Goa Rave Parties : वागातोर येथील अपघाताचा ‘रेव्ह पार्टी’शी संबंध असल्याचा स्थानिकांना संशय
पणजी, १४ नोव्हेंबर (वार्ता.) : वागातोर येथे ११ नोव्हेंबर या दिवशी नशेत वाहन चालवून ‘रिसॉर्ट’च्या मालकिणीला वाहनाखाली चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक वेणु कुरूप याला कह्यात घेऊन त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. वाहनचालक वेणु कुरूप अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. याच कालावधीत वागातोर येथे चालू असलेल्या एका ‘रेव्ह पार्टी’चा अपघाताशी संबंध असल्याची चर्चा सध्या चालू आहे.
स्थानिक नागरिक आणि हणजूण पंचायतीचे काही पंचसदस्य यांनी दिलेल्या माहितीनुसार वागातोर येथे १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘ड्रीम बीग’ या नावाने एका ‘रेव्ह पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. एका ‘वजनदार’ अमली पदार्थ व्यावसायिकानेच या पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी साहजिकच मद्य आणि अमली पदार्थ यांचे सेवन केले गेले. पर्यटक या पार्ट्यांकडे आकर्षिले जातात. स्थानिकांच्या मते पर्यटक अशा रेव्ह पार्ट्यांना उपस्थिती लावून अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करतात.
११ नोव्हेंबर या दिवशी अपघाताला उत्तरदायी असलेल्या वाहनचालकानेही या रेव्ह पार्टीला उपस्थिती लावून तेथे अमली पदार्थाचे सेवन केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षदर्शीच्या मते अपघात झाला, तेव्हा वाहनचालक मद्यप्राशन किंवा अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रमाणे वागत होता.
हणजूण पोलिसांची मद्यपींना चेतावणी
म्हापसा : गोव्यात मद्यपान करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हा प्रविष्ट केला जाणार आहे. या प्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नाही. आवश्यकता भासल्यास वाहनचालक परवाना (लायसन्स) रहित केला जाणार आहे. पर्यटकांनी येथील निर्सगाचा आस्वाद घ्यावा; मात्र दारू पिऊन हुल्लडबाजी करून अपघात करणार्यांची गय केली जाणार नाही, अशी चेतावणी हणजूण पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे. वागातोर येथे ११ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही चेतावणी देण्यात आली आहे.
(सौजन्य : In Goa 24×7)
संपादकीय भूमिकास्थानिकांना ‘रेव्ह पार्ट्यां’ची आणि अमली पदार्थ व्यवहाराची माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस निष्क्रीय आहेत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन करणार्यांशी साटेलोटे आहे ? |