बीड येथे ऐन दिवाळीत केली पोलिसांनी धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणी १८१ जणांची दिवाळी कारागृहात !

पोलिसांनी आणखी ४०० जणांची ओळख पटवली !

प्रतिकात्मक चित्र

बीड – काही दिवसांपूर्वी जिल्‍ह्यात मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनात घुसून काही अज्ञातांनी राजकीय नेत्‍यांचे घर आणि कार्यालये जाळपोळ केली होती. त्‍यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले होते. बीड पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत १८१ जणांना अटक केली आहे. यातील काही जण पोलीस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्‍यामुळे या आरोपींना दिवाळी कारागृहात साजरी करण्‍याची वेळ आली आहे. विशेष म्‍हणजे या घटनांमध्‍ये पोलिसांनी आणखी ४०० जणांची ओळख पटवली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी उपोषण चालू असतांनाच ३० आणि ३१ ऑक्‍टोबर या दिवशी बीड येथील आंदोलक आक्रमक झाले होते. अज्ञातांनी राष्‍ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्‍हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र मस्‍के, ‘बी.आर्.एस्.’चे दिलीप गोरे यांची कार्यालये पेटवली होती. माजलगाव येथील नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्‍या निवासस्‍थानांना आग लावण्‍यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ सारखे गंभीर गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत त्‍यांना अटक करण्‍याची मोहीम राबवली आहे.

पोलिसांनी घटनेचे ध्‍वनीचित्रीकरण आणि ‘सीसीटीव्‍ही’च्‍या माध्‍यमातून आक्रमणकर्त्‍यांची ओळख पटवली आहे. ज्‍यात आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. अजूनही पोलिसांची धरपकड चालूच आहे. ऐन दिवाळीत पोलिसांची धरपकड चालू असल्‍याने अनेकांनी शहर सोडले आहे; मात्र इतर जिल्‍ह्यांत जाऊन पोलीस आरोपींचा शोध घेऊन त्‍यांना कह्यात घेत आहेत. बीड येथे जाळपोळ करणारे कोणत्‍या समाजाचे आहेत ? हे आमच्‍यासाठी महत्त्वाचे नाही. आमच्‍यासाठी आरोपी हा आरोपीच आहे, हे महत्त्वाचे आहे, असे पोलिसांकडून सांगण्‍यात आले आहे.