अमेरिकेत वार्षिक ३ कोटी वेतन असतांनाही डॉक्टरांची कमतरता
ब्रिटनमध्ये डॉक्टर सोडत आहेत नोकरी !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये डॉक्टरांचा तुटवडा भासू लागला आहे. येथे डॉक्टरांना सरासरी वार्षिक वेतन ३ कोटी रुपये असतांनाही ही स्थिती आहे. अमेरिका आरोग्यावर सर्वाधिक खर्च करत असतांना ही स्थिती आहे. अमेरिकेत लोकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडले असल्याने तेथे मानसोपचारतज्ञांचीही मागणी वाढली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये अल्प वेतन, तसेच कामाच्या ताणामुळे अनेक डॉक्टर नोकरी सोडून कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया येथे काम शोधत आहेत.
१. ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन मेडिकल कॉलेज’नुसार, पुढील एक दशकात अमेरिकेत सुमारे १ लाख २४ सहस्र डॉक्टरांची कमतरता भासणार आहे. येथे प्रतिवर्षी केवळ ८५ सहस्र विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात. अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणाला ८ वर्षे लागतात. पैकी ४ वर्षे पदवी आणि ४ वर्षे मेडिसिनचे. इतर देशांत हे शिक्षण ५-६ वर्षांत पूर्ण होते. दीर्घकाळ लागत असल्याने अनेक विद्यार्थी मध्येच शिक्षण सोडतात.
२. अशासकीय संस्था ‘पीटर्सन-केएफ्एफ्’च्या अहवालानुसार, कोरोना महामारीनंतर ३० टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचारी आरोग्य क्षेत्र सोडून जात आहेत.
३. ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षा आणि फिजिशियन जेसी ऐहरेनफेल्ड यांनी सांगितले की, बहुतांश डॉक्टर त्यांच्या मुलांना डॉक्टर करू इच्छित नाहीत. आता या व्यवसायात समाधान नाही.
संपादकीय भूमिकाडॉक्टरांचे काम अधिक दायित्वाचे असते आणि ते परिणामकारक पार पाडावे लागते. तशी मानसिकता ठेवावी लागते. पाश्चात्त्यांमध्ये हा भाग अल्प होऊ लागल्यामुळे असे घडत आहे का ? याचा शोध घेतला पाहिजे ! |