पहा निसर्ग आनंदी किती ।
‘२७.८.२०२३ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका आगाशीत बसले होते. अकस्मात् माझे लक्ष तेथील सुंदर हिरवीगार झाडे आणि आकाश यांकडे गेले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ज्या खोलीत निवास करतात, त्या खोलीसमोरील झाडे, पाने, ढग हे गुरुदेवांना पहाण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुदेवांना पहाण्यासाठी ते किती व्याकुळ झाले आहेत ?’, असे मला वाटले. त्या वेळी मला पुढील कविता सुचली.
हिरवीगार पहा पाने ती । देवाच्या खोली समोरील ॥
वाकुनी पहाती नित्य तयांसी (टीप) ।
मलाही वाटे पहावे तयांसी (टीप) ॥ १ ॥
मऊ मऊ लुसलुसशीत ढग पहा ते । हळुवार अगदी जाती पुढे ॥
खाली वाकून शोधती त्यांना ।
म्हणती जगन्मोहन कुठे दिसेना ॥ २ ॥
मग वर्षाव जलाचा करिती । भावाश्रूंसम अर्पण होती ॥
मग दिसेल नारायण तो । खोली मधूनी तुम्हासी ॥ ३॥
निसर्ग इतका व्याकुळ होई । पहाण्या खोलीतील भगवंतासी ॥
व्याकुळता अशी माझ्यात केव्हा येईल ।
विचारते मी गुरुदेवांसी ॥ ४ ॥
गुरुदेव मला सांगती । पहा निसर्ग आनंदी किती ॥
ईश्वरेच्छेने सारे करिती । इतरांना आनंद देती ॥ ५ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मी निसर्ग आणि गुरुदेव यांच्याशी असा संवाद साधत होते. तेव्हा ‘गुरुदेवांना निसर्ग एवढा प्रिय का आहे ?’ याचे उत्तर मला मिळाले. ‘निसर्ग प्रत्येक वेळी ईश्वरेच्छेने वागतो आणि इतरांना आनंदच देतो. ईश्वराच्या इच्छेविना निसर्गातील एक पानही हलत नाही !’, असे गुरुदेवा आपणच मला सांगितले. मला हे निर्सगाकडून शिकता आले. हे जगन्मोहना, खरेतर आपल्यामध्येच सर्व सुंदरता आहे. निसर्गाकडून ही सूत्रे आपणच मला शिकवलीत, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
-परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२७.८.२०२३)