राष्ट्र उभारणीसाठी अश्वमेध महायज्ञाचे आयोजन ! – डॉ. चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवार प्रतिनिधी
२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत ४८ वा अश्वमेध महायज्ञ होणार
नवी मुंबई, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – राष्ट्र उभारणीसाठी अश्वमेध महायज्ञाचे खारघर येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल विश्व गायत्री परिवाराचे प्रतिनिधी डॉ. चिन्मय पंड्या यांनी सानपाडा येथे पत्रकार परिषदेत दिली. खारघर येथे २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम नुकताच राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल पार्क मैदान, खारघर येथे पार पडला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज, हरिद्वार या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी डॉ. चिन्मय पंड्या यांनी अश्वमेध महायज्ञ म्हणजे काय ? आणि याचे महत्त्व काय आहे ? याची माहिती देऊन सर्वांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या अश्वमेध यज्ञासाठी पूर्व व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने खारघर येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे भेट दिली. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन सुरक्षेविषयी चर्चा केली.
महायज्ञात सहभागी होणार्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने यज्ञस्थळालगतच्या परिसराची पहाणी करण्यात आली. कायदा-सुव्यवस्था नियंत्रण केंद्राच्या कार्यालयाचे उद़्घाटनही करण्यात आले आहे, असे डॉ. पंड्या यांनी या वेळी सांगितले. सानपाडा येथील ‘गायत्री चेतना केंद्रा’त अश्वमेधच्या संबंधित संघांसमवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.