मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र शाळा आणि महाविद्यालये उघडा ! – मौलाना मदनी
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मौलाना सय्यद अरशद मदनी यांनी मुसलमान समाजातील मुलींसाठी स्वतंत्र शाळा आणि महाविद्यालये उघडण्याची मागणी केली. मदनी म्हणाले की, इयत्ता आठवीपासून मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र शाळा उघडण्यात याव्यात. जमियत उलेमा-ए-हिंद (अरशद मदनी गट) यांनी आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत इयत्ता आठवीनंतर मुलींसाठी स्वतंत्र शाळा चालू करणे, मतदार जनजागृती मोहीम राबवणे, मतदारसूचीत नवीन नावे समाविष्ट करणे, यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पश्चिम उत्तरप्रदेशातील १७ जिल्ह्यांचे अधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.
इदगाह रोडस्थित मदनी मेमोरियल स्कूलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेले जमियतचे प्रांतीय अध्यक्ष मौलाना अशहद रशीदी म्हणाले की, उलेमा-ए-हिंदच्या स्थापनेचा मूळ उद्देश राष्ट्र आणि देशसेवेसमवेत इस्लामिक मूल्यांचे रक्षण करणे, हा आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जमियत मैदानात उभी असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मौलाना अझहर मदनी, मौलाना हबीबुल्ला मदनी आणि हाफीज अब्दुल कुद्दुस हादी यांच्यासह इतर वक्त्यांचीही भाषणे झाली.
संपादकीय भूमिकामुसलमान मुला-मुलींनी मुख्य प्रवाहात येऊन शिक्षण घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत असतांना मुसलमान मुलींसाठी स्वतंत्र शाळांची मागणी करणे, म्हणजे उलट दिशेने प्रवास करण्यासारखे आहे ! |