बहीण भावाच्या स्नेहबंधाचा दिवस म्हणजे भाऊबीज !
१५ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या ‘भाऊबिजे’च्या निमित्ताने !
‘कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज येते. यमराजाने आपली बहीण यमुना (यमी) हिच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू भेट देऊन तिच्या घरी भोजन केले; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे म्हणतात. ‘या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यामुळे त्या वर्षी तरी यमापासून भय नसते’, असा एक समज आहे.
बहीण भावाच्या प्रेमाचा आणि स्नेहबंधाचा हा दिवस ‘भाऊबीज’ या नावाने साजरा होतो. यमासारखा कठोर हृदयी भाऊ आपल्या बहिणीसाठी सहृदयी झाला, तो हा दिवस ! या दिवशी भाऊ आवर्जून आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहिणीच्या घरची भाजी-भाकरी आनंदाने खातो. अर्थात् या दिवशी त्याला बहिणीच्या घरी गोडधोड अवश्य मिळतेच. बहीण मोठ्या प्रेमाने त्याला ओवाळते. भाऊ तिला यथाशक्ती भेटवस्तू देतो. सर्वसामान्यांमध्येही लोकप्रिय झालेला असा हा दिवस आहे. बहिणीला भावाची आणि भावाला बहिणीची विलक्षण ओढ लावणारा दिवस आहे. सख्खे, सावत्र वा मानलेले भाऊ-बहीण या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात.
‘भाऊबीज’ हा बहीण-भावाच्या मंगल आणि पवित्र प्रेमाचा दिवस भारतीय संस्कृतीतील ‘सोनेरी पान’ आहे. निःस्वार्थी बहीण भावाकडून केवळ प्रेमाचीच अपेक्षा करते.
‘नको धन, नको मुद्रा, नको मोतियांचा हार ।
देई प्रेमाश्रूंची धार, भाऊराया ॥’
एवढीच तिची बंधूरायाकडून अपेक्षा असते. भाऊ नसलेल्या स्त्रिया चंद्राला स्वतःचा भाऊ मानून त्याला ओवाळतात. ‘भाऊबिजेच्या दिवशी भावाने स्वतःच्या घरी जेवू नये. पत्नीच्या हातचे अन्न खाऊ नये. बहिणीच्याच घरी जाऊन तिच्या हातचे अन्न खावे’, असे सांगितले आहे.’
– प्रा. रवींद्र धामापूरकर, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. (साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक २०११)
कौटुंबिक स्नेहाला उजाळा देण्याचा दिवस भाऊबीज !
‘बहीण-भाऊ यांचे नाते एक विशेष आणि अलौकिक असे स्नेहबंधन असते. एकमेकांच्या सुखाकरता झटावे, ही त्यांची आतील माया असते. दुःखात वा संकटात एकमेकांना साहाय्य करण्यासाठी बहीण भावाकडे अन् भाऊ बहिणीकडे जात असतो. या कौटुंबिक स्नेहाला उजाळा देण्याचा हा दिवस ! यम आणि यमी (यमुना) ही दोन भावंडे. यमुनेकडे जायला यमाला कार्यबाहुल्यामुळे पुष्कळ दिवस सवड झाली नाही. एक दिवस वेळ मिळताच तो यमुनेकडे गेला. तिला पुष्कळ आनंद झाला. तिने सन्मानपूर्वक त्याचे स्वागत करून त्याला खाऊ-पिऊ घातले आणि आनंदात दिवस घालवला. याची स्मृती म्हणून हा दिवस साजरा करतात. काही ठिकाणी यम, यमुना, चित्रगुप्त अन् यमाचे दूत यांची पूजा करण्याचीही प्रथा आहे.’
– सौ. वसुधा ग. परांजपे, पुणे.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक, वर्ष १)