लहानपणापासून साजर्या केलेल्या सण-उत्सवांच्या वेळी अनुभवलेल्या मनाच्या अवस्थांसाठीच्या ‘आध्यात्मिक पारिभाषिक संज्ञां’चा अर्थ शिकवून साधिकेच्या मनात भगवंताच्या भेटीची ओढ निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘चातुर्मास म्हटला की, व्रत-वैकल्ये, उत्सव, सण-वार, यांना अगदी उधाण आलेले असते. ‘नुकत्याच झालेल्या मंगळागौरीच्या पूजेची आरास, मखरात बसलेले गणराया आणि पाठोपाठ आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौराई’, यांच्याविषयी आमचे बोलणे चालू होते. त्या वेळी झालेले चिंतन आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रकर्षाने जाणवलेली महती पुढे दिली आहे.
आई-वडिलांच्या पुण्याईने बालपणापासून मला सण, उत्सव आणि व्रते या सार्या गोष्टी पहायला अन् जवळून अनुभवायला मिळाल्या. बालवयात ते सगळे बघण्यात, अनुभवण्यात आणि खाण्या-पिण्यातच आनंद असायचा. पुढे वाढत्या वयाच्या समवेत मला त्यातील अनेक बारीकसारीक गोष्टी समजू लागल्या आणि माझा त्या उत्सवांच्या सिद्धतेतील सहभाग वाढत गेला.
१. ‘लहानपणी आईने केलेली शिवाची पूजा पाहून छान वाटणे म्हणजे काय ?’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवणे
आईने शिवाला वाहिलेला बेल, तिने केलेली पूजा आणि देवाजवळ शांतपणे तेवणारे निरांजन माझे मन आकर्षून घ्यायचे. ती पूजा पहात असतांना मला पुष्कळ छान वाटायचे. माझ्या मनाची वेगळीच अवस्था असायची. ‘काय असायचे ?’, ते मला कळत नसे; पण पुष्कळ छान वाटायचे. ‘हे ‘छान वाटणे’, म्हणजे काय ?’, याचा माझ्याकडून कधी विचार झाला नाही. तो करायला शिकवला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी !
२. ‘हरितालिका आणि गणेशोत्सव या काळातील देवाचे स्मरण’, म्हणजेच भगवंताचे अनुसंधान असल्याचे शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
हरितालिकेची पूजा आमच्या आळीतल्या सगळ्या स्त्रिया आणि मुली मिळून करायच्या. मी मैत्रिणींच्या समवेत आदल्या दिवसापासून पत्री आणि फुले वेचायला जायचे. पूजा, दिवसभराचा उपवास आणि रात्री जागरण यांचा, तसेच एकत्रितपणातही आनंद असायचा. नंतर श्री गणेश आणि त्यांच्या पाठोपाठ ज्येष्ठा-कनिष्ठा गौराई ! त्यांच्या आगमनाची तर भारीच सिद्धता असायची. सजावट, आरत्या आणि जयघोष यांची मज्जा असायची. ‘गणपतिबाप्पा खरेच आपल्या घरी आला आहे’, असे मला वाटायचे. शाळा, अभ्यास इत्यादी सगळे चालू असले, तरी माझे मन मात्र गणपतिबाप्पातच गुंतलेले असायचे. मित्र-मैत्रिणींच्या समवेत गप्पाही त्याच असायच्या. अशा प्रकारे गणपतिबाप्पाचेच स्मरण होत रहायचे. ‘कदाचित् हेच अनुसंधान आहे’, हे मात्र तेव्हा मला कळत नव्हते. ‘भगवंताचे अनुसंधान’ म्हणजे काय ?’, ते शिकवले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी !
३. गौरींच्या मुखवट्यांकडे पाहून त्यांच्या आगमनाच्या सिद्धतेच्या वेळी आलेला थकवा नाहीसा होण्यामागील कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी लक्षात आणून देणे
आमच्याकडे उभ्या गौरी (महालक्ष्मी) असायच्या. गौरींचे आगमन, पूजन, आरती या सगळ्यांत माझे मन दंग असायचे. मग माझ्याकडून पुनःपुन्हा त्या गौरींना न्याहाळणे व्हायचे. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटायचे. त्यांचे प्रसन्न दिसणारे मुखवटे पाहिले की, त्यांच्या सिद्धतेसाठी केलेले सारे श्रम आणि थकवा कुठच्या कुठे नाहीसा व्हायचा. त्यांना पहातांना मला आनंद व्हायचा. माझे मन त्यांच्या भोवतीच पिंगा घालत असायचे. ‘हा थकवा का आणि कशामुळे नाहीसा होतो ? मन त्यांच्यातच गुंतून रहाते, म्हणजे काय होते ?’, हे लक्षात आणून दिले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी !
४. ‘नवरात्रीच्या कालावधीत ‘देवी समवेत आहे’, असे वाटून डोळ्यांतून अश्रू येणे’, म्हणजे ‘भाव जागृत होणे’, हे गुरुदेवांच्या कृपेने लक्षात येणे
पुढे नवरात्रीचे वेध लागायचे. प्रतिदिन देवीसाठी फुले आणि हार आणले जायचे. ‘देवीपुढे अखंड दीप लावणे, देवीची अष्टके आणि आरत्या म्हणणे’, यांमुळे माझे मन त्या जगदंबेच्या ठायी रंगून जायचे. अश्रूपात व्हायचा. कुणी मला विचारायचे, ‘‘एवढा आनंदाचा नवरात्रोत्सव आणि अशी रडतेस का ?’’ तेव्हा मला काहीच कळत नसे. वेदीवर मांडलेली पूजा पहातांना ‘आई जगदंबा घरात आली आहे. ती आपल्या समवेत आहे’, असे मला जाणवायचे. माझ्या अंगावर रोमांच यायचे. ‘तिला पहातच रहावे’, असे मला वाटायचे. त्यातला आनंद भरभरून घ्यावासा वाटायचा. ‘यालाच ‘देवाचे अस्तित्व जाणवणे’, ‘भाव जागृत होणे’, असे म्हणतात’, हे मात्र मला ठाऊकच नव्हते. ते सांगितले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी !
५. ‘भाव जागृत झाल्यावर डोळ्यांतून येणारे अश्रू हे थंड आणि भावनेपोटी येणारे अश्रू गरम असतात’, हा भेद कळला, तो केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळेच ! नाहीतर हा भेद कधी लक्षातच आला नसता.
६. गुरुदेवांनी आध्यात्मिक संज्ञांचे ज्ञान देण्याच्या समवेतच अंतःकरणातील साधनेचे बीज फुलवून त्याला खत-पाणी घालणे
हे सारे शब्द आणि मनाच्या या अवस्थांसाठी असणार्या ‘आध्यात्मिक पारिभाषिक संज्ञा’ सनातन संस्थेत येऊन साधना करायला लागल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच मला कळायला लागल्या. या आध्यात्मिक संज्ञांचे ज्ञान देण्याच्या समवेतच त्यांनी अंतःकरणातील साधनेचे बीज फुलवले आणि त्याला खत-पाणी घातले. त्यांच्यामुळेच त्याला अंकुर फुटले.
७. ‘भगवंतासाठी वेडे होणे आणि त्याच्या अनुसंधानात रहाणे’, यांतील परमोच्च आनंद घेण्यास शिकवणार्या गुरुदेवांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
केवळ त्यामुळेच आज भगवंताच्या सूक्ष्म अस्तित्वाच्या जाणिवेने डोळ्यांतून येणार्या थंडगार अश्रूंचा अनुभव मला घेता येत आहे. माझ्या मनातील भगवंताच्या भेटीची ओढ वाढत आहे. ‘त्याच्यासाठी वेडे होण्यातला आनंद काय असतो ?’, हे मला अनुभवायला मिळत आहे. भगवंताच्या अनुसंधानात रहाण्यातला परमोच्च आनंद मला घेता येत आहे. जीवनात आणखी काय हवे ?
‘या सगळ्या गोष्टींचे श्रेय केवळ आणि केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनाच आहे’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अत्यल्पच आहे.’
– श्रीमती अलका वाघमारे (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |