स्त्रियांनी रजोनिवृत्तीच्या काळासाठी स्वतःला कसे सिद्ध ठेवावे ?
स्त्रियांच्या जीवनात अनेक स्थित्यंतरे येत असतात. जेव्हा स्त्री ४० ते ४५ वर्षे वयोगटात येते, तेव्हा तिच्या शरिरातील संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या) पातळीत कमतरता येऊ लागते आणि त्यामुळे अनेकविध शारीरिक अन् मानसिक लक्षणे उत्पन्न होतात. वयाच्या चाळीशीनंतर मासिक पाळी थांबण्यापर्यंतचा जो काळ असतो, तो ‘रजोनिवृत्तीचा काळ’ म्हटला जातो. शरिरात होणार्या या पालटांविषयी आपल्याला कल्पना असल्यास आपण त्या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्त्रिया रजोनिवृत्तीच्या काळातही स्वतःचे आरोग्य अबाधित राखू शकतात.
१. रजोनिवृत्तीच्या दिसणारी लक्षणे
रजोनिवृत्तीच्या काळात पुढील लक्षणे आपल्याला दिसून येतात.
अ. शरिरात अधिक उष्णता निर्माण झाल्याचे जाणवते.
आ. संपूर्ण अंगाची आग होणे; डोळे, कान, नाक यांतून गरम वाफा बाहेर पडल्यासारखे जाणवणे.
इ. थकवा जाणवणे, पोटर्या दुखणे, अंग गळून गेल्यासारखे वाटते.
ई. शारीरिक पालटांसह मनाचे स्वास्थ्यही ढळते. एकटेपणाची भावना बळावू लागते.
उ. आपण घरात दुर्लक्षित होत आहोत, असे वाटू लागते. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. एकंदरीतच नैराश्यासारखी स्थिती निर्माण होते.
ऊ. झोप व्यवस्थित लागत नाही.
ए. हाडांचा ठिसूळपणा डोके वर काढू लागतो आणि त्यामुळे सांधे, अंग, कंबर इत्यादींची दुखण्याची लक्षणे उभारतात.
२. स्त्रियांनी स्वतःच्या शरिराची काळजी योग्य वेळेत घेणे महत्त्वाचे
आयुर्वेद शास्त्रानुसार ही अवस्था वात आणि पित्त दोष वाढवणारी अन् कफ दोष न्यून करणारी असते. ही नैसर्गिक अवस्था असून हा काळ साधारणपणे काही मास ते काही वर्षे असू शकतो. तरी स्त्रीपरत्वे यामध्ये भिन्नता आढळते. या नैसर्गिक अवस्थेचे योग्य ते नियोजन केल्यास शारीरिक आणि मानसिक पालटांना चाळीशीच्या उंबरठ्यावरील स्त्री आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकेल. सगळ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणार्या स्त्रिया स्वतःच्या आरोग्याविषयी मात्र अत्यंत उदासीन असतात. ही उदासीनता पुढे आरोग्यास बाधाकारक ठरते; म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या शरिराची योग्य ती काळजी योग्य त्या वेळेत घेणे आवश्यक असते.
३. रजोनिवृत्तीच्या काळात घ्यावयाचा आहार
आपण वाचले की, या अवस्थेत वात आणि पित्त दोष वाढतात. या विरुद्ध गुणांचा आहार विहार स्त्रियांनी करायला हवा, म्हणजेच कसा ते समजून घेऊया.
अ. आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश करावा. दूध, तूप, लोणी असे पदार्थ आपल्या आहारात नियमित असावेत.
आ. फळांमध्ये चिक्कू, सफरचंद, अंजीर, पपई, अक्रोड, आवळा, खजूर, डाळिंब अशी फळे खावीत. प्रतिदिन एखादे फळ आपल्या आहारात समाविष्ट करावे.
इ. नाचणी, तीळ, कढीपत्ता, शेवगा यांचा समावेश केल्यास हाडांना बळकटी मिळण्यास साहाय्य होते. असे पदार्थ आपल्या आहारात असतील, तर आपल्याला कॅल्शियमसाठी वारंवार गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. स्त्रियांमध्ये सांधेदुखीचे लक्षण जोपर्यंत तीव्र होत नाही, तोपर्यंत स्त्री स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते. रक्ताची तपासणी केल्यावर शरिरात कॅल्शियम न्यून झाल्याचे आढळते आणि परिणामी गोळ्यांचे साहाय्य घ्यावे लागते. शरिरात कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्त्व न्यून असल्यास गोळ्यांचे साहाय्य डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य घ्यावे; परंतु प्रारंभीपासूनच आपल्याला याची कमतरता भासू नये; म्हणून आपल्या आहाराकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे.
ई. आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा; परंतु त्या शिजवूनच खायला हव्यात आणि आठवड्यातून १ ते २ वेळा खाव्यात.
उ. अतितिखट, अतिमसालेदार पदार्थ आणि आंबवलेले पदार्थ वर्ज्य करावेत. चहा, कॉफी, दारू यांसारखे पेय वर्ज्य करावेत.
ऊ. सांध्यांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा संपूर्ण शरिराला मालीश करावे. मालीश शक्य नसल्यास सांध्यांना रात्री झोपतांना नियमित तेल लावावे.
ए. केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी आवळा तेलाने केसांच्या मुळाशी मालीश करावे. आठवड्यातून किमान २ वेळा तरी केसांना तेल लावायला हवे.
ऐ. मानसिक अस्वस्थता, छोट्या छोट्या गोष्टींचे दडपण येणे यांवर नियमित व्यायाम आणि प्राणायाम उपयोगी ठरतो. व्यायामामुळे शरिरामधील ‘एन्डॉर्फिन’ नावाचे संप्रेरक उत्तेजित होतात की, जे मनाला उत्साह आणि आनंद देतात अन् मनाला आलेली निराशा दूर करतात. तेव्हा स्त्रियांनी स्वतःच्या शरिरासाठी, म्हणजेच व्यायामासाठी दिवसातून किमान ३० मिनिटे वेळ दिलाच पाहिजे.
ओ. शतावरी आणि अश्वगंधा यांसारखी औषधे रजोनिवृत्तीच्या काळात अत्यंत उपयोगी ठरतात; परंतु अशी औषधे घेतांना वैद्यांचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१०.११.२०२३)