अधार्मिक असलेल्या जावेद अख्तर यांनी रामरायाला वंदन करण्याविषयी सांगण्याचे प्रयोजन काय ?
‘९ नोव्हेंबरला गीतकार जावेद अख्तर यांनी एका दीपोत्सवाच्या कार्यक्रमात ‘रामायण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. राम केवळ हिंदूंचेच नाहीत’, वगैरे बडबड केली. त्यांची ही निरर्थक बडबड प्रत्यक्षात मुखवटा होता; कारण शेवट करतांना ‘जय सियाराम’ असेच म्हणायची पद्धत आहे. ‘सीता आणि रामाला केवळ रावणाने विलग केले होते. आजही जे तसे करतात ते रावणच आहेत. माझ्यासह तुम्हीही घोषणा द्या; जय सियाराम आणि इथून पुढे जय सियारामच म्हणा’, ही मखलाशी करून त्यांनी बडबड संपवली.
जावेद अख्तर यांच्या बोलण्याचा रोख स्पष्ट होता. ‘जय श्रीराम’, या घोषणेला ‘जमात ए पुरोगामी’ने सांप्रदायिक नारा घोषित केले असल्याने त्याला पर्याय देत ‘गोड बोलणे’, हा उद्देश होता. भाबडी हिंदू मने याला भुलतात, हा आत्मविश्वास त्यामागे असणार; पण नियती क्रूर असते, असे म्हणतात. वृत्तपत्रांनी आज ही बातमी झळकवल्यापासून ‘अख्तर भाजपची चापलुसी करत आहे’, अशी शेरेबाजी खुद्द त्यांच्याच कंपूने चालू केली आहे. महर्षि वाल्मीकि म्हणतात, ‘राम हा साक्षात् धर्म आहे. तो सगळ्यांचाच राजा आहे. त्याच्याकडे भेदभाव नाहीच मुळी’; पण ‘तो केवळ हिंदूंचाच नाही’, असे म्हणणार्या व्यक्तींनी राममंदिराविषयी काय भूमिका घेतली होती ?
फार खोलात न जाता इतकेच सांगतो की, राम आहे तिथे जसा हनुमान असतोच, तशी सीतामाईही असतेच. एकाची स्वामिनिष्ठा, तर दुसरीचे पातिव्रत्य त्यांना तिथे खेचून आणतेच. मूर्तीमंत धर्म असलेल्या रामरायाला वंदन कसे करावे, हे सोयीस्कर नास्तिक आणि अधार्मिक असलेल्या अख्तर यांनी सांगण्याचे प्रयोजन काय ? (११.११.२०२३)
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.