चालत्या शवपेट्या !
एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी आजही बहुतांश भारतीय नागरिक बस किंवा रेल्वे यांचाच वापर करतात. प्रवासाचे अंतर अधिक असल्यास आणि त्यातही तो प्रवास रात्रीचा असल्यास प्रवाशांची ‘स्लिपर कोच’ बसगाड्यांना अधिक पसंती असते. ‘दिवसा प्रवासाचा वेळ वाचतो, रात्री आरामात झोपून जाता येते आणि दुसर्या दिवशी सकाळी गंतव्य ठिकाणी पोचून नियोजित कामे करता येतात’, असा त्यांचा सर्वसामान्यपणे विचार असतो, जो योग्यही आहे. तथापि अलीकडच्या कालावधीत या ‘स्लिपर कोच’ बसगाड्यांचे वारंवार अपघात होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यात मृत्यूमुखी पडणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. जून २०२२ मध्ये कर्नाटकातील कलबुर्गी येथे ‘स्लिपर कोच’च्या अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या ४ मासांनंतर, म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे ‘स्लिपर कोच’ची एका ट्रेलरला धडक बसून बसला आग लागली. त्यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्याच मासात, म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये आगरा-लखनौ द्रुतगती महामार्गावर ‘स्लिपर कोच’ आणि डंपर यांच्यात टक्कर होऊन ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. जुलै २०२३ मध्ये महाराष्ट्रातीलच बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर ‘स्लिपर कोच’ दुभाजकाला धडकून आणि नंतर तिने पेट घेऊन झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. हे अपघात गेल्या २ वर्षांतील आहेत. यावरून ही आरामदायी वाटणारी बस प्रवाशांची काळरात्र कधी बनेल ? याचा नेम नाही, असे सध्याचे चित्र आहे. यांतील बुलढाणा येथील अपघात सर्वाधिक भीषण होता; कारण या अपघातानंतर प्रवाशांना बाहेरही पडता आले नाही आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघातानंतर ‘स्लिपर कोच’ला आग लागल्याचा प्रकार जवळपास या सर्व घटनांत दिसून आला. या अपघातानंतरच ‘स्लिपर कोच’ बसगाड्या वापरायच्या कि नाहीत ? याविषयीही चर्चा चालू झाली. ‘प्रत्येक वाहनाला सुरक्षेचे मानक असतात. असे मानक ‘स्लिपर कोच’ बसगाड्यांना आहेत कि नाहीत ?’, असा प्रश्न निर्माण होतो. एवढे अपघात होऊनही संबंधित सरकारांनी ते रोखण्यासाठी काहीही उपाय योजले नाहीत, हेच या अपघातांची वाढती संख्या दर्शवते. रस्ता सुरक्षेसाठी काम करणार्या ‘कॅपेन अगेन्स्ट ड्रंक अँड ड्राईव्ह’ (कॅड) या संस्थेचे संस्थापक प्रिंस सिंघल यांच्या मतानुसार ‘‘स्लिपर कोच’ बसगाड्या या ‘डबल डेक’ (बसमध्ये एकावर एक आसन असलेली व्यवस्था) असतात. भारतात खरोखरच याची आवश्यकता आहे का ?’ एका अहवालानुसार आजमितीस भारतात २२ लाख ‘स्लिपर कोच’ बसगाड्यांची नोंदणी आहे. यांतील ३० टक्के ‘स्लिपर कोच’ बसगाड्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. या सर्व बसगाड्यांमध्ये मिळून त्यात प्रतिदिन ७ कोटी प्रवासी प्रवास करतात. एवढ्या लोकांचा जीव प्रतिदिन टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे सरकारने सिंघल यांच्या मतानुसार या बसगाड्यांची खरोखरच आवश्यकता आहे का ? या बसगाड्यांना अन्य काही पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का ? इत्यादींवर विचार केला पाहिजे, अन्यथा असेच अपघात होत रहातील आणि निष्पापांचे जीव हकनाक जात रहातील. देशात मध्यंतरी मिग लढाऊ विमानांचे इतके अपघात होऊन असंख्य सैनिकांना हकनाक प्राण गमवावे लागले की, त्यांना ‘उडत्या शवपेट्या’, असे संबोधले जाऊ लागले. तसे या ‘स्लिपर कोच’ बसगाड्याही ‘चालत्या शवपेट्या’ बनण्याच्या मार्गावर आहेत. हे रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनीच कंबर कसायलाच हवी !