कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांची सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) आणि त्यांच्या पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) यांच्याकडे औषधोपचारांसाठी सनातनचे संत आणि साधक त्यांच्या रुग्णालयात जात होते. काही काळानंतर ते स्वतःच सनातनच्या साधकांवर औषधोपचारांसाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येतात. त्यांची सनातनचे संत आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेलीसूत्रे येथे दिली आहेत.
(भाग १)
‘एप्रिल २०२० पासून मला पाठीच्या मणक्याचा त्रास चालू झाला. एप्रिल २०२१ पासून गुरुकृपेने मला कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्हाण यांच्याकडे उपचार करून घेण्याची संधी मिळाली.
१. पाठीच्या मणक्यांचा त्रास होणे आणि बरेच उपचार करूनही आजार पूर्ण बरा न होणे
मणक्याचा त्रास चालू झाल्यावर आरंभी मला ५ मिनिटेसुद्धा बसणे, चालणे किंवा बसून सेवा करणे शक्य होत नव्हते. या व्याधीसाठी मी दीड वर्ष अॅलोपॅथी, होमिओपॅथी, न्यूरोथेरपी (मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी केलेले उपचार) इत्यादी उपचार घेतले. त्यामुळे मला थोडे बसणे आणि चालणे शक्य होऊ लागले; मात्र सहजपणे हालचाल आणि कृती करणे शक्य होत नव्हते.
२. रुग्णाचे स्वतंत्रपणे निदान करून उपचार करणे
वैद्य संदेश चव्हाण यांच्याकडे उपचारांसाठी गेल्यावर त्यांनी मला शारीरिक त्रासांविषयी माहिती विचारून माझे उदरपरीक्षण केले. त्यांनी त्यांच्या चिकित्सा पद्धतीनुसार अनुमाने २ मासांत एकूण ७ वेळा (सिटींग्ज) माझ्यावर उपचार केल्यावर मला बरे वाटले. त्यानंतर त्यांनी मला प्रत्येक मासात तपासणीसाठी बोलावले. उपचार पूर्ण झाल्यावर त्यांनी माझ्याकडील पूर्वी केलेल्या चाचण्यांचे अहवाल पाहिले आणि मला म्हणाले, ‘‘तुम्हाला ‘स्पायनल कॅनल स्टीनोसीस’चा (यामध्ये मणक्यांच्या पोकळीतील जागा खूप अरुंद होते.) गंभीर आजार होता. यामुळे तुमच्या दोन्ही पायांतील शक्ती जाऊन ते निकामी झाले असते. मी आरंभी अहवाल पाहिले असते, तर मला माझ्या पद्धतीने योग्य उपचार करता आले नसते.’’ हे ऐकून मला आश्चर्य वाटले.
३. रुग्णामध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करणे
मी उपचारांसाठी वैद्य चव्हाण यांच्याकडे गेलो. तेव्हा माझे वय ७४ वर्षे होते. माझ्या वयोमानानुसार माझ्यावर उपचार करतांना स्नायू आणि हाडे यांवर दाब देतांना किंवा मर्दन करतांना मर्यादा येतात. माझे वय कळल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुमचे वय ७४ वर्षे आहे’, असे वाटत नाही, तर ५२ वर्षे आहे’, असे वाटते.’’ मी त्यांना सांगितले, ‘मी २५ वर्षे नियमित पोहायला जात होतो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता मला तुमचे वय ३२ वर्षे आहे’, असे वाटते. तुमच्यावर उपचार केल्यावर तुम्ही लवकर बरे व्हाल !’’ त्यांच्या बोलण्यामुळे मी सकारात्मक झालो आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी माझ्यावर आवश्यक तेवढे आणि आवश्यक त्या कालावधीसाठी औषधोपचार केले अन् मी बरा झालो.
४. सहजता आणि उत्साही असणे
वैद्य चव्हाण रुग्णावर स्नायू, सांधे आणि हाडे यांवर स्वतः मर्दन अन् दाब देणे (बोन क्रॅकिंग, पंचकर्म) असे अनुमाने एक घंटा उपचार करतात. त्यासाठी त्यांना पुष्कळ शारीरिक कष्ट घ्यावे लागतात, तरीही ते कधी थकलेले दिसत नाहीत. उलट ते हसतखेळत राहून रुग्णाला प्रोत्साहन देतात. ‘त्यांच्यातील शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळावर ते सर्व उपचार सहजपणे करतात’, असे मला वाटते.
५. रुग्णाला स्वावलंबी बनवणे
वैद्य चव्हाण रुग्णांवर ते करत असलेल्या उपचारांच्या पद्धती, औषधे, चालणे, बसणे, जागेवरून उठणे इत्यादींमागील शास्त्र रुग्णाला समजावून सांगतात. ते विशिष्ट व्याधींसाठी विशिष्ट व्यायामप्रकारही करण्यास सांगतात. मी त्यांनी सांगितलेली औषधे, व्यायाम आणि पथ्य मन लावून करू शकलो अन् त्यामुळे स्वावलंबी झालो. सध्या मी त्यांनी सांगितलेले व्यायामप्रकार, बसणे-चालणे यांची योग्य पद्धत (पोश्चर, पवित्रा किंवा ढब) आणि पथ्य आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझी शारीरिक स्थिती चांगली टिकून राहिली आहे.
६. स्वतः शिकणे आणि शिकलेले वैद्यकीय ज्ञान इतरांना देणे
वैद्य चव्हाण सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. प्रत्यक्षात ते आयुर्वेद शाखेतील उच्च पदवीधर आहेत; परंतु रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती, त्रास, लक्षणे आणि नवीन उपचारपद्धत यांविषयी ते सतत अभ्यास करतात. आयुर्वेदासमवेत अन्य चिकित्सापद्धतींचा अभ्यास करून ‘त्यांचा रुग्णांना कसा लाभ होईल ?’, याविषयी ते जागरूक असतात. नवीन उपचारपद्धत शिकण्यासाठी ते अधूनमधून बाहेरगावी शिबिरांनाही जातात. ते त्यांच्या चिकित्सालयात अन्य वैद्यांसाठीही शिबिरांचे आयोजनही करतात.
७. साधकत्व, प्रेमभाव आणि भाव
वैद्य चव्हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांच्याकडे समाजातील विविध स्तरांतून रुग्ण येतात. ते दोघे रुग्णांकडे औपचारिकता आणि व्यावहारिक दृष्टीने न पहाता ‘रुग्ण व्याधीमुक्त कसा होईल ?’, यासाठी आत्मीयतेने औषधोपचार करतात. त्यांच्यात एखाद्या चांगल्या साधकाप्रमाणे ‘नम्रता, इतरांना समजून घेणे, अपेक्षा न करणे, न चिडता रुग्णांना पुनःपुन्हा समजावून सांगणे, रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण यांच्याशी आपुलकीने वागणे, परेच्छा अन् ईश्वरेच्छा यांनुसार वागणे, इत्यादी गुण आहेत’, असे मला वाटते.
देवद (पनवेल) येथील आश्रमातील साधकांनी औषधोपचारासाठी त्यांच्या मुंबई येथील चिकित्सालयात जाण्याऐवजी ते प्रत्येक मासाला (महिन्याला) आश्रमात येतात. सनातन संस्थेचे साधक आणि संत यांच्याप्रती त्यांच्या मनात पुष्कळ आदरभाव आहे.
वैद्य संदेश चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांमुळे मी पाठीच्या दुखण्यातून बाहेर आलो आहे. त्यामुळे मला आता संगणकीय आणि इतर सेवाही करता येत आहेत. त्यांच्यामुळे सनातनच्या माझ्यासारख्या बर्याच साधकांना साधना आणि समष्टी सेवा करण्यास साहाय्य होत आहे. यासाठी मी वैद्य संदेश चव्हाण यांचा ऋणी आहे. ‘त्यांची व्यावहारिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होवो’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’
वैद्य संदेश चव्हाण यांचा परिचयवैद्य संदेश चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) यांच्या ‘रसशिवम् आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर’मध्ये रुग्णांच्या विविध विकारांवर आणि मुख्यत्वे पाठीच्या मणक्याच्या व्याधींवर उपचार केले जातात. ते पंचभौतिक चिकित्सा करतात. त्यांना आयुर्वेदाच्या विविध उपचारपद्धती, उदा. वर्म चिकित्सा, कायरोथेरपी (सांध्यांच्या विशिष्ट पद्धतीने हालचाली करणे, तसेच त्यांना झटका देणे इत्यादी पद्धतीने उपचार करणे), न्यूरोथेरपी इत्यादी अशा १६ प्रकारच्या उपचारपद्धती अवगत आहेत. त्यांच्या सुविज्ञ पत्नी वैद्या (सौ.) गायत्री संदेश चव्हाण (बी.ए.एम्.एस्., एम्.डी (आयु.)) या गर्भसंस्कार, तसेच पंचकर्म चिकित्सातज्ञ असून त्वचाविकार आणि केसविकार यांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्या विविध प्रकारची आयुर्वेदाची औषधे आणि तेले स्वतः बनवतात. |
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/737741.html