी ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना’ या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेले गोवा येथील बासरीवादक श्री. रोहीत वनकर, बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर, डोंबिवली (ठाणे) येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी, ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे) आणि पं. संजय मराठे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६७ वर्षे) या कलाकारांनी शिबिराच्या सत्रात आपले मनोगत व्यक्त केले. ९.११.२०२३ या दिवशी या मनोगतांचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/735913.html |
६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पं. संजय मराठे यांनी शिबिरार्थींना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ हे माझे माहेर आहे’, असे सांगणे
‘पं. संजय मराठे यांनी ‘मी आतापर्यंत ३ वेळा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात येऊन गेलो आहे. हे माझे माहेर आहे’, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाविषयी पुष्कळ आपुलकीने आणि प्रेमाने शिबिरार्थींना सांगितले.
३. श्री. योगेश सोवनी, संगीत अलंकार (तबला), डोंबिवली (ठाणे).
३ अ. ‘येथे येणे’, हेच फार महत्त्वाचे आहे; कारण प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले येथे रहातात. त्यामुळे जिथे देव आहे, तिथे प्रथम जायला हवे.
३ आ. या शिबिरात भावजागृतीच्या सत्रामध्ये कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने सरस्वतीदेवीचा भावप्रयोग केला, तेव्हा ‘प्रत्यक्ष सरस्वतीदेवीच बोलत आहे’, असे मला जाणवले.
३ इ. येथील ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर ‘नामजप कसा करावा ?’, हे सांगावे लागणार नाही, इतकी या ध्यानमंदिरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे.
३ ई. संशोधनकेंद्रातील मंचावर तबला वाजवायला बसल्यावर विविध रचना उत्स्फूर्त सुचतात. ‘ही या जागेची दैवी शक्ती आहे’, हे मी अनुभवले आहे.
३ उ. ‘साधना केल्यावर एकाग्रता वाढते’, हे येथे आल्यावर माझ्या लक्षात आले.
३ ऊ. ‘साधनेच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी योग्य आणि कुठल्या अयोग्य ?’ हेही मला इथे आल्यावर कळले.
३ ए. सूर आणि साधना या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. माझी सुरांवर श्रद्धा होती; परंतु इथे येऊन मी सुरांना नामजपाची जोड द्यायला शिकलो.
३ ऐ. आपण जी साधना करतो, त्यावर आपले प्रेम, विश्वास आणि दृढ भक्ती असावी.’
४. श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे), संगीत अलंकार, ठाणे.
४ अ. ‘देवासाठी निष्कामपणे गायचे’, ही निष्काम साधना येथे शिकायला मिळणे : ‘माझ्याकडे या आध्यात्मिक संशोधन केंद्राविषयी बोलायला पुष्कळ आहे; कारण येथे येण्याचा माझा मागील ५ वर्षांचा अनुभव आहे. आपला सराव (रियाज) करण्यामागील उद्देश ‘माझे स्वर चांगले लागले पाहिजेत, लोकांनी मला चांगले म्हटले पाहिजे’, हा असतो; पण ही सकाम साधना झाली. ‘देवासाठी निष्कामपणे गायचे’, ही निष्काम साधना मला येथे शिकायला मिळाली.
४ आ. ‘गायनातून ईश्वरप्राप्ती करणे’, हा नवीन दृष्टीकोन मिळून जीवनच पालटणे : मला पूर्वी वाटायचे, ‘माझे दूरचित्रवाणीवर कार्यक्रम झाले पाहिजेत; परंतु येथे येऊन माझा गायनाकडे बघण्याचा दृष्टीकोनच पालटून गेला आणि माझे आयुष्यही पालटले. ‘गायनातून ईश्वरप्राप्ती करणे’, हे सगळ्यात उच्च ध्येय आहे आणि यातच आनंद आहे’, हे आता माझ्या लक्षात आले आहे.
४ इ. या संशोधनकेंद्रामध्ये आल्यापासून गायनातून भावजागृती अनुभवता येणे : येथे कृष्णाची (देवतेची) बंदीश (टीप) म्हटल्यावर डोळ्यांत भावाश्रू येतात. येथे आल्यापासून माझी अशी भावजागृती व्हायला लागली आहे. मी येथील मंचावर बसून गातो, तेव्हा ‘इथून उठूच नये’, असे मला वाटते. ‘मी हे जे काही अनुभवतो, ते माझ्या शिष्यांनीही अनुभवावे’, यासाठी मी माझ्या शिष्यांना या शिबिरासाठी घेऊन आलो आहे.
दोन दिवसांचे हे शिबिर पुष्कळ छान झाले. माझ्या शिष्यांनाही शिबिर पुष्कळ आवडले.’
टीप : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’, असेही म्हणतात. ही मध्यलय किंवा द्रुतलय यांत गातात.
गायक आणि वादक यांचा एकत्रित एक कार्यक्रम घेतल्यावर सहभागी कलाकारांना जाणवलेली सूत्रे
या शिबिरात शास्त्रीय गायक पं. संजय मराठे आणि श्री. प्रदीप चिटणीस, संवादिनीवर सौ. सुरमयी वनकर, बासरीवर श्री. रोहीत वनकर, तबल्याच्या साथीला श्री. योगेश सोवनी यांनी एकत्रितपणे राग ‘यमन’ सादर केला. या प्रयोगाच्या वेळी श्री. रोहीत वनकर, श्री. योगेश सोवनी आणि श्री. प्रदीप चिटणीस यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. रोहीत वनकर, एम.ए. संगीत (बासरी), पणजी
अ. ‘गायन-वादनाच्या एकत्रित प्रयोगात पं. संजय मराठे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्यासारखे आध्यात्मिक पातळी असलेले कलाकार असल्यामुळे मला त्यांच्यातील चैतन्याचा लाभ झाला, असे जाणवले.
आ. संशोधनकेंद्रातील कक्षात हा प्रयोग करतांना मला पुष्कळ सकारात्मक ऊर्जा जाणवली.’
२. श्री. योगेश सोवनी (संगीत अलंकार (तबला)), ठाणे.
अ. ‘पं. संजय मराठे, श्री. प्रदीप चिटणीस, श्री. रोहीत वनकर यांच्या समवेत ‘यमन’ रागासाठी तबलावादन करतांना मला आनंद मिळाला. तबलावादन करतांना ‘येथून उठूच नये’, असे मला वाटत होते.
आ. श्री. रोहीत बासरी वाजवतांना ‘ते पुढचा स्वर कुठला वाजवणार’, हे आधीच माझ्या लक्षात येत होते.’
३. श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे.
अ. ‘एकत्रित गायन आणि वादन करतांना पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.’
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक १०.१०.२०२३)
शिबिरार्थींनी दिलेले अभिप्राय
१. श्री. बजरंग कांबळे, कळवा, ठाणे : ‘ईश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी मी जो मार्ग शोधत होतो, तो मला मिळाला’, असे मला जाणवले. इथे आल्यावर मला थकवा जाणवला नाही आणि माझी अध्यात्माविषयीची ओढ वाढली.’
२. सौ. कल्पना कुलकर्णी, चरई, ठाणे : ‘संशोधनकेंद्रात वावरतांना ‘पूर्ण वास्तू हे एक जागृत देवतेचे मंदिर आहे. जागोजागी ईश्वराचा वास आहे. येथे सोऽहम् तत्त्व आहे’, असे मला जाणवले. ‘येथील प्रत्येक साधक हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या रूपात मला परब्रह्माचे दर्शन झाले.’
३. सौ. रेणुका संतोष पाटील, भिवंडी, ठाणे : ‘संशोधनकेंद्रात देवांचा वास आहे. येथे मला पावलोपावली देव दिसत होता.’
४. सौ. सरिता आठवले, घोडबंदर रोड, ठाणे : ‘संशोधनकेंद्रात ऊर्जा आणि परमेश्वराचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवले. येथे मला श्री गुरूंचे दर्शन झाले. (पू. पारनेरकर महाराज हे यांचे गुरु आहेत.) येथे मला वेगळ्याच जगाचे दर्शन झाले.’
५. सौ. बिंदू खानिवडेकर, ठाणे : ‘शिबिरातील ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, हे सत्र मला पुष्कळ आवडले. मी उद्यापासून न्यूनतम एक चूक तरी लिहून काढीन आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करीन.’
६. कु. तनया शिंदे (वय १५ वर्षे), नौपाडा, ठाणे : ‘मला ‘मी शिकत असलेल्या कलेमध्ये (संगीतामध्ये) इतक्या मोठ्या स्तरावर संशोधन होत असेल’, याची कल्पना नव्हती. इथे येऊन त्याविषयीची व्यापकता माझ्या लक्षात आली. घरामध्ये आपण जसे आईशी सगळे बोलतो, तसेच इथल्या प्रत्येक साधकाशी बोलतांना जाणवत होते.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |