सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल (जिल्हा रायगड) येथील चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी (वय ३ वर्षे) !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कार्तिक शुक्ल प्रतिपदा (१४.११.२०२३) या दिवशी चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी हिचा तिसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर तिच्या आईला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !
चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी हिला तिसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपण
१ अ. गर्भारपणाच्या कालावधीत सनातनच्या ग्रंथांचे वाचन करणे : ‘मी गर्भारपणाच्या पूर्ण कालावधीत सनातनचे ‘गर्भधारणेची सिद्धता आणि गर्भवतीने घ्यायची काळजी’ अन् ‘गरोदरपणातील समस्यांवर उपाय’, हे ग्रंथ पुष्कळ वेळा वाचले. त्यांत सांगितल्याप्रमाणे शक्य तेवढे सर्व प्रयत्न मी नियमितपणे करत होते. सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांच्याविषयीचे ‘पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख’ आणि ‘पू. भार्गवराम यांना ‘संत’ म्हणून घोषित करण्याचा आनंददायी सोहळा’ हे ग्रंथ अन् सनातनचे दुसरे बाल संत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्याविषयीचे ‘पू. वामन गर्भात असल्यापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख’ आणि ‘पू. वामन यांचा नामकरण विधी अन् त्यांना संत घोषित केल्याचा सोहळा’ हे ग्रंथही मी पुनःपुन्हा वाचले.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव आणि गुरुपौर्णिमा हे कार्यक्रम ‘ऑनलाईन’ पहातांना पोटातील बाळ शांत असायचे. इतर वेळी बाळाची हालचाल जाणवायची.
१ इ. गर्भधारणा झाल्याचे कळण्यापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची तीव्रतेने आठवण येऊन त्यांचे अस्तित्व सूक्ष्मातून अनुभवता येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना मी प्रत्यक्ष कधी पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांना सूक्ष्मातून अनुभवायला मी न्यून पडायचे; पण ‘गर्भधारणा झाली’, हे कळण्यापूर्वी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची तीव्रतेने आठवण यायची. मला त्यांचे अस्तित्व सूक्ष्मातून अनुभवता येत होते.
२. जन्म ते ३ मास
२ अ. चि. नंदिनी प्रत्येक गुरुवारी होणारा भक्तीसत्संग चालू असतांना नेहमी जागी असायची.
२ आ. देवाची आवड : तिला रामरक्षास्तोत्र, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, देवीकवच, मानसपूजा आणि भक्तीगीते ऐकायला आवडत असत. हे सर्व ऐकतांना ती आनंदाने हुंकार देत असे.
२ इ. तिच्या पाळण्यात अनेकदा सूर्यकिरण येत असत. एकदा मावळतीचे सूर्यकिरण थेट तिच्या चेहर्यावर पडत होते. तेव्हा मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवळातील किरणोत्सवाची आठवण झाली.
२ ई. अनेकदा तिच्या अंगावर दैवी कण आढळतात.
२ उ. चि. नंदिनीविषयी संतांनी काढलेले उद़्गार ! : मी तिची बारशाच्या दिवशी काढलेली छायाचित्रे सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना पाठवली. ती छायाचित्रे पाहून त्या म्हणाल्या, ‘‘नंदिनी प्रगल्भ आणि ज्ञानी वाटते.’’
३. वय ७ ते ९ मास : तिच्या बोटांची सतत ज्ञानमुद्रा (अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना जोडणे) असायची.
४. वय १० ते १२ मास
४ अ. समजूतदार : मी सेवा करत असतांना तिला शांत रहावे लागत असे किंवा एकटे खेळावे लागत असे. तेव्हा ती माझ्या सेवांमध्ये व्यत्यय येऊ न देता शांत राहून एकटी खेळत असे.
५. वय १ ते ३ वर्षे
५ अ. नीटनेटकेपणा : ती घेतलेली वस्तू जागेवरच ठेवते. ती हात अन्यत्र कुठे न पुसता रुमालालाच पुसते.
५ आ. तिला कोणतीही गोष्ट प्रेमाने समजावून सांगितल्यावर ती लगेच ऐकते.
५ इ. इतरांशी स्वतःहून बोलणे : नंदिनी साधक, नातेवाईक आणि परिचित यांच्याशी स्वतःहून बोलते. त्यामुळे समोरची व्यक्ती अबोल असली, तरी तिच्याशी मोकळेपणाने बोलते. तिच्या वयाच्या मुलांशीही ती स्वतःहून संवाद साधून त्यांना समजून घेते. ती त्यांच्याकडील वस्तूंचे कौतुक करते.
५ ई. वर्तमानात रहाणे : देवद येथील आश्रमात असतांना ती आनंदी असते. नंतर ती घरी आल्यावर आश्रमातील आठवणी काढून रडत नाही किंवा हट्ट करत नाही. घरी आल्यावर ती घरच्या वातावरणाशी समरस होऊन जाते.
५ उ. सात्त्विकतेची ओढ
१. ती लहानपणापासून सर्व देवता ओळखते.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’, सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांविषयी तिला विशेष ओढ आहे.
३. ‘सत्संग घेणे, देवाची आरती आणि मानसपूजा करणे, तसेच आश्रमात जाणे’, असे तिचे खेळ असतात.
४. दुचाकीवरून प्रवास करतांना ती श्रीकृष्णाचा जयघोष करून श्लोक म्हणते आणि अखंड नामजप करते.
५ ऊ. सेवेची आवड : माझ्या सेवेच्या ठिकाणी आल्यावर ती ‘प्रिंटर’मधून प्रिंट होऊन येणारा कागद त्या त्या साधकांना नेऊन देते. ती साधकांना हलक्या वस्तू, कागद, ग्रंथ आणि सोपे निरोप देण्याची सेवा करते, तसेच खाऊचे वाटपही करते.
ती दीड वर्षाची असतांना एकदा आम्ही आश्रमातून घरी जायला निघाल्यावर सर्वांचा निरोप घेत होतो. तेवढ्यात ती धावत गेली आणि म्हणाली, ‘‘आलेच, कागद आला !’’ त्या वेळी तिला प्रिंटरमधून कागद प्रिंट होऊन बाहेर पडण्याचा आवाज आला आणि तो द्यायला ती धावत गेली.
५ ए. चुकांविषयीची संवेदनशीलता
१. नंदिनीकडून चूक झाल्यास तिला त्याची जाणीव होते. इतरांनी तिची चूक सांगितली, तर ती लगेच स्वीकारते आणि स्वतःचे कान धरून ‘चूक झाली. क्षमा करा’, असे म्हणते.
२. तिच्याकडून गंभीर चुका झाल्यास ती देवासमोर उभी रहाते आणि स्वतःचे कान धरून उठाबशा काढून देवाची क्षमा मागते.
३. आश्रमात साधक फलकावर चुका लिहितात. ते पाहून ती तिच्या परीने फलकावर चूक लिहिते आणि ‘कोणती चूक लिहिली ?’, हे सांगते.
४. घरी असतांना चूक झाल्यावर ती घरातील फलकावर चूक लिहिते. ते तिला शिकवावे लागले नाही.
५. तिला लक्षात आलेल्या इतरांच्या चुका ती अतिशय प्रेमाने सांगते.
६. बालसाधक आश्रमात मोठ्याने बोलल्याविषयी झालेल्या चुकीसाठी ती स्वतःहून जाऊन फलकाजवळ स्वतःचे कान धरून उभी होती. तिला पाहून सर्व साधक ‘काय झाले ?’, असे विचारत होते. तेव्हा ती ‘चूक झाली’, असे प्रत्येकाला सांगत होती.
७. एकदा सर्वांच्या समवेत अल्पाहार करतांना अकस्मात् उठून ती फलकाजवळ गेली आणि स्वतःचे कान धरून उभी होती. ‘तिला बोलता बोलता कुणीतरी चुकीची जाणीव करून दिली होती’, हे नंतर मला समजले. त्याही वेळी तिने स्वतःची चूक स्वीकारली आणि खंत वाटून शिक्षा घेतली.
५ ऐ. नेतृत्वगुण : नंदिनीची समष्टी प्रकृती आहे. इतरांना आपल्या समवेत सेवा आणि खेळ यांमध्ये सहभागी करून त्यांचे साहाय्य घेणे तिला जमते.
५ ओ. सतत अंतर्मुख आणि ईश्वराच्या अनुसंधानात असणे : बाहेरगावी गेल्यावर तिच्या हाताच्या बोटांची अखंड मुद्रा असते. वाहनात शक्यतो ती झोपी जाते; पण उर्वरित वेळेत ‘ती अनुसंधानात आहे’, असे मला जाणवते. ‘तिचा चेहरा गंभीर आहे; परंतु ‘ती अंतर्मुख असून ईश्वरी अनुसंधानात आहे’, असे मला वाटते.
५ औ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : नंदिनी २ वर्षांची असतांना ‘प्रतिदिन कोणता नामजप करायचा ?’, हे ती मला सांगायची. ‘तिने स्वतःसाठी कोणता नामजप करायला हवा ?’, तेही ती सांगायची. एकदा तिला दोन दिवस शौचाला झाले नव्हते. मी तिला म्हणाले, ‘‘दत्तजयंती जवळ आली आहे. त्यामुळे आपण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करूया.’’ तेव्हा तिने नकार देऊन ‘ॐ’ हा नामजप करूया’, असे मला सांगितले. त्यानंतर आश्रमात पोचल्यावर सद़्गुरु राजेंद्र शिंदे आम्हाला भेटले. त्यांच्याशी बोलतांना सहज हा प्रसंग मी त्यांना सांगितला. तेव्हा ते लगेच म्हणाले, ‘‘मी तिच्यासाठी नामजप शोधून देतो.’’ त्यानंतर त्यांनी नंदिनीला शाबासकी दिली. ‘तिने सांगितलेला जप अचूक आहे’, असे सद़्गुरु राजेंद्र शिंदे म्हणाले. ‘ॐ’चा नामजप केल्यावर दुसर्या दिवशी तिची शौचाची अडचण दूर झाली.
५ अं. एकदा सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७४ वर्षे) नंदिनीच्या संदर्भात म्हणाले, ‘‘या दैवी बालकांमध्ये सर्वांना आकर्षून घेण्याची क्षमता अधिक असते. एवढ्या सगळ्या साधकांमध्ये त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष जाते.’’
५ क. संतांप्रतीचा भाव : सद़्गुरु राजेंद्रदादा आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याप्रती तिच्या मनात भाव आहे. आश्रमात आल्यावर ती सद़्गुरु राजेंद्रदादांना शोधते. त्यांच्या दर्शनाने तिला अपार आनंद होतो. त्यांना केवळ पाहूनच ती पुढे बराच वेळ आनंदात असते. पू. अश्विनीताई भेटल्यावरही नंदिनीला आनंद होतो. ती त्यांना अतिशय प्रेमाने आणि आपलेपणाने साद घालते. ती त्यांच्याशी तिच्या भाषेत बोलते. तिला त्यांना पुष्कळ काही सांगायचे असते.
५ ख. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून तिला आनंद होतो.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना ती कितीतरी वेळ त्यात रमून जाते. ती गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असतांना भावविश्वात असल्याचे जाणवते.
३. एकदा रात्री तिला झोप लागणार, तेवढ्यात ती उठली. तिने स्वतःभोवतालचे वाईट शक्तीचे आवरण काढले. त्यानंतर ती उशाशी ठेवलेल्या गुरुदेवांच्या छायाचित्राशी भावपूर्ण बोलत होती. नंतर ती झोपली.
६. नंदिनीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
६ अ. ‘नंदिनीच्या रूपात गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे जाणवणे : नंदिनीचे वागणे आध्यात्मिक स्तरावरील असते. माझ्या साधनेसाठी ते आवश्यक असते. तिच्यामुळे माझ्या साधनेला नवीन दिशा मिळाली. ‘तिच्या रूपात गुरुदेव अखंड समवेत आहेत’, असे मला जाणवते.
६ आ. नंदिनीमुळे साधनेचे प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळणे : ती समवेत असतांना माझ्यातील ‘अंतर्मुखता, अनुसंधान आणि सतर्कता’, या ईश्वरी गुणांची जोपासना होते आणि साधनेचे न्यून पडल्यावर माझ्यात गांभीर्य निर्माण होऊन मला प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्याची प्रेरणा मिळते.
७. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. पूर्वा श्रीराम कुलकर्णी (चि. नंदिनीची आई), पनवेल (२९.१०.२०२३)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |