तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक महर्षि विश्वामित्र !
भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक ९)
राजा विश्वामित्र महातेजस्वी धर्मात्मा आणि प्रजाहित दक्ष होता. हा राजा विश्वामित्र म्हणजेच महर्षि विश्वामित्र होत. राजघराण्यात जन्माला आलेले विश्वामित्र यांचा जीवनप्रवास राजा, राजर्षि, ऋषि, महर्षि आणि ब्रह्मर्षि असा आहे.
१. राजा विश्वामित्राने महर्षि वसिष्ठांकडील कामधेनूची मागणी करणे
एकदा राजा विश्वामित्र असेच आपल्या सैन्यासह अनेकानेक नगरांमधून भ्रमण करत असतांना एका आश्रमाजवळ येऊन पोचले. निसर्गसौंदर्याने नटलेला तो आश्रम पाहून विश्वामित्रांचे मन मोहित झाले. तो आश्रम होता महर्षि वसिष्ठांचा ! विश्वामित्रांचे आगमन झाल्याचे कळताच महर्षि वसिष्ठांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. दोघेही परस्परांच्या दर्शनाने आणि भेटीने धन्य झाले होते. महर्षि वसिष्ठांकडे शबला नावाची दिव्य गाय होती. ही शबला कामधेनू म्हणजे इच्छित वस्तू उत्पन्न करून देणारी होती. महर्षि वसिष्ठांच्या आज्ञेने कामधेनूने राजा विश्वामित्रांसह त्यांच्या एक अक्षौहिणी सैन्याला भोजन आणि द्रव्य देऊन संतुष्ट केले. हे पाहून ‘कामधेनू शबला आपल्याकडे असावी’, अशी तीव्र इच्छा विश्वामित्रांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी वसिष्ठांना ती गाय मागितली.
महर्षि वसिष्ठ यांनी अंतर्ज्ञानाने विश्वामित्राच्या मनातील लोभ जाणला आणि अत्यंत विनयाने त्यास नकार दिला. विश्वामित्रांनी वसिष्ठांना भरपूर द्रव्य, संपदा देऊ केली, तरीही वसिष्ठांनी त्यास नकार दिला. त्यामुळे विश्वामित्रांना क्रोध आला. ते बळजोरीने शबलेला घेऊन निघाले. तेव्हा शबला गायही क्रोधित झाली. महर्षि वसिष्ठांनी शबलेला केलेल्या आज्ञेने शबला कामधेनुने राजा विश्वामित्रांच्या सार्या सेनेचा तात्काळ संहार केला.
२. राजा विश्वामित्राची तपश्चर्या आणि ‘राजर्षि’ पदाची प्राप्ती !
तेव्हा विश्वामित्रांना कळून चुकले की, केवळ क्षात्रतेज असून उपयोग नाही, तर त्याला तपश्चर्येची जोड देणे आवश्यक आहे. मग त्यांनी युद्धात वाचलेल्या आपल्या शेवटच्या पुत्राला सिंहासनावर बसवून ते वनात निघून गेले. राजा विश्वामित्रांनी हिमालयात तपश्चर्या केली. याने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी त्यांना सर्व प्रकारची अस्त्रे प्रदान केली. त्याचा विश्वामित्रांना गर्व झाला. ते स्वतःला श्रेष्ठ मानू लागले.
विश्वामित्र महर्षि वसिष्ठांच्या आश्रमात पोचले आणि त्या अस्त्रांचा उपयोग करून वसिष्ठांचे सारे तपोवन नष्ट करून टाकले. तेव्हा महर्षि वसिष्ठ तात्काळ विश्वामित्रांचा सामना करण्यास तयार झाले. मग विश्वामित्रांनी महर्षि वसिष्ठांवर अस्त्रे सोडली; परंतु त्या वसिष्ठांकडे असलेल्या ब्रह्मदंडाच्या सामर्थ्यामुळे त्या अस्त्रांचा कोणताच परिणाम होत नसे. यामुळे विश्वामित्रांना कळून चुकले की, ब्रह्मतेजाने म्हणजे तपश्चर्येमुळे, साधनेमुळे प्राप्त झालेले तेजच खरे बळ आहे. नंतर क्षत्रिय बळाचा धिक्कार करत ते पुन्हा एकवार तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. विश्वामित्रांनी ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी १ सहस्र वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना ‘राजर्षि’ ही पदवी दिली. तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. मग विश्वामित्रांनी पुनः १ सहस्र वर्षे घोर तपश्चर्या करून ‘ऋषि’ पद प्राप्त केले. त्यानंतर त्यांची १० वर्षे मेनका या अप्सरेसमवेत गेली. त्याची जाणीव होताच विश्वामित्रांनी पुन्हा कठोर तप केले. त्यावेळी ब्रह्मदेवाने त्यांना ऋषींमध्ये श्रेष्ठ असे ‘महर्षि’ पद प्रदान केले.
३. काम, क्रोधादि विकार घालवण्यासाठी तपश्चर्या करून ‘ब्रह्मर्षि’ पद गाठणे
हे ऐकून विश्वामित्र हात जोडून म्हणाले, ‘ब्रह्मदेवा, आपण जर मला महर्षि पद देत असाल, तर ते मला नको. मी ‘ब्रह्मर्षि’ हे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करू इच्छितो. जेव्हा मी ब्रह्मर्षि पद प्राप्त करीन, तेव्हाच मी स्वतःला जितेंद्रिय समजेन.’ यावर ब्रह्मदेव ‘मग तुम्हाला आणखी पुष्कळ कठोर साधना करायला हवी. अजून तुम्ही जितेंद्रिय झालेले नाही’, असे म्हणून ब्रह्मदेव देवलोकात निघून गेले.
ब्रह्मर्षि हे पद प्राप्त करण्यासाठी पुन्हा कठोर तप चालू केल्यावर रंभा या अप्सरेने त्यात खंड आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर क्रोधित होऊन विश्वामित्रांनी शाप दिला. त्या शापाने त्यांना स्वतःतील क्रोधाची जाणीव झाली आणि ब्राह्मणत्व प्राप्त करून घेण्यासाठी पुन्हा एकवार अती घोर तपश्चर्या चालू केली. काम, क्रोध, मोह अशा कोणत्याच विकारांना अंतरात प्रवेश करू द्यायचा नाही, असा निश्चय केला. असे करत करत त्यांनी एक सहस्र वर्षे तपश्चर्या केली. इतक्या दीर्घकाळ केलेल्या अत्यंत कठोर तपश्चर्येमुळे देवता, ऋषी सर्वच थक्क झाले. अनेक प्रकारे त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न करूनही त्यांची तपश्चर्या चालूच होती. त्या उग्र तपश्चर्येमुळे त्यांची कांती दिव्य भासू लागली. अत्यंत तेजस्वी झाली.
४. वसिष्ठांनी ‘ब्रह्मर्षि’ म्हटले, तरच मनोरथ पूर्ण होईल असे विश्वामित्रांनी सांगणे
काही कालावधीनंतर ब्रह्मदेव सर्व देवता आणि ऋषिगणांसह विश्वामित्रांजवळ पोचले आणि त्यांना दीर्घायुष्य प्रदान केले. या वेळी विश्वामित्र म्हणाले, ‘‘क्षत्रिय, वेद, धनुर्वेद आणि ब्रह्मवेद जाणणार्या ज्ञानी लोकांमध्ये जे सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मर्षि वसिष्ठांनी जर मला ‘ब्रह्मर्षि’ म्हटले, तरच मी माझे मनोरथ पूर्ण झाले आहे, असे समजेन.’’
महर्षि विश्वामित्रांचे हे बोलणे ऐकून सर्व देवता आणि ऋषीगण यांनी ब्रह्मर्षि वसिष्ठांना सारा प्रकार कथन केला. त्यानंतर ब्रह्मर्षि वसिष्ठांनी विश्वामित्रांच्या ब्रह्मर्षि होण्यास स्विकृती दिली आणि पूर्वी घडलेले सर्व विसरून त्यांनी विश्वामित्रांना क्षमा केली. विश्वामित्रांसमवेत स्नेह, मैत्री स्थापन केली.
५. ब्रह्मर्षि वसिष्ठांनी विश्वामित्रांच्या तपश्चर्येचे केलेले कौतुक
मुनीश्रेष्ठ वसिष्ठ हे अग्रगण्य ब्रह्मर्षी होते. ते क्षमाशील होते. त्यांचे मन सागरासारखे विशाल होते. महत्वाकांक्षी असलेल्या विश्वामित्रांना वाटत होते की, ‘वसिष्ठांनी मला स्वतःच्या मुखातून ब्रह्मर्षि संबोधून मान्यता द्यावी;’ परंतु विश्वामित्रांचे ब्रह्मर्षि वसिष्ठांपुढे जाण्याचे धाडस नव्हते. ते वसिष्ठांच्या आश्रमात तर पोचले; पण दडून बसले होते. वसिष्ठांच्या हालचाली पहात होते. रात्रीचा पहिला प्रहर असेल. अमृतासारख्या स्वच्छ सुंदर चांदण्यांचा शिडकाव होत होता. वसिष्ठ प्रसन्न मनाने पत्नी अरुधंतीसह अंगणात बसले होते. त्यांचा सहज संवाद चालू होता.
अरुधंती वसिष्ठांना म्हणाली, ‘‘किती छान आणि प्रसन्न चांदणे पडले आहे.’’ यावर लगेच वसिष्ठ म्हणाले, ‘‘अगदी विश्वामित्रांच्या तपस्येसारखे अमृतसिंचन होत आहे.’’ दडून बसलेल्या विश्वामित्रांनी ब्रह्मर्षि वसिष्ठांचे बोलणे ऐकले आणि ते मनातून चरकले. आपण काय समजत होतो ? किती चुकीचा विचार करत होतो ? हे त्यांना कळून चुकले. ते तसेच धावत पुढे आले आणि त्यांनी वसिष्ठांच्या चरणांवर डोके ठेवले. पश्चात्तापाचे अश्रु त्यांच्या नेत्रांतून ओघळू लागले. त्या उष्ण अशा अश्रुंनी ब्रह्मर्षि वसिष्ठांचे चरण धुऊन टाकले. वसिष्ठ विश्वामित्रांना म्हणाले, ‘‘ब्रह्मर्षि ऊठा !’’ असे म्हणून वसिष्ठांनी विश्वामित्रांना ब्रह्मर्षि म्हणून स्वीकारले. त्यांना छातीशी धरले. विश्वामित्रांच्या आनंदाला उधाण आले. वसिष्ठांनी त्यांना क्षमा केली होती.
मग ब्रह्मर्षि वसिष्ठ म्हणाले, ‘हे ऋषिश्वर, तुम्ही दीर्घकाळ केलेल्या अती उग्र तपश्चर्येमुळे तुमचे सर्व ब्राह्मणोचित संस्कार संपन्न झाले आहेत. तुम्ही ब्रह्मर्षि झाला आहात.’ त्यानंतर ब्राह्मणत्व प्राप्त केलेल्या विश्वामित्रांनी ब्रह्मर्षि वसिष्ठांचे पूजन केले. नंतर सर्व देवदेवता आणि ऋषि गण आपापल्या स्थानी परतले. ब्रह्मर्षि पद प्राप्त करण्याचे आपले मनोरथ पूर्ण झाल्यावरही पुढे ब्रह्मर्षि विश्वामित्र तपश्चर्येमध्ये मग्न राहूनच संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करू लागले. ब्रह्मर्षि विश्वामित्रांचे वर्णन करतांना ब्रह्मर्षि वसिष्ठ म्हणतात, ‘‘महात्मा विश्वामित्र हे तपश्चर्येचे मूर्तीमंत प्रतीक आहेत. त्यांचे बळ अनंत असून त्यांच्यामध्ये अमाप गुणही आहेत.’’
(संदर्भ : ‘सत्संगधारा’ संकेतस्थळ)