‘Indrayani’ In Danger : लाखो वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या विळख्यात !
आळंदी (जिल्हा पुणे) – लाखो वारकर्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ऐन दीपावलीत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे. नदीत विविध कारखान्यांचे पाणी सोडल्याने नदीवर मोठ्या प्रमाणात फेस सिद्ध झाला आहे. या फेसाचा पूर्ण तवंग नदीच्या सर्व पात्रात पसरला आहे आणि पाण्याला दुर्गंधी येत आहे. या नदीचे पाणी पवित्र समजले जाते आणि त्यात वारकरी स्नान करतात. हे पाणी सध्या इतके प्रदूषित आहे की, वारकर्यांनी स्नान केल्यास त्यांना त्वचाविकार होण्याचा मोठा धोका आहे. नदीचे पाणी अस्वच्छ असून ठिकठिकाणी घाण साचलेली आहे आणि जलपर्णीची समस्याही अजून मोठ्या प्रमाणात आहे. ‘कार्तिक एकादशी’ जवळ येत असूनही प्रशासनाच्या अनास्थेमुळे वारकर्यांच्या भावना संतप्त आहेत !
प्रदूषण मंडळाची ‘हाताची घडी तोंडावर बोट !’नदीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून प्रदूषण मंडळाची भूमिका मात्र ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशीच आहे. गेल्या काही कालावधीपासून काही कारखान्यांना नोटिसा पाठवणे आणि पाण्याचे प्रदूषण अधिक झाल्यावर त्याचे नमुने पडताळणीसाठी घेऊन जाणे एवढेच काम प्रदूषण मंडळ सध्या करत आहे. |
काही प्रतिक्रिया
१. नदीचे पाणी कपडे धुण्यासाठीही वापरण्याजोगे नाही ! – अवसाराम पर्हाड, सामाजिक कार्यकर्ते, आळंदी
इंद्रायणी हे पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. वर्ष १९८७ मध्ये आम्ही येथे रहाण्यास आलो, तेव्हा आम्ही या नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत असू. या नदीचे पाणी त्या वेळी संपूर्ण गावाला पिण्यासाठी वापरले जात आहे. यानंतर हळूहळू या नदीत प्रदूषण वाढत गेले. सध्या हे पाणी इतके प्रदूषित आहे की, ते पाणी कपडे धुण्याच्या पात्रतेचेही राहिले नाही. या पाण्याने येथील अनेक नागरिकांना त्वचारोग झाल्याच्या तक्रारी आहेत. तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
२. नदी प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम ! – राजश्री आवटे, शिक्षिका, पुणे
मी प्रतिदिन येथे घाटावर सायकल चालवण्यासाठी येते. हे पाणी फेसाळलेले असून त्या प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर याचे परिणाम होत आहे. तरी या विरोधात आवाज उठवणे अत्यावश्यक आहे.
३. नदी प्रदूषणावर उपाययोजना न काढल्यास जलसमाधी ! – विठ्ठल शिंदे, अध्यक्ष, ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’
या संदर्भात ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. विठ्ठल शिंदे म्हणाले, ‘‘लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येऊन नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात; मात्र औद्यागिकरणाने नदीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नदीच्या प्रदूषणावर मार्ग निघण्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदने, धरणे आंदोलन, साखळी उपोषण यांसह अनेक गोष्टी केल्या; मात्र त्यावर ठोस उपाययोजना निघालेली नाही. विशेष म्हणजे प्रदूषण मंडळ हे फेसाळणारे पाणी हे साबणाचे पाणी असे सांगत आहे. प्रदूषण न थांबल्यास आम्हाला नदीत जलसमाधी घ्यावी लागेल !
४. कार्तिकी जवळ येत असल्याने प्रशासनाने तात्काळ प्रदूषण दूर करावे ! – ह.भ.प. संजय महाराज कावळे, अध्यक्ष, आध्यात्मिक गुरुकुल संघ
लवकरच कार्तिक एकादशी जवळ येत असून अनेक वारकरी मोठ्या श्रद्धेने येथे येतील. दुर्दैवाने गेली अनेक वार्यांमध्ये नदीच्या पाण्यात सुधारणा होत नसल्याने वारकर्यांना या पाण्यातच स्नान करावे लागते. वारकर्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने ते विकत घ्यावे लागते. तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून नदी स्वच्छ करावी.
महापालिका आणि प्रदूषण मंडळ इंद्रायणीच्या प्रदूषणास कारणीभूत ! – डॉ. सुनील वाघमारे, सल्लागार, इंद्रायणी सेवा फाऊंडेशन या नदीत स्नान केल्यामुळे वारकर्यांच्या अंगाला खाज येते. पाण्याला उग्र वास येत आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका आणि राज्यशासन हे कारणीभूत आहेत. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी लोकजागृती अत्यावश्यक आहे. सरकारमधील घटकांनी याकडे तातडीने लक्ष घालून कृती करणे आवश्यक आहे. |
नदीच्या प्रदूषणात ‘केमिकल’ आस्थापनांचा मोठा हातभार !
नदीच्या प्रदूषणात काही ‘केमिकल’ आस्थापने मोठा हातभार लावतात. नदीकाठावर असलेली काही ‘केमिकल आस्थापने’ प्रक्रिया न करता त्यांचे रसायनमिश्रीत पाणी थेट नदीत सोडतात. यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने नदीच्या पाण्याचा रंग कधी हिरवा, तर कधी पिवळा होतो, तसेच पाण्यातील प्राणवायू अल्प होतो. यामुळे नदीतील मासे आणि अन्य जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
याच समवेत काही भंगार व्यावसायिक त्यांच्या भंगारातील टाकाऊ कचरा थेट नदीत टाकतात. यात प्लास्टिकचा समावेशही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेही नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.
या संदर्भात आळंदी येथील मुख्याधिकारी यांच्याशी दूरभाषद्वारे संपर्क केला असता त्यांनी भ्रमणभाष न उचलल्याने प्रशासनाची भूमिका समजू शकली नाही.