पती-पत्नीमधील नात्याचा पाडवा !
Diwali Deepawali diwali 2023 deepawali 2023 Padava
पाडव्याला पतीला ओवाळतात. ‘पतीला औक्षण केल्यावर पत्नीमध्ये दुर्गातत्त्व जागृत होते आणि पतीतील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व जागृत होते’, असे शास्त्र सांगणार्या हिंदु धर्माची अत्युच्च महानता लक्षात येते. हिंदु धर्मात पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितला आहे. पती-पत्नीचे पवित्र नाते, म्हणजे ७ जन्मांसाठी स्वीकारलेली एकनिष्ठता, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याची एक पवित्र वचनबद्धता आहे ! असे असतांना सध्या मात्र या पवित्र नात्याची गुणवत्ता किती ढासळली आहे, याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. वाहिन्यांवरील मालिकांमधून विवाहबाह्य संबंधांचे उदात्तीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात केले जाते. याचा समाजमनावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे अनैतिक अशी ही लाजिरवाणी गोष्टही भूषणावह वाटायला लागली आहेे. अमेरिकेत गेल्या २५ वर्षांपूर्वीपासून जनतेला ‘कुटुंब व्यवस्थे’कडे जाण्याची चळवळ राबवली जात आहे आणि भारतात मात्र ‘एकत्र कुटुंबव्यवस्था’ ही ‘विभक्त कुटुंबा’कडे गेली आहे. ‘लिव्ह इन’चा पुरस्कार होत आहे.
खरे तर कुटुंबाचा पाया हा खंबीर पती-पत्नीवर अवलंबून असतो. आज पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, आदर, आपुलकी, त्याग, जुळवून घेण्याची वृत्ती, कुटुंबभावना बोथट होत चालली आहे. पूर्वी पतीचेे नाव लाजत केवळ उखाण्यातून अनेक वचनात घेतले जायचे, ते आता कधीच ‘एकेरी’ झाले आहे ! ‘साता जन्माची साथ’ दूरच या जन्मातील वचनबद्धतेचीही पूर्तता होत नाही; कारण एकमेकांविषयी, कुटुंबाविषयी आपुलकीच्या आणि बांधीलकीचा संस्काराचा असलेला अभाव. यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढून व्यक्तींची शारिरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर मोठी हानी होत आहे. मागच्या पिढ्यांची बांधीलकी देव, देश, धर्म अशा व्यापक स्तरावर होती. ती न्यून होत जाऊन आज पती-पत्नीपुरतीही शिल्लक रहातांना अवघड झाले आहे. स्वार्थ, समजूतदारपणाचा अभाव, स्वत:च्या मतांवर ठाम असणे, एकमेकांना वेळ न देणेे, एकमेकांना गुण-दोषासहित न स्वीकारणे, अशी काही त्यामागील कारणे आहेत. पती-पत्नीचे देवाण-घेवाण हिशोब हे ५० टक्के असतात. हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्याची वाटचाल केली, तर या नात्यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्ठता टिकून राहील. या भक्कम नात्याच्या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !
– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी.