हमासकडूनच निष्पाप नागरिकांची हत्या ! – इस्रायलने कॅनडाला फटकारले
तेल अविव – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विटरच्या माध्यमातून जस्टिन ट्रुडो यांनी निष्पाप नागरिकांच्या होणार्या हत्येच्या आरोपांना उत्तर देत त्यांना चांगलेच फटकारले. नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही नाही, हमासच निष्पाप नागरिकांची हत्या करत आहे. हमासच्या आतंकवाद्यांनी दुसर्या महायुद्धात ज्यूंच्या नरसंहारानंतर अत्यंत क्रूर पद्धतीने निष्पाप नागरिकांचे शिरच्छेद केले, त्यांना जाळले आणि त्यांची हत्या केली. इस्रायल सामान्य नागरिकांना हानीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगितले; पण हमास त्यांना बंदुकीच्या जोरावर रोखत आहे. नागरिकांची हत्या करणे आणि त्यांचा ढाल म्हणून वापर करणे, या दुहेरी गुन्ह्यासाठी हमासला उत्तरदायी धरले पाहिजे.’’
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी इस्रायल सरकारला संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. गाझामधील मुलांची हत्या थांबली पाहिजे, असे ट्रुडो म्हणाले होते.