कोल्‍हेवाडी (अहिल्‍यानगर) येथील ‘महावितरण’च्‍या कार्यालयास संतप्‍त महिलांनी टाळे ठोकले !

वीजपुरवठा खंडित झाल्‍याने ४ मास पाणीपुरवठा बंद

अहिल्‍यानगर – जामखेड तालुक्‍यातील साकत ग्रामपंचायती अंतर्गत कोल्‍हेवाडी येथील वीजेच्‍या तारा तुटल्‍याने ४ मासांपूर्वी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्‍यावर कोणतीही कार्यवाही न झाल्‍याने ४ मासांपासून गावातील पाणीपुरवठाही बंद होता. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या महिलांनी गावातील ‘महावितरण’च्‍या कार्यालयाला घेराव घालत टाळे (कुलूप) ठोकले. ‘जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टाळे उघडणार नाही’, या भूमिकेवर महिला ठाम राहिल्‍या. महिलांचा संताप पाहून ‘महावितरण’ खडबडून जागे झाले आणि संबंधित ठेकेदारास त्‍वरित वीज जोडण्‍याचे आदेश दिले. (केवळ वीजतारांची जोडणी अभावी नागरिकांना ४ मास पाण्‍यापासून वंचित रहावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्‍जास्‍पद ! या घटनेसाठी उत्तरदायी असणार्‍या कामचुकार अधिकार्‍यांच्‍या तोंडचे पाणी पळून जाईल अशी कठोर कारवाई व्‍हायला हवी ! – संपादक )

संपादकीय भूमिका :

जनतेला ४ मास पाणी न पुरवणारे असंवेदनशील प्रशासन काय कामाचे ?