वैद्यकीय व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करतांना धर्महानी रोखून धर्माविषयी जागृती करणारे फोंडाघाट (जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण (वय ४९ वर्षे) !
कार्तिक शुक्ल तृतीया (१६.११.२०२३) या दिवशी फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. माधुरी ढवण यांना जाणवलेले त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.
वैद्य नितीन ढवण यांना ४९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. जवळीक करणे : ‘वर्ष १९९६ मध्ये माझे यजमान वैद्य नितीन ढवण आणि मी देवगड तालुक्यातील नारिंग्रे या गावी रहात होतो. माझे यजमान तिथे वैद्यकीय व्यवसाय करत होते. गावात यजमानांविषयी पुष्कळ आदर आहे. यजमान रुग्णांशी बोलतांना अतिशय मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे रुग्णही यजमानांशी मोकळेपणाने बोलतात. अनेक जण अगदी त्यांच्या मुलांचे शिक्षण किंवा काही घरगुती गोष्टी यांविषयीही यजमानांशी मोकळेपणाने बोलतात.
२. वैद्यकीय सेवेविषयी असलेली कर्तव्यनिष्ठता : तेथील पंचक्रोशीतील रुग्ण यजमानांकडे रात्री-अपरात्री केव्हाही उपचारासाठी येत असत. त्यामुळे यजमानांची रुग्णसेवा दिवसरात्र चालू असायची. एकदा रात्री यजमानांना ताप आला असतांना एक जण त्यांच्या नातेवाइकाला तपासण्यासाठी यजमानांना त्यांच्या घरी बोलवायला आले होते. मी त्यांना म्हणाले, ‘‘आज ते रुग्णाला तपासण्यासाठी घरी येऊ शकणार नाहीत’’; पण झोपेत असतांनाही यजमान म्हणाले, ‘‘त्यांना उच्च रक्तदाब आहे. त्यांना त्रास होईल.’’ शेवटी ते त्या रुग्णाला तपासून आले.
३. गुरुदेवांची कृपा आणि यजमानांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद यांमुळे नवीन ठिकाणी चालू केलेल्या चिकित्सालयाला यश मिळणे : त्यानंतर यजमानांच्या आई रुग्णाईत झाल्यामुळे आम्हाला फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) या गावी यावे लागले. तिथे आधीपासूनच त्यांच्या वडिलांचे चिकित्सालय चालू होते. खरेतर १० – १२ वर्षे चांगले चालत असलेले चिकित्सालय बंद करून नवीन गावी ते चालू केल्यावर त्यात यश मिळायला बराच वेळ लागतो; पण केवळ गुरुदेवांची कृपा आणि यजमानांच्या आई-वडिलांचा आशीर्वाद यांमुळे या गोष्टी सहज शक्य झाल्या.
४. नातेवाईक आणि रुग्ण यांना साधना सांगणे : नारिंग्रे येथे रहात असतांनाच आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ केला होता. त्यामुळे फोंडाघाट येथे चिकित्सालय चालू केल्यावर आम्हाला साधना आणि व्यवहार याची सांगड घालता आली. अनेक रुग्ण यजमानांना त्यांच्या शारीरिक समस्या सांगतात. तेव्हा यजमान आवश्यकतेनुसार त्यांना औषधोपचारासह साधनाही सांगतात.
४ अ. साधनेला विरोध करणार्या नातेवाइकांना साधना सांगून त्यांचे मन परिवर्तन करणे : आमचे अनेक नातेवाईक ‘नितीन सनातनमध्ये जाऊन वाया गेला’, असे म्हणत होते. त्यामुळे यजमानांना पुष्कळ वाईट वाटायचे. नंतर त्यांनी त्या नातेवाइकांना साधना सांगितली. आज त्या नातेवाइकांच्या कुटुंबातील सगळे जण ‘कुलाचारचे पालन करणे, दत्ताचा नामजप करणे, अर्पण देणे’, अशा पद्धतीने साधना करत आहेत.
४ आ. नातेवाइकांना साधना सांगितल्यावर त्यांना लाभ होऊन ते सनातन संस्थेशी जोडले जाणे : आमच्या एका नातेवाइकांंच्या लग्नाला १० वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हते. यजमानांनी त्यांना साधना सांगितली. त्यांनीही ‘कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करणे, अर्पण देणे’, या गोष्टी मनापासून केल्या. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. आता ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले असून मासिक अर्पण देतात. ते प्रासंगिक सेवेच्या माध्यमातून सनातन संस्थेशी जोडले आहेत.
४ इ. शालेय मित्राचे निधन झाल्यावर मित्राच्या मुलांना साधना सांगितल्यामुळे ती मुले जीवनात यशस्वी होणे : यजमानांच्या एका शालेय मित्राचे अपघाती निधन झाले. त्या मित्राला ४ मुले होती आणि ती शालेय शिक्षण घेत होती. यजमानांनी मुलांना आणि त्यांच्या आईला साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यामुळे ते सर्व जण दत्ताचा नामजप नियमितपणे करू लागले. त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे त्यांना धर्मांतरित करण्याचाही प्रयत्न झाला; पण यजमानांनी त्यांना आधीच याविषयी सांगितल्यामुळे त्यांनी धर्मांतरण करणार्या व्यक्तींना पुन्हा घरात येऊ दिले नाही. आता ही मुले चांगल्या पदावर नोकर्या करत असून ‘ती अर्पण देणे आणि नामजप करणे’, अशी साधनाही करत आहेत.
५. धर्माचरणाची आवड : यजमान धर्माचरणाच्या कृती अगदी मनापासून करतात. ते कुठेही बाहेर जातांना कुंकू लावूनच जातात. त्यामुळे त्यांचा चेहरा तेजस्वी दिसतो.
६. धर्महानी रोखणे : यजमानांकडे काही औषध आस्थापनांचे प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटिव्ह) येतात. एका औषध आस्थापनाच्या पत्रकावर प्रभु श्रीरामाचे विडंबन केले होते. ते पाहून यजमानांनी ‘यातून धर्महानी कशी होत आहे ?’, हे त्या प्रतिनिधीच्या लक्षात आणून दिले. तेव्हा त्यांच्या आस्थापनाने क्षमायाचनेचे पत्र लिहून पाठवले.
७. धर्मविरोधी ‘हलाल’ प्रमाणीकरणाच्या विरोधात जागृती करणे : एका नामवंत आस्थापनाची औषधे ‘हलाल’ प्रमाणित असल्याचे लक्षात आल्यावर यजमानांनी ‘ते चुकीचे कसे आहे ?’, हे त्या आस्थापनाच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून दिले. यजमानांनी त्याविषयीचे त्यांच्या भ्रमणभाषमधील चलत्चित्रही त्या प्रतिनिधींना दाखवले आणि अशा ‘हलाल’ प्रमाणीकरण केलेल्या औषधांच्या शिफारशीसाठी चिकित्सालयात न येण्याविषयी निक्षून सांगितले.
या वेळी त्यांच्यापैकी एका प्रतिनिधीने ‘हलाल’ प्रमाणीकरणाचा विषय जाणून घेऊन त्यांच्या वसाहतीत त्यासंदर्भात एक व्याख्यान आयोजित केले.
८. सर्वांशी आदराने वागणे : वैद्यकीय व्यवसायामुळे अनेक आधुनिक किंवा आयुर्वेदीय वैद्य यजमानांच्या संपर्कात येतात. त्यातील बरेच जण यजमानांपेक्षा वयाने लहान आहेत; पण यजमान त्यांना एकेरी नावाने कधीच संबोधत नाहीत. रुग्णांशी बोलतांनाही ते आदराने बोलतात.
९. अल्प अहं : एखाद्या रुग्णाच्या व्याधीविषयी त्यांना कळले नसेल किंवा ठाऊक नसेल, तर ते त्याविषयी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या वैद्यांनाही सहजतेने विचारतात. ते नेहमी शिकण्याच्या स्थितीत असतात.
१०. साधकांना भ्रमणभाषवरून औषधोपचारांविषयी मार्गदर्शन करण्याची सेवा करणे : आर्थिक कारणांमुळे यजमानांना समष्टी सेवेला वेळ देता येत नाही. सदगुरु स्वाती खाडये आणि सदगुरु सत्यवान कदम यांच्या कृपेने यजमान भ्रमणभाषवरून अनेक रुग्णाइत साधकांना वैद्यकीय उपचार सांगतात. सोलापूर आणि कुडाळ या सेवाकेंद्रातील रुग्णाईत साधकही औषधोपचारांसाठी यजमानांचे मार्गदर्शन घेतात. सोलापूर येथील साधकांना यजमानांनी कधी पाहिलेही नाही, तरी यजमानांनी सांगितलेली औषधे त्यांना लागू पडतात. तेव्हा ‘गुरुदेवच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत’, असा त्यांच्या मनात या सेवेविषयी अपार कृतज्ञताभाव असतो.
११. यजमानांच्या शस्त्रकर्माच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !
११ अ. शस्त्रकर्मासाठी जवळ पुरेसे पैसे नसणे आणि यजमानांच्या एका मित्राने त्यांच्या खात्यावर पैसे भरणे : ऑगस्ट २०२३ मध्ये अकस्मात् यजमानांच्या मूत्राशयात खडे झाले. त्याचे तातडीने शस्त्रकर्म करावे लागले. त्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. शस्त्रकर्म तातडीने करावे लागणार असल्याने यजमान काळजीत होते. गुरुकृपेने यजमानांच्या एका वैद्य मित्राने यजमानांना काही न कळवता यजमानांच्या अधिकोषातील खात्यावर ५० सहस्र रुपये भरले.
११ आ. शस्त्रकर्मकक्षात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असे अनुभवणे : दुसर्या दिवशी यजमानांचे शस्त्रकर्म झाले. शस्त्रकर्म करायला विहित वेळेपेक्षा पुष्कळच अधिक वेळ लागला; मात्र ‘शस्त्रकर्म चालू असतांना शस्त्रकर्मकक्षात आधुनिक वैद्यांच्या समवेत गुरुदेव आहेत’, असे यजमानांना जाणवत होते.
११ इ. वैद्यकीय व्यवसाय प्रामाणिकपणे केल्यामुळे रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी रुग्णालयाचे देयक न घेणे : त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी आमची चांगली सोय केली. रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघतांना आम्ही देयक विचारले. तेव्हा तेथील आधुनिक वैद्य आम्हाला म्हणाले, ‘‘यांनी आमच्याकडे अनेक रुग्ण पाठवले आहेत. त्यासाठी त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत.’’ असे सांगून त्यांनी आमच्याकडून देयक घेतले नाहीत.
यजमान त्यांचा वैद्यकीय व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करत असल्यामुळे आम्हाला अशी अनुभूती आली.
१२. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘गुरुदेव, आपल्याच कृपेने मला असा आध्यात्मिक पती मिळाला आहे’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. मला त्यांच्याप्रमाणे सतत शिकण्याच्या स्थितीत रहायला शिकवा. आज यजमानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.’
– सौ. माधुरी नितीन ढवण, फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), (२.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |