सातारा येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत चार भिंती परिसरातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी !
सातारा, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक चार भिंती परिसरातील वनसंपदा १२ नोव्हेंबरच्या रात्री फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
दीपावलीच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी युवा वर्ग चार भिंती परिसरात आणि यवतेश्वरच्या घाटात जातो. १२ नोव्हेंबरच्या रात्री चार भिंती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्गाने गर्दी केली होती. या ठिकाणी काही हुल्लडबाज युवकांकडून मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येत होते. सातारा पोलिसांनी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची समयमर्यादा घालून दिली होती; मात्र तरीही रात्री १० नंतर चार भिंती परिसरामध्ये हुल्लडबाज युवकांकडून फटाके फोडण्यात येत होते. या फोडलेल्या फटाक्यांची ठिणगी पडून या परिसरातील डोंगरातील सुकलेल्या झाडांनी पेट घेतला. काही क्षणातच ही आग इतरत्र पसरली. त्यामुळे गवता समवेत इतर छोटी-मोठी झाडेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रसंगावधान राखत काही युवकांनी पुढाकार घेऊन ही आग आटोक्यात आणली.
पोलिसांनी हुल्लडबाज युवकांवर अंकुश ठेवावा !
अजिंक्यतारा, चार भिंती आणि यवतेश्वर घाट परिसरात रात्रीच्या वेळी युवकांचा वावर असतो. अनेक जण व्यसन करण्यासाठी येतात. अशा व्यसनी युवकांवर सातारा पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सूज्ञ नागरिक करत आहेत.